>> ‘आरटीआय’खाली दिलेल्या माहितीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून खुलासा
गेले जवळपास दीड-दोन महिने दाबोळीतील चिखलीच्या माटवे व्हडलेभाट परिसरातील इंधन गळतीचा विषय राज्यात गाजत आहे. या परिसरातील विहिरी, नाले व अन्य जलस्रोतांत होणारी इंधन गळती रोखण्यात अद्याप यश आलेले नाही. ही वस्तुस्थिती असताना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहिती हक्क कायद्या (आरटीआय) खाली दिलेल्या माहितीत व्हडलेभाट परिसरात इंधन गळती होत नसल्याचा खुलासा केला आहे. तेथील विहिरीत ‘एनेनाफथिलीन’ हा द्रवपदार्थ आढळला असून, त्यातून प्लास्टिक तयार होते, अशी माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिखलीचे माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर यांना ‘आरटीआय’मधून दिली आहे.
27 नोव्हेंबरला पहिल्यांदा इंधन गळतीचा प्रकार समोर आला होता. व्हडलेभाट-चिखली येथील अंदाजे सहा विहिरींतील पाण्याचा चक्क पेट्रोलचा वास येऊ लागला होता, तर एका विहिरीत पूर्णपणे पेट्रोलचा साठा जमला होता. यानंतर नाले, शेतजमिनींमध्येही इंधन मिसळत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले. मधल्या काळात इंधन गळतीचे ठिकाण शोधल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र अद्याप इंधन गळती रोखण्यात यश आलेले नाही.
या पार्श्वभूमीवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरटीआयमधून केलेला खुलासा धक्कादायक ठरला आहे. झुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीच्या भूमिगत वाहिनीतून पेट्रोल-डिझेल मिश्रित इंधन चिखली व्हडलेभाट परिसरात भूमिगतरित्या विहिरी, नाले आणि शेत जमिनीत पाझरत नसल्याचे मंडळाने आरटीआयखाली दिलेल्या माहितीत म्हटले आहे. व्हडलेभाट परिसरातील विहिरीत ‘एनेनाफथिलीन’ द्रवपदार्थ सापडत असून, त्याद्वारे प्लास्टिक तयार होते, अशी माहिती मंडळाने दिली असल्याचे प्रताप म्हार्दोळकर यांनी सांगितले. तसेच विहिरीत फ्लोरेन, अँथरेसीन, पॅन्थारीन, फ्लोतेरीन आणि प्येरनी या द्रवपदार्थांचा साठा मिळाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरटीआयमधून सांगितले आहे.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने इंधन गळतीनंतर व्हडलेभाट येथील सर्व विहिरींतील पाण्याची तपासणी केली होती. त्यामुळे सदर तपासणीचा मंडळाकडे माहिती हक्क कायद्याखाली तपशील मागितला होता, असे म्हार्दोळकर यांनी सांगितले.
मंडळाने आरटीआयखाली दिलेल्या तपशीलातून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत, झुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप म्हार्दोळकर यांनी केला. तसेच आरटीआयखाली विचारलेल्या आणखी प्रश्नांची उत्तरे उपलब्ध नसल्याचे मंडळाने सांगितले, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.
जनतेच्या डोळ्यांत धूळफेक : प्रताप म्हार्दोळकर
व्हडलेभाट परिसरात इंधन गळती होत नसल्याचा खुलासा करून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा दावा आरोप चिखलीचे माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर यांनी केला. झुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीच्या भूमिगत वाहिनीतून इंधन गळती झाल्या प्रकरणी कंपनी विरोधात वास्को पोलिसात 2 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत; मात्र गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीविरोधात कोणतीही तक्रार दाखल नाही, अशी माहिती आरटीआयमधून दिली आहे, असेही म्हार्दोळकर यांनी सांगितले.