ग्लोबलायन’ हा बॉक्स घालावा  फिक्सिंग…

0
759
–  प्रा. डॉ. जयप्रभू शामराव कांबळे 
कबीर बसस्टॅण्डवर उतरला तेव्हा काळोख धरू लागला होता. काही मोजकीच माणसे गाडीतून उतरली आणि पसरली. त्याने सभोवताली कावळ्यागत नजर फिरवली. भगवती मंदिरासमोर माणसांची गर्दी होती. काही टपर्‍यांसमोर माणसांचे जथ्थे होते. काही दुकानासारख्या असणार्‍या जागेत कॅरमचा डाव जोशात चालू होता. शेजारी असणार्‍या कचर्‍याच्या ढिगावर गावठी डुकरांची घसरगुंडी जोमात चालू होती. कबीरला वाटले पायलट करावी आणि रुमवर जावे; पण त्याने तो निर्णय बदलला आणि पायीच चालू लागला. सुरबानवाडा जवळ येईल तसा त्याच्या पायाने वेग धरला. 
कबीर रुमवर पोहोचला. दार उघडले. लाईट चालू केला. सगळ्या रुममध्ये कसला तरी कुजकट वास पसरलेला होता. तो आतल्या खोलीत गेला. एक पाल मरुन पडलेली होती. तिच्या अवतीभोवती मुंग्यांची रांग होती. त्याने नाकाला रुमाल लावत ती पाल कागदावर घेतली आणि बाहेर टाकली. आता त्याला मळमळल्यासारखे वाटू लागले. डोके बधीर झाले. बधीरपणा सगळ्या अंगभर पसरला. मुंग्या डसल्यागत सगळा बधीरपणा अंगाला डसल्यासारखे वाटू लागल्यावर त्याने स्वत:ला सावरले. तो जेवणाच्या खोलीत गेला. सगळे पेपरचे गठ्ठे विस्कटलेले. सगळ्या जेवणाच्या खोलीत पेपर पसरलेले होते. काही पेपर अडगळ असणार्‍या जागेत नेले होते. कबीरने आता मागचा पुढचा विचार न करता अडगळ जागेत पसरलेल्या त्या पेपरना आग लावली. पेपर पेटू लागले आणि आतून कसला तरी आवाज आला. पुन्हा आवाज आला. मग पुन्हा. असे दोन-तीन वेळा झाल्यावर कबीर ज्याम भ्याला. त्याने सरळ पाण्याची घागर  जळत्या पेपरांवर ओतली आणि पेपर बाजूला केले. मग त्याने पेपराचे गठ्ठे बाजूला केले. आत बघतो तर मांजरीणीची पिल्ली होती. त्याने चटकण ती पिल्ली बाजूला ठेवली. कपाळावर हात मारला. आता पेटणारे काही पेपर होते. मांजरीणीची पिल्ली होती आणि कबीर. एवढ्यात दारातून ‘मनी’ आत आली. आपल्या पिल्लांना चाटू लागली. मांजरीण सात घरांमध्ये आपल्या पिल्लांना फिरवते. सातं घरं मांजरीण फिरती आणि परत पयल्या घरात येती, असं आई म्हणायची कबीरला आठवले. मनी आता कबीरच्या आयुष्यात चांगलीच स्थिरावली होती. कबीरच्या एकांतपणावरचे ‘मनी’ औषध झाली होती. कॉलेज सुटले की तासन्‌तास तो मनीबरोबर बोलायचा. त्याला गाव आठवले की मनीच त्याचे गाव व्हायची. आनंद यादवांच्या ‘माउली’ कादंबरीतली मनी आणि आपली मनी त्याला सारखीच वाटायची. पायाला घुटमळणारी, वाचताना अंगावर चढणारी, जेवताना पुढ्यात बसणारी, मासळी आणली की तोंडाकडे बघणारी, चिकन आणली की वैतागणारी आणि पुन्हा भाकरी टाकली की पळून जाणारी मनी त्याला कायम सोबत करायची. गरमी वैताग आणायची. कायम कपाळावर येणारा घाम पुसताना त्याला नाकी नऊ यायचे. बोलताना तो घाम पुसतच बोलायचा. घामाने चिंब अंघोळ व्हायची. अजून या मातीशी एकरूप व्हायला किती दिवस लागणार कोण जाणे? पण ही माती नसती तर आपण जगू शकलो असतो का, हा त्याला कायम पडणारा प्रश्‍न. ही माती आपली दुसरी आईच म्हणत कबीरने प्रश्‍नांच्या रांगेला टाळले.
