घ्या काळजी आपल्या ‘स्वरयंत्रा’ची

0
489
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

सर्वांत प्राथमिक लक्षण जे बहुतांश सर्वच स्वरयंत्राच्या संबंधित आजारांमध्ये असते ते म्हणजे आवाजात बदल होणे. आवाज स्पष्ट न येणे, घोगरा होणे, आवाज बसणे, फाटल्यासारखा वाटणे, बोलताना त्रास होणे- घसा दुखणे, कोरडा खोकला येणे अशा अनेक तक्रारी असतात.

आपण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाची काळजी घेतली पाहिजे. पण आपण स्वरयंत्राच्या बाबतीत ती कमीच घेत असतो. ‘स्वरयंत्र’ हा शरीराचा असा एक महत्त्वपूर्ण भाग आहे ज्याला मार लागल्यास, इजा पोहोचल्यास एखाद्याचा स्वर किंवा आवाज हा आयुष्यभरासाठी विकृत होऊ शकतो व कायमचा जाऊही शकतो आणि यालाच ‘मूकत्व येणे’ असे म्हणतात. अर्थातच हा मार आतून आहे की बाहेरून; सौम्य आहे की मध्यम, तीव्र; कारण कुठले..? यांसारख्या कित्येक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

स्वरयंत्र म्हणजेच आधुनिक शास्त्रात लॅरिंक्स व त्याला संबंधित असलेले व्होकल कॉर्डस्. आवाज तयार होण्यासाठी फुप्फुसाची भूमिकादेखील तेवढीच महत्त्वाची ठरते. हे सर्व व्हॉईस बॉक्सचा भाग आहे.

सर्वांत प्राथमिक लक्षण जे बहुतांश सर्वच स्वरयंत्राच्या संबंधित आजारांमध्ये असते ते म्हणजे आवाजात बदल होणे. आवाज स्पष्ट न येणे, घोगरा होणे, आवाज बसणे, फाटल्यासारखा वाटणे, बोलताना त्रास होणे- घसा दुखणे, कोरडा खोकला येणे अशा अनेक तक्रारी असतात.
वाढत्या वयामुळे, व्यसनांमुळे (धूम्रपान, मद्यपान इ.), ऍलर्जी, घशातील आजार (जीइआरडी; इन्फेक्शन; सर्दी, कॅन्सर, ट्यूमर, स्ट्रोक, थायरॉइड ग्रंथीला सूज येणे- त्याचा आकार वाढणे- गाठी उत्पन्न होणे), चुकीच्या पद्धतीने घसा साफ करण्याच्या सवयींमुळे व सदोष दिनचर्या (दिवसभरात ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या), शरीराला अनावश्यक ते पदार्थ खाल्ल्‌‌याने- प्यायल्याने, काहीवेळा मानसिक आजार- ताणतणावांमुळे, मज्जातंतूचे विकार (न्यूरॉलॉजिकल डिसॉर्डर- पार्किंसोनीसम, मल्टीपल स्क्लॅरोसिस), शस्त्रक्रियेच्या वेळी तेथे मार लागल्याने (अन्ननलिका, गळा, छाती, थायरॉइड ग्रंथी यांची शस्त्रक्रिया) इ. कारणाने स्वरभेद होऊ शकतो.
अतिउच्च स्वरात सतत बोलल्याने, आवाजाचा अतिप्रमाणात वापर केल्याने, किंचाळल्याने या व्होकल कॉर्ड्सवर जास्त भार, तणाव पडतो व ते थकतात. अशाने प्राकृत स्वर उच्चारण्यासदेखील त्रास होताना दिसून येतो. जे वक्ते, शिक्षक, मंत्री, पत्रकार ज्यांना सतत बोलावे लागते त्यांच्यावर जास्त प्रमाणात दिसते.

आपण दात घासताना जेव्हा जीभ व घसा साफ करत असतो (टूथब्रश किंवा बोटाने) तेव्हा ते फक्त दात व जिभेपर्यंतच मर्यादित ठेवावे व घशापर्यंत नेऊ नयेत कारण जर तेथील व्होकल कॉर्डस् व इतर आसपासच्या अवयवांना इजा पोहोचली तर रक्तस्राव, वेदना, स्वरभेद, सूज इत्यादी होऊ शकते.

तसेच एखाद्या नाकाच्या व्याधीमुळे जर नाक चोंदले असेल तर साहजिकच आहे, तिथून श्वासोश्वास मर्यादित होतो व आपण मुखाने श्वास घेऊ लागतो. पण जर हे सतत चालू राहिले तर हवेतील जंतू थेट मुखाच्या संपर्कात येऊन इन्फेक्शन घडवून आणतात. टॉन्सीलायटीस, फॅरिंजायटीस, सायन्युसायटीस, ऍडीनॉयडायटीस या व्याधीतील सूज व इन्फेक्शन जर स्वरयंत्रामध्ये गेले तर तिथेही लक्षणे उत्पन्न करतात. थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढल्याने ती सूज स्वरयंत्रावर दाब देते आणि यामुळे स्वरयंत्राची हालचाल, कार्य बिघडते.

व्होकल कॉर्ड पॅरालिसिसमध्ये स्वर उच्चारताना श्वासाचा आवाज, घोगरा आवाज, वॉईस पिचमध्ये बदल, अन्न- पाणी- थुंकी गिळताना खोकला येणे/ठसका लागणे किंवा उबळ येणे, बोलताना श्वास कमी पडणे, मोठ्याने बोलायला त्रास होणे, पुन: पुन: घसा साफ करावासा वाटणे. व्होकल कॉर्ड नोड्यूल व व्होकल कॉर्ड पॉलीप यामुळेसुद्धा आवाजात बदल होतो.

अशा काहीही तक्रारी असतील तर कान-नाक-घसा तज्ञांना दाखवावे. नस्य, कवल, गण्डूष सारखे पंचकर्म, औषधांव्यतिरिक्त कदाचित स्पीच थेरेपी, स्पीच सिन्थेसायझर, वोकली-डी स्पीच टॅक्नोलॉजी, फ़ोनॅटीक ट्रान्स्नि्‌रपशन/फोनॅटीक स्क्रिप्ट यांसारख्या चिकित्सेची गरज पडू शकते.