दोन्ही प्रकल्प रद्दविषयीचा पर्यटन खात्याने काढलेला ‘तो’ आदेश अमान्य
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश काढल्याने चिंबल ग्रामस्थांनी काल जुने गोवे येथील गांधी चौकात युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ या दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात महाआंदोलन केले. पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प रद्द करण्याबाबत जारी केलेला आदेश चिंबलवासियांना मान्य नाही. हे नियोजित दोन्ही प्रकल्प पर्यटन खात्याच्या अखत्यारित येत नाहीत. त्यामुळे संबंधित पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि सामान्य प्रशासन विभाग (जीएडी) यांनी दोन्ही प्रकल्पांच्या स्थलांतराबाबत आदेश जारी करेपर्यंत चिंबलवासियांचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा आंदोलनातील एक नेते अजय खोलकर यांनी महासभेत बोलताना काल दिला.
चिंबल ग्रामस्थांनी नियोजित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ या दोन प्रकल्पांच्या विरोधात पणजीत महाआंदोलनाची घोषणा केली होती. तथापि, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी 29 जानेवारीच्या रात्री जमावबंदीसंबंधीचा एक आदेश जारी करून पणजीत आंदोलन, मोर्चा, घोषणाबाजी करण्यावर बंदी घातल्याने चिंबल ग्रामस्थांनी जुने गोवे येथील गांधी चौकात महाआंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
चिंबल ग्रामस्थांनी चिंबल ते जुने गोवे दरम्यान रॅली काढली. चिंबल ग्रामस्थांनी जुने गोव्यातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला अभिवादन करून महाआंदोलनाला सुरुवात केली. या महाआंदोलनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस, आम आदमी पक्ष, आरजीपी व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी घेतला.
चिंबल ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंध नसलेल्या सरकारी अधिकाऱ्याने दोन्ही प्रकल्प रद्द करण्याबाबतचा आदेश जारी केला आहे. नियोजित युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ या प्रकल्पांबाबत सर्व संबंधित विभागांमधील अधिकाऱ्यांकडून अधिकृत, कायदेशीर आणि प्रशासकीय आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे अजय खोलकर यांनी स्पष्ट केले.
तोयार तळ्याजवळील युनिटी मॉलसाठी केलेले खोदकाम बुजवून जमीन पूर्वस्तरावर आणावी. या ठिकाणी नव्याने कुठल्याही प्रकल्पाला नगरनियोजन विभागाने मान्यता देऊ नये. तळ्याच्या पाणथळ जागेबाबत नव्याने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी गोविंद शिरोडकर यांनी केली.
भाजपच्या पणजीतील रॅलीवर कारवाई करणार का? : खोलकर
चिंबलवासियांच्या महाआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पणजी शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे आम्ही जुने गोवे येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. तथापि, पणजीत जमावबंदीचा आदेश असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वागतासाठी रॅली, घोषणाबाजी करण्यात आली. पणजीत जमावबंदीचा आदेश लागू असताना भाजपने काढलेल्या रॅलीवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का? असा प्रश्न अजय खोलकर यांनी उपस्थित केला.