चंदीगडला आघाडीचे ३ गुण

0
132

गोवा व चंदीगड यांच्यातील पर्वरी येथे झालेला सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सहाव्या फेरीतील हा सामना जीसीए अकादमी मैदानावर खेळविण्यात आला. चंदीगडने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ३ गुणांची कमाई केली तर गोव्याने दुसर्‍या डावात चिवट फलंदाजी करत पराभव टाळताना एक गुण आपल्या खात्यात जमा केला. पहिल्या डावाच्या आधारे ३२९ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर गोव्याने दुसर्‍या डावात ६ बाद २५३ धावा केल्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सलामीवीर सुमीरन आमोणकर (६४ धावा, २९० चेंडू, ७ चौकार) व अमूल्य पांड्रेकर (६० धावा, १८३ चेंडू, ८ चौकार) यांनी समयोचित खेळ दाखवला. श्रेष्ठ निर्मोही याने अमूल्यला बाद करत चंदीगडला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. कर्णधार अमित यादव व सुमीरन २१ धावांच्या फरकाने बाद झाले. स्नेहल कवठणकर ३० धावा करून नाबाद राहिला. सहा सामन्यांतून गोव्याचे ३० गुण झाले असून एवढ्याच सामन्यांतून चंदीगडच्या खात्यात २६ गुण जमा आहेत. २७ जानेवारीपासून गोवा-अरुणाचल यांच्यात पर्वरी येथे सातव्या फेरीचा सामना होईल.