चाला नि आरोग्य कमवा

0
142
  •  माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

अर्थार्जनासाठी आपण वेळ काढतो. दिवस-रात्र त्याचा विचार मनी असतो. या व्यतिरिक्त आपलं रुटीन. त्यामुळे तरुणाईत आरोग्याची हेळसांड होते व शेवटी व्हायचे तेच होते. नाना व्याधी व त्यावरील औषधं. पैसे कमवायला आपण वेळेचा विचार करत नाही. मग आरोग्य कमवायला… हो आरोग्य कमवायलाच अळम् टळम् का?

सकाळी लवकर उठा आणि ४ ते ५ कि.मी. चाला. आरोग्य कमवा!
कालच माझ्या मैत्रिणीने मला पाठवलेली मेसेज. क्षणभर मी विचार केला आणि मनी निश्‍चय केला की उद्यापासून सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे. रोज जायचं की नाही, संकल्प यशस्वी होईल की नाही… मनात नाना प्रश्‍नांचे काहूर. म्हटलं तुर्तास हा विचार नको. झालं. केला मनाचा निर्धार. रात्री झोपायला बारा- साडेबारा वाजतात. आज लवकर म्हणजे साडेदहाच्या आत झोपायचं. ‘रुटीन’ कामं लवकर आटोपली. रात्रीच्या लेखनाला फाटा दिला. साडेदहा वाजता बिछाना गाठला. हलक्या-फुलक्या वाचनाचाही मोह आवरला. पण न विसरता पहाटे साडेपाचचा अलार्म लावला. जाग येईलच याची खात्री होती. परंतु आळसामुळे निर्णयात बदल व्हायला नको. गेली दोन वर्षे मॉर्निंग वॉकला खंड पडला होता. त्यालाही नव्याने सुरुवात होवो, ही मनी सुप्त इच्छा.

बराच वेळ रात्री झोप येईना. मनात आलं… पु.लं.चा अपूर्ण राहिलेला ‘अंतु बर्वा’ वाचून पूर्ण करावा. पण माझ्या निश्‍चयाचा ‘अंतु शेट’ नको व्हायला, असं बजावून मी माझ्या अंतर्मनाला बळे बळे चूप केले. मग कधीतरी डोळा लागला. एवढ्यात गाढ झोपेत असताना कोंबडा आरवला. म्हणजे मोबाइल अलार्म वाजला. अर्धवट झोपेत अलार्म बंद केला. पुनरेति अलार्म (रिपिटेड). शेवटी मी उदयोन्मुख झाले. उठलेच. अनुभवावा आजचा प्रातःकालचा फेरफटका. वॉकला निघेपर्यंत सव्वा सहा वाजून गेले. मी डोक्यावर नाक तोंड झाकत मफलर गुंडाळलं. वॉकिंग शूज घालून घरातून निघाले. हातात काठी घेतली. सकाळी फिरायला जाताना भटकी कुत्री असतात. एखादे कुत्रे भुंकत अंगावर आले तर दाणादाण उडायला नको. नाहीतरी कुत्रा माझा दू ऽ ऽ र.चा सोबती. हाती काठी असली म्हणजे कुत्र्याला घाबरविण्यासाठी तिचा उपयोग करता येतो. अशा जय्यत तयारीनिशी सकाळच्या फेरफटक्यास सज्ज झाले.
हवेत सुखद गारवा होता. वातावरणात दवबिंदूंचा ओलसरपणा जाणवत होता. मधून मधून माडांच्या झावळ्यातून सूर्यकिरणांची तिरीप लक्ष वेधून घेत होती. प्रसन्न वातावरणात मन माझे गाऊ लागले… ‘निळ्या जांभळ्या मेघाचं नभावर मोरपीस… हिरवळलेल्या रानात सळसळ ग पानात…’
मनमोहक वातावरणात पुढे जाता जाता भटकी कुत्री भुंकू लागली. शेवटी जित्याची खोड…. डोक्यावर मफलर बांधल्याने कुणीतरी त्यांना अज्ञात वाटलं असावं. स्वतःच्या संरक्षणासाठी कदाचित ती भुंकत असावी. मी मात्र काठी उगारून त्यांना भीति दाखवून दूर पळविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी मला हातातील या काठीच्या शस्त्राचा उपयोग झाला. आजकाल स्वसंरक्षणासाठी सशस्त्र बाहेर पडणं कसं फायद्याचं ते या प्रसंगामुळे ध्यानी आल्यावाचून राहत नाही. मग ते भौतिक संकट असो अथवा आंतरिक!
एवढ्यात तिथल्याच जवळपासच्या घरातून एक प्रौढ बाई (पेशाने नर्स) बाहेर येत म्हणाली, ‘‘कुत्री कुणाला भुंकतात? तुम्हाला होय?’’
‘‘आज ही बुरखाधारी व्यक्ती दहशतवादी तर नसेल ना याचा अंदाज घेत भुंकत असावी’’- माझं हसून प्रत्युत्तर.
‘‘बरं, एवढ्या लवकर तुम्ही ड्युटीवर निघता का?’’
‘‘इथल्याच एका पेशंटला इंजेक्शन द्यायचं असल्याने लवकर निघाले.’’
‘‘ओकेके..’’ असं म्हणून आम्ही विरुद्ध दिशेने निघालो. पुढे जाते तर एक तुळशीवृंदावन लागलं. तिथं अंगणात एक बाई शेण काढून अंगण लख्ख करीत होती. अजूनही फोंड्यासारख्या शहरात काही ठिकाणी ग्रामीण वास येत आहे. चालता चालता मन पूर्वस्मृतीत गेले.

