‘अपना घर’ चे दुखणे

0
96

मेरशीच्या ‘अपना घर’ सुधारगृहातून मोठ्या संख्येने मुलांनी पलायन करण्याची घटना पुन्हा एकवार घडली आहे. ‘अपना घर’ आणि मुलांचे पलायन हे जणू समीकरणच झालेले आहे. आजवर हे सुधारगृह अशा विपरीत घटनांसाठीच अनेकदा चर्चेत आले. यावेळी या मुलांनी केवळ पलायनच केले नाही, तर संस्थेत मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि नासधूसही केली. पुन्हा पुन्हा असे गंभीर प्रकार होत असूनही अशा घटनांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना होऊ शकत नाही हे आश्चर्यकारक आहे. या सुधारगृहातील मुलांचे एकेक प्रताप ऐकले तर थक्क व्हायला होते. काही काळापूर्वी येथील अल्पवयीन मुलांना रात्री बाहेर गाड्या येऊन थांबायच्या. त्यातून त्यांना चोर्‍या करण्यासाठी बाहेर नेण्यात यायचे आणि पहाटे चोरीचे वा घरफोडीचे काम उरकल्यावर परत आणून सोडले जायचे. मेरशी परिसरातील कुख्यात गुंडांच्या टोळ्या यात सामील होत्या. विशेष म्हणजे अपना घरचे केअरटेकर या चोरीच्या वस्तू या मुलांकडून कवडीमोलाने विकत घेत असत. विदेश मांद्रेकर नावाच्या केअर टेकरला या प्रकरणात अटकही झाली. काही मुलांचे येथे लैंगिक शोषण व्हायचे असेही मध्यंतरी उघड झाले. मुलांना वायरने बडवायचे आणि विजेचा शॉक द्यायचे प्रकारही घडत होते. हे सगळे पाहिले तर हे सुधारगृह आहे की बिघाडगृह असाच प्रश्न निर्माण होतो. बालगुन्हेगारांमध्ये सुधारणा व्हावी, त्यांचे मानसिक परिवर्तन घडावे यासाठी सरकार लाखो रुपये खर्चून हे सुधारगृह चालवते, परंतु त्यातून सुधारणा होण्याऐवजी असेच प्रकार जर होणार असतील तर या प्रयत्नांना अर्थ काय राहिला? अपना घरशी संबंधित मंडळी अशा प्रकारचे सुधारगृह चालवण्यास पूर्णपणे अक्षम आहेत असाच या सार्‍यातून अर्थ निघतो. स्वयंसेवी संस्थांची आणि कार्यकर्त्यांची मदत सरकार या सुधारगृहाच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी घेत असते, परंंतु अशा समितीच्या देखरेखीतूनही जर या सुधारगृहाच्या एकंदर स्वरूपात काहीही बदल घडून येणार नसतील, तर या समितीचीही फेररचना व्हावी लागेल. मुळात या सुधारगृहासंदर्भात काही मूलभूत उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. पहिली बाब म्हणजे या सुधारगृह संकुलात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. मुलांना पळून जाणे शक्य होतेच कसे? या सुधारगृहामध्ये शिस्त नावाची काही चीज असावी असे वाटत नाही आणि त्याला सर्वस्वी ‘अपना घर’ चे कर्मचारीच जबाबदार आहेत. काही कर्मचार्‍यांचीच या मुलांना फूस नाही ना असा संशय या सार्‍या प्रकारामुळे बळावतो. बेफिकिरी आणि बेशिस्तीतूनच अशा घटना घडत असतात. ‘अपना घर’ संदर्भात यापूर्वी दीपक ढवळीकर आणि लेविन्सन मार्टीन यांच्या नेतृत्वाखालील समित्यांनी आपले अहवाल दिले होते. त्यातील किती शिफारशींची आजवर कार्यवाही झाली? विविध गुन्ह्यांमध्ये पकडल्या जाणार्‍या मुलांची ते अल्पवयीन असल्याने ‘अपना घर’ मध्ये जेव्हा रवानगी होते, तेव्हा तेथे त्यांच्या मानसिक परिवर्तनाचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. आईवडिलांच्या मायेला पारखी झालेली वा प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली मुले गुन्हेगारीसारख्या वाममार्गाकडे वळतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचे चुकलेले गाडे पुन्हा रुळावर आणण्यासाठीच या सुधारगृहांचे प्रयोजन असते. त्यासाठी या मुलांना वेळीच योग्य समुपदेशन मिळणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये सन्मार्गाकडे वळण्याची इच्छा निर्माण होण्यासाठी प्रेम आणि सन्मानाने त्यांच्याशी वागून त्यांच्या मनामध्ये मुळात जीवनाविषयी आस्था निर्माण करणे गरजेचे आहे. तिहारसारख्या कारागृहामध्ये जेथे अट्टल गुन्हेगार येत असतात, तिथे विपश्यनेसारख्या प्रयत्नांनी त्या गुन्हेगारांचे मानसिक परिवर्तन घडण्याचा चमत्कार जर घडू शकत असेल, तर अपना घरमधील अल्पवयीन मुलांचे मानसिक परिवर्तन का घडू शकत नाही? गरज आहे ती प्रामाणिक प्रयत्नांची. त्यासाठी तथाकथित प्रशासनातील अधिकार्‍यांशी साटेलोटे असलेल्या तथाकथित ‘समाजसेवकां’चा सल्ला न घेता खरोखरच या क्षेत्रामध्ये तळमळीने वावरणार्‍या संस्था आणि त्यांच्या समर्पित कार्यकर्त्यांना सामील करून घेतले गेले, तरच या मुलांच्या जीवनाला नवी दिशा मिळू शकेल. ‘अपना घरा’ संदर्भातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न होणार नसेल तर या कोंडवाड्यात आलेली मुले पळून जाण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा करणारच!