चार खाणपट्‌ट्यांचा ई-लिलाव होणार

0
6

>> राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू; उत्तर गोव्यातील तीन, तर दक्षिण गोव्यातील एका खाणीचा समावेश

राज्य सरकारने खाणींचा ई-लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असून, चार खाणपट्‌ट्यांचा लिलाव केला जाणार असल्याचे काल जाहीर केले. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून, त्याची जाहिरात शुक्रवारी सरकारने स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केली. राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करता यावा, यासाठी सरकारने पहिल्यांदाच अशा प्रकारे खाणींचा लिलाव पुकारला आहे. सरकारने ज्या चार खाणपट्‌ट्यांचा लिलाव पुकारलेला आहे, त्या खाणी डिचोली व सांगे तालुक्यातील आहेत. केंद्र सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या एमएसटीसी ई-वाणिज्य सेवा यांच्यातर्फे हा लिलाव करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये संपूर्ण खाण उद्योग बंद पडल्यानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याबरोबरच या उद्योगात गुंतलेल्या हजारो लोकांचा रोजगार हिरावला गेला होता. खनिजमालाची वाहतूक करणारे ट्रकव्यावसायिक, बार्जमालक, मशिनरीमालक आणि अन्य कामगारांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले होते. तसेच या व्यवसायावर अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या गॅरेज, खानावळी, हॉटेल्स अशा अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला होता. आता खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांना पुन्हा रोजगार मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ज्या खाणपट्‌ट्यांचा लिलाव पुकारण्यात आला आहे, त्यामध्ये उत्तर गोव्यातील डिचोली, शिरगाव-मये आणि मोंत-द-शिरगाव आणि दक्षिण गोव्यातील काले या खाणींचा समावेश आहे.

ज्या खाणपट्‌ट्यांचा लिलाव करण्यात येणार आहे, त्यांचा तपशील देखील जाहीर करण्यात आला आहे. डिचोलीतील एकूण खाणपट्टा क्षेत्र ४७८.५२०६ हेक्टर असून, त्यापैकी खनिज क्षेत्र ३४७.५६०९ हेक्टर, तर खनिज नसलेले क्षेत्र १३०.९५९७ हेक्टर एवढे आहे. शिरगाव-मयेतील एकूण खाणपट्टा क्षेत्र १७१.२४२२ हेक्टर एवढे असून, त्यापैकी खनिज क्षेत्र ५५.४५६ हेक्टर, खनिज नसलेले क्षेत्र ५०.७९३९ हेक्टर एवढे आहे. तसेच त्यातील पाहणी न केलेले क्षेत्र ६४.९९७३ हेक्टर एवढे आहे.

मोंत-द-शिरगाव येथील एकूण खाणपट्टा क्षेत्र ९५.६७१२ हेक्टर एवढे असून, त्यापैकी खनिज क्षेत्र २९.८० हेक्टर एवढे, तर खनिज नसलेले क्षेत्र ६५.८७१२ हेक्टर एवढे आहे. काले येथील एकूण खाणपट्टा क्षेत्र १७९.१८२६ हेक्टर एवढे असून, त्यापैकी खनिज क्षेत्र २१.१८०० हेक्टर, तर पाहणी न केलेले क्षेत्र ७५.४७७६ हेक्टर एवढा आहे.

सरकारने राज्यातील चार खाणपट्‌ट्यांचा ई-लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याने गेल्या साडेचार वर्षांपासून बंद असलेला खाण उद्योग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ई-लिलावाची प्रक्रिया ही १५ ते २१ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती खाण खात्याने दिली आहे. खाणींच्या लिलावाचा हा पहिला टप्पा असेल.

प्रमोद सावंत सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांत खाण उद्योग सुरू करण्याची घोषणा केली होती. खाण उद्योग सुरू झाल्यास गोव्याच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होणार असून, खाणींवर अवलंबून असलेल्या हजारो लोकांना रोजगार प्राप्त होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

डिचोलीतील खाणीचे क्षेत्र सर्वाधिक
या चार खाणपट्‌ट्यांपैकी डिचोलीतील खाणीचे क्षेत्र सर्वाधिक मोठे, तर मोंत-द-शिरगाव येथील खाणीचे क्षेत्र सर्वात कमी आहे. डिचोलीनंतर काले आणि मये-शिरगाव येथील खाणींचा आकारमानाच्या दृष्टीने क्रमांक लागतो.

ई-लिलावासाठी एमएसटीसी, एसबीआयची मदत
या लिलाव प्रक्रियेसाठी एसबीआय आणि एमएसटीसी या केंद्र सरकारच्या ई-कॉमर्स कंपनीची मदत राज्य सरकारने घेतली आहे. देशातल्या अन्य खाणींसाठीही एमएसटीसी ई-कॉमर्स कंपनीने लिलाव प्रक्रिया पुकारली आहे. राज्य सरकारने या कंपनीला खनिज लिलाव प्रक्रियेसाठी निमंत्रित करून करारबद्ध केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता या कंपनीने गोव्यातील खाणींसाठी निविदा मागवल्या आहेत.