माझ्या लहानपणी घरी अंगणात शेण सारवून त्यावर सुंदर ठिपक्यांची, मंगल चिन्हांची गोपद्माची रांगोळी काढली जात असे. आज या शेणाच्या वासातून तत्कालीन दिवसांच्या स्मृती मनात उचंबळून आल्या. आमच्याकडची बाई ‘पटेकारीण’ म्हणत असू तिला. ती शेण कशी जरुरीपुरते पाणी घालून अंगणात काढत असे. तिचा हात कसा चपखलपणे शेण काढताना पुढे पुढे जात होता, याचं मला कुतूहल वाटायचं. घरात पण आमची एक भव्य खोली शेणाने सारवली जायची. मग त्यावर आई पांढरी शुभ्र रांगोळी घालायची, मध्ये हळद-कुंकवाचं बोट लावायची. आमचीपण रांगोळी घालण्यासाठी किती धडपड असायची! ती आवड अजूनही माझ्या मनात तशीच आहे. संधी मिळेल तेव्हा मी माझी रांगोळी रेखाटण्याची हौस भागवते.

एवढ्यात कुठंतरी गाय हंबरली. जाताना वाटेवर एक गोठा लागतो. या गोठ्यात दोन-चार गुरं आहेत, त्यांची देखभाल एक सत्तर- पंच्याहत्तर वर्षाचा इसम स्वतः आस्थेने करतो. भल्या सकाळी गोठा शेण-मूत्र काढून स्वच्छ करणे, गुरांना चारा घालणे, दूध काढणे हे सर्व तो स्वतः जातीने करतो. त्याचा उत्साह व मेहनत पाहता असं दिसून येतं की हेच खरं आरोग्याचं रहस्य. पंच्याहत्तरीच्या टप्प्यावर असलेली ही व्यक्ती आम्हा प्रौढांना लाजवेल एवढी कामाची जिद्द. धडधाकट पोलादी शरीर. त्याला कुठे वेगळा चालण्यासाठी वेळ काढावा लागत असणार? पूर्वीपासूनची मेहनत त्याचे आरोग्य फिट् राखण्यात उपयोगी आली म्हणायची.

पुढे निर्जन जागी सकाळचे निसर्गाचे मनोहारी रूप अधिकच खुलून दिसत होते. मंद गारव्यात विविध फुलां-पानांचा सुगंध, झाडां- माडांतून उगवत्या सूर्याचे दिव्य दर्शन, पक्ष्यांचे मधुर कुंजन, क्षितिजावरील विविधरंगी छटा…. कोण्या एका निसर्गप्रेमी कवीने शब्दबद्ध केलेली रचना आठवली….

क्षितीज दिसते तशी म्हणावी गाणी
गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे…

खरोखर निसर्गाचा महिमा तो किती न्यारा! निसर्ग आपल्याशी जणू संवाद साधतो. आपल्या सुंदर किमयेने लक्ष वेधून घेतो. तणावग्रस्त जीवनात निसर्गाचे सान्निध्य म्हणजे संजीवनीच. शरद ऋतूतील हे हवामान थंड आणि आल्हाददायक असेच असते. फुलांनाही बहर आलेला असतो.

निसर्गाच्या सौंदर्याचा शिल्पकार ईश्‍वर आहे. वेगवेगळ्या ऋतूत निसर्ग आपली साजिरी गोजिरी रुपं बदलत असतो आणि मानवाला अमूल्य चैतन्याच्या भेटी देत असतो. ऋतूंचे परिवर्तन म्हणजे मानवी जीवनासाठी एक अमूल्य उपहार. म्हणून निसर्गाचं आणि मानसाचं नातं परस्परावलंबी आहे.

