काळ्या कोकेनचा कलंक

0
22

गोव्याकडे येणारे तब्बल पंधरा कोटींच्या ब्लॅक कोकेनचे घबाड मुंबई विमानतळावर नुकतेच पकडले गेले आणि गोवा हे अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे एक प्रमुख केंद्र बनले आहे ह्याला पुन्हा एकवार दुजोरा मिळाला. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील अमलीपदार्थविरोधी विभाग म्हणजेच एनसीबीने अनेक वर्षांपूर्वीच हे वास्तव आपल्या अहवालात अधोरेखित केलेले होते. गोव्यात जरी अमली पदार्थ व्यवहाराची किरकोळ प्रकरणेच आजवरच्या छाप्यांत उघडकीस आलेली असली, तरी प्रत्यक्षात देशाच्या विविध भागांमध्ये गोव्यामार्फत अमली पदार्थ पुरवठा होत असतो हे एनसीबीने वेळोवेळी नजरेस आणून दिलेले आहे. अलीकडेच हैदराबाद पोलिसांनी अमली पदार्थ व्यवहारांविरोधात जी धडक मोहीम उघडली, त्यातूनही त्या तस्करीचे धागेदोरे गोव्यापर्यंतच येऊन पोहोचले. मुंबईत पकडले गेलेले ब्लॅक कोकेन हा तर गोवा सरकारसाठी आजवरचा सर्वांत मोठा इशारा आहे.
कोकेनची तस्करी विनाअडथळा आणि तपासयंत्रणांना गुंगारा देऊन सुरळीत करता यावी यासाठी त्यामध्ये विविध रसायने मिसळून हे कोकेन काळे बनवण्यात येत होते असे आता उघडकीस आले आहे. ह्या रासायनिक मिश्रणामुळे अमलीपदार्थांचा वास घेऊन माग काढणार्‍या प्रशिक्षित श्वानांना देखील चकवा होतो आणि विमानतळासारख्या ठिकाणच्या स्कॅनरखालीही ते दिसत नाही. देशात अशा प्रकारचा हा पदार्थ पहिल्यांदाच पकडला गेलेला असला, तरी तो यापूर्वी अशाच प्रकारे गोव्यात आणला जात नव्हता कशावरून? काल सापडलेले घबाड हे दक्षिण अमेरिकेतून, थेट ब्राझीलमधून आणले गेले होते आणि गोव्याबरोबरच अन्यत्र पाठवले जाणार होते. विशेष म्हणजे त्यासाठी एका बोलिव्हियन महिलेचा वापर करण्यात आला. महिला असल्याने तिचा संशय येणार नाही ही अटकळ त्यामागे असावी. ह्या बयेने आजवर अशी तस्करी कितीवेळा केली आणि तिचे साथीदार कोणकोण आहेत ह्याची सखोल चौकशी आता व्हायला हवी. एनसीबी ती करीलच, परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ह्या तस्करीशी संबंधित कोण कोण लोक गोव्यात आहेत ह्याचा शोध घेणे ही गोवा पोलिसांची जबाबदारी राहील. आंध्र आणि तेलंगणाला अमली पदार्थ पुरवणार्‍यांच्या शोधात हैदराबाद पोलीस गोव्यात आले, तेव्हा येथील पोलिसांनी त्यांना सहकार्यही दिले नव्हते. शेवटी तेथील वरिष्ठ अधिकार्‍यांना जाहीरपणे ते सांगावे लागले. तरीही आपले पोलीस महासंचालक ‘अगा जे घडलेचि नाही’ असा केविलवाणा बचाव करताना दिसत होते. गोव्याशी संबंधित आता हे दुसरे मोठे प्रकरण उजेडात आले आहे.
ह्या सार्‍या पार्श्वभूमीवर गोव्यातील अमली पदार्थ व्यवहारांबाबत जेवढ्या तडफेने कारवाई व्हायला हवी तेवढी ती अजूनही होताना दिसत नाही. सोनाली फोगट हत्येनंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दखल घेतल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जातीने राज्यातील अमलीपदार्थ व्यवहाराविरुद्ध मोहीम राबवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आणि त्यानंतर काही छापे गेल्या काही दिवसांत पडले. परंतु यापूर्वी जप्तीनंतर पोलिसांच्या मालखान्यात ठेवलेल्या अमली पदार्थांना खुद्द पोलीसच बाहेर विकत होते हे गुडलर प्रकरणामध्ये पुराव्यांनिशी समोर आलेले आहे. अमली पदार्थ तस्कर अटालासंदर्भात गौप्यस्फोट करणार्‍या लकी फार्महाऊसला गोव्यात चौकशीसाठी आणू, आणू म्हणत शेवटी आणले गेलेच नाही. एखादी स्कार्लेट कीलिंग बळी जाते, एखादी सोनाली फोगट जीव गमावते, तेव्हा थोडीफार हालचाल होते आणि नंतर सोईस्कररित्या सगळ्या गैरकृत्यांवर पडदा पडतो असाच आजवरचा अनुभव आहे.
ही अमली पदार्थ तस्करी आंतरराष्ट्रीय पातळीवर चालते आणि गोव्यात वास्तव्यास असलेले विदेशी नागरिकही अशा प्रकरणांची सूत्रे हलवीत असतात हेही अनेकदा दिसून आले आहे. एनडीपीएस कायद्याखालील गुन्ह्यांत २०१९ ते २०२१ ह्या तीन वर्षांत गोव्यात तब्बल २३० विदेशी नागरिक सापडले आहेत. गेल्या वर्षी गोव्यात अमली पदार्थांसंदर्भातील १२१ प्रकरणे आढळून आली. ही आकडेवारी काय दर्शवते? राज्यातील गुन्हेगारीही वाढते आहे. गेल्यावर्षी २०२१ मध्ये राज्यात ७२ बलात्कार झाले. हे काय चालले आहे? अमली पदार्थांविरुद्धच्या छाप्यांत किरकोळ गांजा आणि चरस पकडल्याचे दाखवणे आता पुरे झाले. सहजपणाने गडगंज पैसा मिळत असल्याने लोक आपल्या घरांतही अमली पदार्थ लागवड करताना मध्यंतरी सापडले आहेत. पकडले जातात ते किरकोळ लोक. बड्या माशांच्या मुसक्या आवळण्याची आता वेळ आलेली आहे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली अशी धडक मोहीम उघडावी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा गोव्याला लागलेला हा कलंक संपुष्टात आणावा.