एकमेकांविरोधात उतरण्याची शक्यता
विविध कारणांमुळे एकेकाळी चर्चेत राहिलेले दक्षिण गोव्यातील दोन दिग्गज माजी आमदार चर्चिल आलेमाव व मिकी पाशेको यानी 2027 साली होऊ घातलेली गोवा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. बाणावली मतदारसंघाचे माजी आमदार असलेले हे दिग्गज पुढील निवडणुकीत याच मतदारसंघातून एकमेकाविरूद्ध निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व दक्षिण गोव्याचे माजी खासदार असलेल्या चर्चिल आलेमाव यांनी दै. नवप्रभाशी बोलताना आपण पुढील निवडणूक ही बाणावली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा विचार करीत असल्याचे स्पष्ट केले. सध्या तरी आपण उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नसून या घडीला अपक्ष उमेदवार म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चर्चिल आलेमाव यांचे प्रतिस्पर्धी व बाणावली मतदारसंघातून त्यांचा 2002 सालच्या गोवा विधानसभा निवडणुकीत पराभव करणारे नेते मिकी पाशेको यांनीही यावेळी बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून तशी घोषणाही केल्याने यंदा पुन्हा या दोन दिग्गज नेत्यांमध्ये बाणावलीत टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चर्चिल आलेमाव हे यापूर्वी गोवा विधानसभेच्या बाणावली व नावेली मतदारसंघातूनही विजयी झालेले आहे. 2007 साली नावेलीतून निवडणूक लढवताना त्यांनी त्यावेळी तेथील काँग्रेसचे दिग्गज उमेदवार व नेते लुईझिन फालेरो यांचा पराभव केला होता. ‘सेव्ह गोवा फ्रंट’च्या उमेदवारीवर त्यानी ही निवडणूक लढवली होती.
काही दिवसांपूर्वी आलेमाव यांनी आपण आपले पुतणे व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्या कुंकळ्ळी मतदारसंघातून पुढील निवडणूक लढवणार असल्याचेही म्हटले होते.
मिकी पाशेको यांनीही आपण बाणावलीतून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले असता, त्याबाबत बोलताना त्यांनी, कुणीही निवडणूक लढवू शकतो. कुणी कुणाला अडवू शकत नाही. बाणावलीतील लोकांवर आपला विश्वास असून ते आपल्या पाठिशी उभे राहतील असा विश्वास असल्याचे आलेमाव म्हणाले.
मिकींची पत्नीही रिंगणात
दरम्यान, बाणावली व नुवे अशा दोन मतदारसंघाचे यापूर्वी प्रतिनिधीत्व केलेल्या मिकी पाशेको यांनी यावेळी आपण बाणावलीतून तर आपली पत्नी वायोला पाशेको या नुवे मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे.