– शशांक मो. गुळगुळे
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवार, २२ जानेवारी रोजी फतवा काढला की, २००५ सालापर्यंत छापल्या गेलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा ३१ मार्च २०१४ नंतर बाहेर काढल्या जातील. १ एप्रिल २०१४ पासून या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा दिल्या जातील. १० नोटांपेक्षा जास्त नोटा बदलता येणार नाहीत. जर जास्त नोटा असतील तर त्या व्यक्तीला आपली पूर्ण माहिती बँकेला सादर करावी लागेल. तसे पाहता रिझर्व्ह बँक दरवर्षी खराब झालेल्या लक्षावधी नोटा चलनातून बाद करीत असतेच. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार असे दिसून आले आहे की, २०१२-१३ या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने एकूण १४.१ बिलियन खराब नोटा नष्ट केल्या.
मग २००५ पर्यंतच्या नोटा बाद करण्याचा फतवा असा अचानक का काढावा लागला? याबाबतीत दोन मतप्रवाह आहेत. काही तज्ज्ञांच्या मते दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने हा आदेश काढण्यात आला आहे, तर दुसरा मतप्रवाह असा आहे की, भारताच्या चलन व्यवस्थेत खोट्या नोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे व या खोट्या नोटा चलनातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने हा आदेश काढण्यात आला आहे. ३१ मार्च २००५ पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांची किंमत ३ लाख ६७ हजार २२७ कोटी रुपये इतकी होती. यात ५०० व १००० रुपयांच्या नोटांची किंमत १ लाख ९४ हजार ८१० कोटी रुपये इतकी होती. यातल्या कित्येक नोटा गेल्या नऊ वर्षांत नष्टही करण्यात आलेल्या असणार. मार्च २००५ ते मार्च २०१३ या कालावधीत ७ लाख ७० हजार ९९० कोटी रुपयांच्या नव्या नोटांची भर चलन व्यवस्थेत पडली आहे. ही रक्कम २००५ पर्यंतच्या नोटांच्या किमतीच्या सुमारे चारपट आहे. त्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी हा फतवा नसावा असे मानता येईल. चलनातील खोट्या नोटांना पायबंद बसावा म्हणून हा फतवा काढला असावा असे वाटते. काळा पैसा साठविणारे २००५ च्या नोटा अजूनपर्यंत स्वतःकडे ठेवण्याची शक्यता फार कमी वाटते. काळा पैसा नंतरच्या नोटांच्या रूपात फार मोठ्या प्रमाणात आहे. या फतव्यामागे काळा पैसा बाहेर काढण्याचा उद्देश असता तर किमान २०१० पर्यंतच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला असता. आता जी मार्चपर्यंत मुदत दिली आहे तशी न देता तडकाफडकी निर्णय घेतला गेला असता. १९७८ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी एका रात्रीत हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यावेळी सुरत येथील हिर्याच्या व्यापार्यांनी हजार रुपयांच्या नोटांत तंबाखू भरून त्याच्या विड्या करून ओढल्या अशी वदंता बाजारपेठांत पसरली होती. रिझर्व्ह बँकेने हा आदेश खोट्या नोटांना आळा घालण्याच्या उद्देशाने दिला असावा असे वाटते. भारताच्या ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेने भक्कम पुराव्यांनिशी सिद्ध केले आहे की, भारतीय चलनात खोट्या नोटा या बर्याच प्रमाणात पाकिस्तानकडून व काही प्रमाणात बांगलादेशकडूनच येतात. दुसर्या महायुद्धाच्या वेळी रशियाचे त्यावेळचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी असे म्हटले होते की, हिटलरच्या जर्मनीला जर कायमचे पंगू करायचे असेल तर लष्करी साहित्याबरोबर जर्मनीच्या चलनात खोट्या नोटा समाविष्ट करा. स्टॅलिनचे हे बोल पाकिस्तानने फारच मनावर घेतलेले आहेत. पाकिस्तानच्या लष्कराला याची पूर्ण कल्पना आहे की, भारताबरोबर युद्ध करून आपण जिंकू शकत नाही, त्यापेक्षा भारतीय चलनात खोट्या नोटा मिसळून भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत करावी. आयएसआय ही पाकिस्तानी हेर संघटना पाक सरकारवर दबाव आणून सरकारी खर्चाने कराची, लाहोर, क्वेट्टा, मुलतान व पेशावर येथील सरकारी मालकीच्या छापखान्यांतून खोट्या नोटा छापून घेऊन नेपाळ, चीन व हॉंगकॉंगमार्गे या नोटा भारतात वितरित करते अशी माहिती ‘रॉ’कडे आहे.
१९९६ पासून गांधीजींच्या सिरीजच्या नोटा छापल्या जात आहेत. या नोटांवर छपाईचे वर्ष लिहिलेले नाही व या नोटांंच्या हुबेहूब प्रतिकृती करणे फारच सोपे आहे म्हणून २००५ पर्यंत छापल्या गेलेल्या नोटांच्या खोट्या प्रतिकृती पाकिस्तानने छापून वितरित केल्या आहेत. या खोट्या नोटांसाठी वापरलेल्या कागदांची घनता तपासली असता असे दिसून आले की, पाकिस्तानी नोटांच्या कागदांची घनता व खोट्या नोटांच्या कागदांची घनता समान आहे. (घनता= गॅ्रमवजन आकारमान) तसेच या कागदांचा वॅक्स पिक कोशंट व पी-एच व्हॅल्यू समान आहे. या सर्व गोष्टी खोट्या नोटा निर्मितीत पाकिस्तानचा सहभाग दर्शवितात. या खोट्या नोटांसाठी लागणारी यंत्रसामग्री अत्यंत अद्ययावत व खर्चिक आहे. एखादा देशच अशा प्रकारची यंत्रसामग्री नोटांसाठी खरेदी करू शकतो. खोट्या नोटा तयार करणे अवघड व्हावे या दृष्टीने २००६ पासून भारताने ५०० व १००० रुपयांच्या नोटा तयार करताना बर्याच सुधारणा केल्या. नोटांत ऑप्टिकली व्हेरीएबल इंक वापरल्यामुळे नोटा जमिनीला समांतर धरून पाहिल्या तर नोटांवरचे ५०० व १००० हे आकडे हिरवे दिसतात. नोटा थोड्याशा तिरप्या धरल्या तर हे आकडे निळे दिसतात. भ्रामक प्रतिमा या तंत्राचा वापर केल्यामुळे नोटा जमिनीला समांतर धरल्या तरच त्यात ५०० व १००० रुपयांचे दुसरे आकडे दिसतात. नोटा थोड्या जरी तिरप्या केल्या तर हे दुसरे आकडे दिसत नाहीत. यंत्रामध्येच दिसू शकेल असा सुरक्षा-धागा या नोटांत घालण्यात आला आहे. नोटांवरील सुरक्षा-धाग्यांवर भारत व आरबीआय ही अक्षरे अतिसूक्ष्म आकारात लिहिली आहेत. हा सुरक्षा-धागा एका बाजूने सरळ रेषेत तर दुसर्या बाजूने तुटक, खंडित स्वरूपात दिसतो. इलेक्ट्रोटाईप वॉटर मार्कमुळे अशा नोटांची नक्कल करणे जवळपास अशक्य आहे व रिझर्व्ह बँकेने २००६ नंतर आपल्या परीने याबाबतीत पूर्ण काळजी घेतली आहे. म्हणून त्यापूर्वीच्या म्हणजे २००५ पर्यंतच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ३० जानेवारी २०१४ रोजी नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीच्या खास कोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी खोट्या नोटा प्रसारित करण्याच्या गुन्ह्याला राष्ट्रद्रोह मानून यातील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याचा अर्थ भारत देश खोट्या नोटांना पायबंद घालण्यासाठी आर्थिक तसेच कायदेशीर असे दोन्ही मार्ग अवलंबित आहे. नवी दिल्लीच्या पोलीस दलाचे डेप्युटी कमिशनर त्यागी यांनी काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले होते की, बांगला देशच्या हायकमिशनने दिल्ली येथील बँकेच्या हायकमिशनच्या खात्यात नोव्हेंबर २०१३ मध्ये १६ लाख रुपयांची रोख रक्कम भरली होती. त्या नोटा तपासल्या असता असे आढळून आले की, यात १० नोटा खोट्या आहेत. याचा अर्थ सरकारी यंत्रणेकडूनही खोट्या नोटा भरल्या जातात म्हणजे याचे स्वरूप किती भयानक आहे पाहा. याला आळा बसण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने हा फतवा काढला आहे.