चिंतनाच्या चिंतेचा निव्वळ ‘बेगडी’ फार्स!

0
127

– रमेश सावईकर
‘हात’ची सत्ती गेल्यानंतर लगेच सत्ताभ्रष्ट का झालो याचा विचार करण्याची गरज आह,े असा सरळ-साधा विचारही मनात न येणार्‍या राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना अखेर जाग आली. राज्याची सूत्रे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी हाती घेतल्यावर विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याविरुद्ध चकार शब्दही न उच्चारणारे कॉंग्रेसचे नेते आता वाचाळासारखे टीकास्त्र सोडत आहेत. पर्रीकर मुख्यमंत्री असताना गोवा राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात असून नसल्यासारखेच वाटत होते. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे हे तर मुरब्बी राजकारणी. गरज पडली तर तोंड उघडायचे, असा त्यांचा ‘खाशा’ स्वभाव. म.गो. पक्षाशी सोयरिक करून कॉंग्रेसने सरकार टिकवले. गत विधानसभा निवडणुकीत पुनश्‍च म.गो. पक्षनेते भाजपाच्या दावणीला बांधून घेऊन सत्तेत अखेर सहभागी झाले. सूर्य कोणाचाही असो, त्याला नमस्कार करून सत्ता मिळाल्याशी कारण अशी म.गो. पक्षाने घेतलेली भूमिका अखेर त्या पक्षाला एवढी मारक ठरणार आहे की पक्षाच्या अस्तित्वासाठी म.गो. पक्षनेत्यांना अखेरची लढाई लढावी लागेल. भाजपाचे वजन व लोकप्रियता एवढी वाढली आहे की, पुढच्या निवडणुकीत म.गो. पक्षाला ‘एकला चलो रे’ म्हणून रिंगणात उतरावे लागेल.कॉंग्रेस पक्षनेत्यांना तर आपसूक हाती येणारी सत्ता उपभोगण्याची एवढी सवय जडली आहे की आज सत्तेशिवाय दिवस कंठावे लागले तरी येत्या निवडणुकीत पुनश्‍च पक्षाला गतवैभव प्राप्त होईलच अशा सुखद कल्पनेत ते वावरत आहेत. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री बनले. आता पार्सेकरांना विरोध करणे काही तेवढे अवघड नाही, असा समज गोवा प्रदेश कॉंग्रेस नेत्यांपासून पक्षाचे गोवा प्रभारी दिग्विजयसिंह यांनी करून घेतला असावा. त्यामुळेच त्यांच्या डोक्यात चिंतन शिबिराची कल्पना शिजली.
मध्यंतरीच्या काळात प्रदेशाध्यक्षपदी जॉन फर्नांडिस यांची वर्णी पक्षश्रेष्ठींनी लावली. अगदी कडक हेडमास्तरांप्रमाणे त्यांनी कार्यपद्धती अवलंबून उरल्या-सुरल्या कॉंग्रेस पक्ष नेत्यांचा नि कार्यकर्त्यांचा भरपूर रोष ओढवून घेतला. पक्षशिस्त भंग कारवाईचा बडगा उचलला. सुखावलेले, दुरावले गेले. कपडे इस्त्रीला दिल्यानंतर उरल्या सुरल्या कोटाच्या बटनांची वासलात लावून कोट परत करण्यासाठी आलेल्या परिटासारखी परिस्थिती फर्नांडिस यांची झाल्याचे पाहायला मिळाले. बस्स. एवढेच काय ते कमावले! (की गमावले?) अखेर स्थानिकांनी दंड थोपटले नि प्रदेशाध्यक्षपदी लुईझिन फालेरोंना आणून त्याचा स्थानिक राजकारणात सक्रिय प्रवेश झाला. लुईझिन अनुभवाने, हुशारीने तसे चलाखच! त्यांनी कानपिचक्या देत देत दुरावलेल्यांनाही जवळ केले. चिंतन शिबिराच्या माध्यमातून पक्षासमोरची संघटनात्मक परिस्थिती पडताळून पाहण्याऐवजी कॉंग्रेसच्या नेत्यांना ‘भाजपा’ हेच लक्ष्य ठरवून विचार करणे अधिक पसंतीचे-गरजेचे वाटले असावे. म्हणूनच तर पक्षाचा पराभव का झाला त्याची किमान पाच कारणे शोधण्याचे त्यांनी टाळले. कॉंग्रेसने सरकारवर १५ कलमी आरोपपत्र ठेवले. त्यातून नेमके काय साध्य होणार? विरोध करण्यासाठी एखादा विषय लावून धरला, त्यावरून रण पेटविले म्हणून काय पक्षाच्या बाजूने जनता उभी ठाकणार? सत्तेवर असताना कॉंग्रेस पक्षाने अमर्याद सत्ता उपभोगली, योजनांचा बट्‌ट्याबोळ केला, जिव्हाळ्याचे विषय अधांतरी ठेवले, महागाईच्या भस्मासुराला उत्तेजन दिले, बेकायदेशीर कृत्यांना खतपाणी घालून गुन्हेगारांना राजाश्रय दिला. नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास केला, गुन्हेगारीशी संबधित राजकारण्यांना मोकळे सोडले…. असेच आणकी बरेच काही क्रियाकर्म करून साळसूदपणाचा, सोवळेपणाचा आव आणला. कॉंग्रेस पक्षाच्या दर्शनी हातात काय आहे नि अदृश्य हाती काय लपले आहे हे लपून थोडेच राहिले? म्हणूनच त्याची किंमत पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोजावी लागली.
