चिंबल लॉकडाऊन मागे

0
148

चिंबल ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह ११ रुग्ण आढळून आल्याने चिंबल ग्रामपंचायतीने जाहीर केलेली सात दिवस लॉकडाऊनची घोषणा अखेर मागे घेण्यात आली. स्थानिक आमदार आन्तोनियो फर्नांडिस यांच्या उपस्थितीत चिंबलचे सरपंच चंद्रकांत कुंकळ्येकर यांनी १७ ते २३ जूनपर्यंत पंचायत क्षेत्रात लॉकडाऊन पाळण्याची घोषणा पत्रकार परिषदेत काल केली होती.

आमदार फर्नांडिस यांनी चिंबल पंचायतीच्या लॉकडाऊनचे समर्थन केले होते. गावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळणार्‍यांना कुणीही रोखू शकत नाही. चिंबल पंचायतीने गोवा पंचायत राज कायदा १९९४ नुसार लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे, असा दावा आमदार फर्नांडिस यांनी केला होता.

चिंबल येथे आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह ११ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य खात्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेला कर्मचारी, त्याच्या कुटुंबातील ८ व्यक्ती आणि ३ शेजार्‍याचा समावेश आहे. चिंबल भागातील सुमारे २०० पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य खात्याकडून कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना केली जात आहे. चिंबल येथे ओपीडी सुरू केली जाणार आहे.

हळदोणा, नास्नोळामधील लॉकडाऊन रद्द
बार्देशमधील हळदोणा, नास्नोळा या दोन्ही ग्रामपंचायतीने लॉकडाऊनचा निर्णय काल मागे घेतला आहे. या दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लॉकडाऊनची घोषणा केली होती.