विकसित राष्ट्राच्या संकल्पात फ्रान्स भारताचा महत्त्वाचा भागीदार : मोदी

0
3

फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल फ्रेंच राष्ट्रीय दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत भाग घेतला. बॅस्टिल डे परेड ही या दिनाची मुख्य आकर्षण होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या संकल्पात आम्ही फ्रान्सकडे नैसर्गिक भागीदार म्हणून पाहतो, असे सांगितले. तसेच मेक-इन-इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनांमध्ये फ्रान्स हा महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगितले.

आम्ही आमच्या धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी करत आहोत. मागील 25 वर्षांच्या मजबूत पायाच्या आधारे आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत. त्यासाठी धाडसी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली जात आहेत.

भारतातील लोकांनी स्वतःला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. या प्रवासात, आम्ही फ्रान्सला नैसर्गिक भागीदार म्हणून पाहतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत संयुक्त भाषणात सांगितले. भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणाली फ्रान्समध्ये लवकरच सुरू केली जाईल, असेही मोदींनी यावेळी सांगितले. दरम्यान, या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने म्हणजेच ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ सन्मानित करण्यात आले.