चिंतन शिबिरात कॉंग्रेस नेत्यांनी जे भाजपा सरकारवर १५ कलमी आरोपपत्र ठेवले आहे, त्यापैकी कुठला आरोप कॉंग्रेसला लागू होत नाही ते या नेत्यांनी जनतेला सांगावे. कॉंग्रेसच्या राजवटीत काय नव्हते? आणि जे जे म्हणून त्यावेळी होते ते अजूनही तसेच टिकवण्याची किमया भाजपाच्या मंडळींनी करून दाखविली आहे. ‘कमळ’ वरून कितीही स्वच्छ, सुंदर दिसले तरी ते पूर्ण दलदलमुक्त कधीच होणार नाही. त्याला बाह्य स्पर्श करणार्‍या ‘हातां’ना दलदलीचा दर्प येणारच हे ध्यानात ठेवून तर नंतर काय तो ‘दिग्विजय’ दाखवावा!
भाजपाने कुळ-मुंडकार कायद्यात केलेली दुरुस्ती विस्मृतीत गेलेल्या माजी कॉंग्रेस मातब्बर नेत्यांच्या पथ्यावर पडली आहे. हे दुरूस्ती विधेयक राज्य विधानसभेत मांडले गेले तेव्हा ४० पैकी एकाही आमदाराने आपले तोंड उघडून विरोध दर्शविला नाही, असे खुद्द मुख्यमंत्री पार्सेकर कंठशोष करून सांगतात. त्यावेळी कॉंग्रेस आमदारांची बोबडी का वळते? सारेच गप्प कसे काय?
कुळ-मुंडकारांचा प्रश्‍न कायमचा सुटावा असे कॉंग्रेससकट सत्ताधारी भाजपालाही वाटत नाही, कारण असे प्रश्‍न पुनश्‍च गरज पडेल त्यावेळी ज्वलंत बनविता येतात, हे पक्के ओळखून असलेले नेते दक्षिण-उत्तर गोव्यातील ग्रामीण भागांत सभा घेऊन आवाज बुलंद करीत आहे. त्यामागे नेमका स्वार्थ काही तरी असणारच! संघटना बळकटीसाठी जनतेसमोर जाणार तर ज्वलंत विषय हवेत ना? शिक्षण माध्यम प्रश्‍न, मोपा विमानतळ प्रकल्प, पर्यटन धोरण, वाढती गुन्हेगारी, प्रदूषण, कचरा विल्हेवाट आदी अनेक विषय गेले वर्षभर या ना त्या निमित्ताने चर्चेत येऊन वादंग माजले. पण त्यावेळी सारे कॉंग्रेस राज्य नेते गप्प होते? त्यामागचे नेमके ‘बिंग’ काय होते? असा प्रश्‍न पडल्यास आश्‍चर्य ते का म्हणून?
पणजी मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकीमुळे कॉंग्रेसमधील फुटीला खतपाणी मिळाले आहे. आमदार बाबूश मोन्सेरात कॉंग्रेसशी फारकत घेऊन अध्यक्ष म्हणून पोटनिवडणुकीत उतरणार आहेत. म्हणूनच ते कॉंग्रेसच्या ‘चिंतन’ शिबिरापासून अलिप्त राहिले. प्रदेशाध्यक्ष फालेरोंची शिष्टाई व्यर्थ ठरली. फालेरो, सार्दिन, रवी, खलप आदी मंडळी सूरात सूर मिसळून एकत्र आली तर पक्ष संघटना बळकटीचे कार्य नेटाने पुढे जाऊ शकले. परंतु कॉंग्रेसमध्ये फक्त ज्येष्ठ नेत्यांचीच रेलचेल वाढली आहे. हे नेते भविष्यात मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून कार्यप्रवृत्ती झाले आहेत. तळागाळापर्यंतच्या जनतेचा कैवार घेण्याची प्रामाणिक इच्छा आणि जमिनीवर पाय लावून काम करण्याची तयारी असेल तर संघटना बळकटीचे काम यशस्वी होऊ शकते.
नव्या रक्ताला वाव देण्याची भाषा फालेरोंच्या तोंडी शोभून दिसते, पण प्रत्यक्षात तरूण नेतृत्व पुढे येत आहे, त्यापासून आपल्या आसनाला धोका पोचू शकतो अशा भीतीपोटी पायांखालची वाळू सरकू लागते. म्हणूनच तर खुर्चीची अभिलाषा सुटता सुटेना! कॉंग्रेसमध्ये असे काही नेते आहेत की त्यांना पक्ष संघटनेची विशेष चिंता नाही. आमदार झाल्यावर लाल दिव्याची गाडी, सरकारी बंगला व इतर प्राधान्यक्रमाच्या गोष्टी मिळाल्या की झाले समाधान! मग कॉंग्रेस काय नि भाजपा काय? सगळे एकसारखेच! सरकारी जावई म्हणून सरकारी कारकीर्द नोंद झाली की जेवणावर तृप्त होऊन ढेकर द्यावा तशी सुस्ताई-मस्ताई उपभोगणारे हे नेते चिंतन शिबिरात चिंतन करतात की स्वतःच्या चिंता विसरून पक्षाच्या चिंतेवर विचार चिंतन, मनन करून कार्यप्रवण बनल्याचा साळसुदपणाचा आव आणतात हे सांगणे कठीण वाटते. पण बरबटलेल्या हातात नेमके काय आहे आणि हे ‘हात’ प्रत्यक्ष पक्षकार्यात कामी येणारच असे थोडेच आहे. चिंतन हवे ही चिंता खरीच की दिखाऊ हे त्यांनाच ठावे!