कबीर एकटाच रुमवर होता. वाट तुडवताना हे आत्मकथन त्याच्या हातात होते. मनीने त्याच्याभोवती एक गोल रिंगण मारले आणि पिल्लांजवळ गेली. पिल्ले बघून तिला धीर आला. पण कबीरला मनीची हालचाल काहीतरी वेगळीच जाणवली. त्याकडे दुर्लक्ष करत कबीरने पुस्तकात डोके घातले. तेवढ्यात काही माणसे भेटण्यासाठी रुमवर आलेली होती. त्यांची ओळख त्यांनी करून दिली. त्यांच्याशी चर्चा करत असताना अचानक एक बोका आला आणि मनीच्या एका पिल्लाला अलगद तोंडात घेऊन गेला. काही कळायच्या आत. कबीरने त्या माणसांना तसेच रुमवर ठेवून त्या बोक्याचा पाठलाग केला. पण बोका काही सापडलाच नाही. मनी मात्र पायाशी घुटमळत होती. कबीरला खूप वाईट वाटले आणि त्या माणसांचा राग आला. एवढ्यात माणसांत कुणीच कसे उठले नाही? मनीचं पिल्लू काय आणि आपलं काय? आपल्या मुलाला असे कोणी घेऊन पळताना ही माणसे गप्प बसली असती का? कबीर या माणसांमध्ये माणुसकीच राहिली नाही. तू उगाच पळालास. बघ ते तुझ्याकडे बघून हसताहेत. मास्तर टॉवेल वर होता तरी पळाला. तुझ्या पळण्याला, तुझ्या टॉवेलला हसताहेत. तुझ्या घामाला हसताहेत. उगाच कुणीतरी दात विचकत आपल्या अगंावर येतय असं वाटत असताना पुन्हा तो बोका आला आणि मनीचे दुसरे पिल्लू घेऊन गेला. कबीरच्या पायातले पाणी पळाले. तो बोका परत येईल असे कबीरला वाटले नव्हते. अगोदर नेलेल्या पिल्लाचे त्या बोक्याने काय केले असेल आणि या पिल्लाला घेऊन गेल्यानंतर तो काय करणार आहे, या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे कबीरकडे नव्हती.
‘‘मास्तर, जावू द्या आता कसला विचार करताय, राहील पुन्हा मांजरीण गरोदर’’ या उद्गारावर कबीरला काय बोलावे ते कळेना.
‘‘मास्तर, तो बोका डेंजर आहे, त्याला आपला प्रतिस्पर्धी नको होता, म्हणूनच त्याने हा घात केला’’ या उद्गारानंतर मात्र कबीरला माडगुळकरांचे सत्तांतर आठवली. माकड-वानरांच्यात सत्तासंघर्ष असतो हे कबीरला माहीत होते, पण बोक्यांमध्ये पण असतो याची जाणीव कबीरला पहिल्यांदाच झाली. ‘‘मास्तर, निवांत जेवा आणि झोपा आता. उद्या सकाळी लवकर जायचं असेल’’, भेटीतल्या माणसाच्या उद्गाराने कबीरला जेवणाची आठवणी झाली.
 कबीर जेवणाच्या खोलीत आला. जेवला. मग अंथरुण टाकले. मनीने एक राहिलेले पिल्लू त्याच्या अंथरुणावर आणून टाकले. ‘‘मनी पण कसली? तिला जरासुद्धा पोरांची काळजी नाही.’’ म्हणत कबीरने मनीवर डोळे उगारले. ‘‘चल जा तिकडं, येऊ नकोस आता परत, दोन पिल्लं खायाला घातलीस त्या बोक्याला? त्याचा पाठलाग का केली नाहीस?’’ कबीर मनीला म्हणाला. पण मनी शांतच. आपली लांबलचक जीभ काढून ती आपल्या पिल्लाला टाकून गेली आणि लांबवर जावून बसली. आता मनीची अगतिकता कबीरच्या लक्ष्यात आली होती. कबीरने लाईट बंद केली नाही. तेवढ्यात तो बोका पुन्हा आला आणि कबीरला पत्ता लागायच्या अगोदर मनीच्या तिसर्‍या पिल्लाला घेऊन गेला. आता मात्र काय करावे कबीरला कळेना? त्याच्या सगळ्या डोक्यात सणक पसरली. झोप कुठल्या कुठे उडाली. असली-कसली मरणाची झोप लागली. आता मनीला कसे तोंड दाखवायचे म्हणत तो अंथरुणातून उठला तर मनी नुस्ती रुममध्ये एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे येरझर्‍या घालत होती. नुस्ती ओरडत होती. कबीरने मनीच्या पुढ्यात दूध ठेवले. पण मनीने त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. ‘‘वाद्या तुला एका पिल्लाला सांभाळता आलं नाही,’’ असंच म्हणत असेल का मनी, कबीर स्वत:शीच म्हणाला. अख्खी रात्र मनीने जागून काढली. पहाटेला मनी पसार झाली.
कबीर सकाळी लवकर उठला. त्याला पहिले लेक्चर होते. त्याने आवराआवर केली. बॅग घेतली आणि रुमला कुलूप लावले. तो आता झपझप चालू लागला. तर त्याला शॉकच बसला. मनी रस्त्याच्या कडेला त्या बोक्याच्या मिठीत. त्याच्या पोटावर आपले डोके टेकून निवांत बसली होती. कबीर ही कसली फिक्सिंग? हा कसला सट्टा? हा कसला जुगार जगण्याचा? कबीरला यातील कोणतेच उत्तर देता येत नव्हते. तो मुकाट्याने चालू लागला.