चतुर्थी, दसरा, दिवाळी असे धामधुमीचे सण साजरे झाल्यानंतरचा हा हंगाम. हवेत प्रसन्नतेचा गारवा. सणासुदीची धावपळ नसते व फारशी दगदग नसते. या फेरफटक्यात अर्ध्या तासाचा अवधी कधी सरला हे कळलंच नाही. एक नवीन तजेला मिळाला हे मात्र नक्की. खरोखर स्वस्तात मस्त असा आरोग्यावर रामबाण उपाय आहे. उत्तरोत्तर याची जाणीव प्रत्येकाला होईलच हे निर्विवाद!
पण कसं आहे, अर्थार्जनासाठी आपण वेळ काढतो. दिवस-रात्र त्याचा विचार मनी असतो. या व्यतिरिक्त आपलं रुटीन. त्यामुळे तरुणाईत आरोग्याची हेळसांड होते व शेवटी व्हायचे तेच होते. नाना व्याधी व त्यावरील औषधं. पैसे कमवायला आपण वेळेचा विचार करत नाही. मग आरोग्य कमवायला… हो आरोग्य कमवायलाच अळम् टळम् का? वेळच मिळत नाही. कसा दिवस उजाडतो व कसा मावळतो याचा विचारही करायला उसंत नसते. असं कारण देणं म्हणजे निव्वळ आपणच आपल्याला फसवणंच, नाही का? आळसाच्या आहारी जाणं किंवा प्रकृतीकडे कळतनकळत दुर्लक्ष करणं. जसं पैसे कमावणे आवश्यक आहे त्याचबरोबर आरोग्य जपणे हे त्याहीपेक्षा आवश्यक आहे. शेवटी शारीरिक मर्यादा या मर्यादितच असतात. व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन ही आरोग्याची त्रिसुत्रीच आहे.

पैसे कमावले तरी त्याचा उपभोग घेण्यासाठी आपण धडधाकट असणे आवश्यक आहे. पैसा भरपूर आहे पण आरोग्य नसेल तर असलेल्या पैशांचा उपयोग म्हणजे व्याधीखर्च. दुसरं काय? सांगायचं तात्पर्य ‘शरीर ओके तर ठिकाणावर डोके’. म्हणून आरोग्य कमावणे याला पर्याय नाही. आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता पण इथून पुढे ज्याचं आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत असंच म्हटलं जाईल.

जीवनात आरोग्याला फार महत्त्व आहे. नियमित चालण्याच्या व्यायामाचा समावेश करणे अत्यंत जरुरीचे आहे. नियमांचे पालन गरजेचे. विदेशात ४० वर्षांचे प्रौढही युवा वाटतात. निरामय आरोग्यामुळे जीवन सफल होते. चांगल्या शरीराबरोबर निरोगी मन असणे तेवढेच महत्त्वाचे. शारीरिक व मानसिक आरोग्य चालण्यामुळे समतोल राहते. व्यायामामुळे ‘डोपामिन’ नावाचं रसायन नैसर्गिकरीत्या तयार होतं. त्यामुळे आपण उत्साही, आनंदी राहतो… असा डॉक्टरी दावा आहे. निरीक्षण करा- चालल्यामुळे तसेच व्यायामाने आपल्याला फ्रेश वाटते. शारीरिक ऊर्जा वाढते.

‘चालायला जाणं’ हे केवळ आरोग्यासाठी करावं लागतं… अशीच भावना ठेवून करणे म्हणजे त्यात निरसता येऊ शकते. चालणे हा व्यायाम तर आहेच त्याचबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टी बारकाईने नजरेत येतात. आपल्या ज्ञानात भर पडते व वेळही सत्कारणी लागतो. मनःपूर्वक दृढ विश्‍वासाने नियमित चालण्याचा व्यायाम म्हणजेच अंतिम समयापर्यंत निरामय जीवनाचा मुख्य आधार आहे. अभ्यासपूर्वक चालण्याच्या व्यायामामुळे शक्यतो आजार उद्भवत नाहीत. आयुष्यमानही वाढतं याची मानवमात्राला प्रचिती येते. ‘आरोग्यम् खलु धर्मसाधनम्’ म्हटलेले आहे ते व्यर्थ नव्हे!
आरोग्याबरोबर चांगली माणसंही जपा… कारण जसे उत्तम शरीराशिवाय आनंद नाही तसेच मैत्रीशिवाय जीवन नाही.
तर आता कसलीही वाट पाहत बसू नका. हेल्दी लाईफस्टाईलकडे वळा आणि स्वतःला फिट् ठेवा!!