चहलच्या ‘नो बॉल’मुळे भारताचा पराभव

0
80

यजमान दक्षिण आफ्रिकेने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ५ गड्यांनी विजय मिळवत सहा सामन्यांच्या मालिकेतील आपले आव्हान कायम राखले होते. पहिले तिन्ही सामने जिंकून मालिका विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या भारतीय संघाच्या विजयी दौडीला या पराभवामुळे ब्रेक लागला. केवळ २७ चेंडूंत नाबाद ४३ धावा केलेला यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २९० धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे द. आफ्रिकेपुढे ‘डकवर्थ लुईस’ नियमानुसार २८ षटकात २०२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १८व्या षटकात युजवेंद्र चहल गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर चहलने मिलरला त्रिफळाचीत केले, मात्र टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे स्पष्ट दिसल्याने तिसर्‍या पंचांनी मिलरला नाबाद ठरवले. ही घटना घडली तेव्हा आफ्रिकेच्या पाच बाद १०६ धावा झाल्या होत्या. मिलर सात धावांवर खेळत होता आणि जिंकण्यासाठी ६१ चेंडूत ९६ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर मिलरने २८ चेंडूत ३९ धावांची दमदार खेळी करत आफ्रिकेला विजय मिळवून दिला. मिलर वैयक्तिक ६ धावांवर असताना श्रेयस अय्यर याने सीमारेषेवर त्याचा झेल सोडला होता. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध तुफानी फटकेबाजी करत असताना भुवनेश्‍वर कुमार, बुमराह व पंड्या या मध्यमगती गोलंदाजांना मागे ठेवण्याची विराटची रणनीतीदेखील समजण्यापलीकडे होती. मालिकेतील पाचवा सामना मंगळवार १३ रोजी खेळविला जाणार आहे.

धावफलक
भारत ः ७ बाद २८९ धावा, दक्षिण आफ्रिका (लक्ष्य २८ षटकांत २०२) ः ऐडन मारक्रम पायचीत गो. बुमराह २२, हाशिम आमला झे. कुमार गो. कुलदीप ३३, जेपी ड्युमिनी पायचीत गो. कुलदीप १०, एबी डीव्हिलियर्स झे. शर्मा गो. पंड्या २६, डेव्हिड मिलर पायचीत गो. चहल ३९, हेन्रिक क्लासेन नाबाद ४३, आंदिले फेलुकवायो नाबाद २३, अवांतर ११, एकूण २५.३ षटकांत ५ बाद २०७, गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-०-२७-०, जसप्रीत बुमराह ५-०-२१-१, कुलदीप यादव ६-०-५१-२, हार्दिक पंड्या ५-०-३७-१, युजवेंद्र चहल ५.३-०-६८-१
दक्षिण आफ्रिकेला दंड
चौथ्या वन-डे सामन्यात षटकांची गती न राखल्याप्रकरणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दक्षिण आफ्रिकेला शिक्षा सुनावली आहे. आफ्रिकेच्या संघातील प्रत्येक खेळाडूंच्या मानधनातली १० टक्के रक्कम कापून घेण्यात आली असून कर्णधार ऐडन मारक्रम याच्या मानधनातली मात्र दुप्पट रक्कम शिक्षा म्हणून कापून घेण्यात आली आहे. १२ महिन्यांच्या कालावधीत पुन्हा असा प्रकार घडल्यास मारक्रमवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.