किंग्ज पंजाबची दिल्लीवर पाच गड्यांनी मात

0
276

>> शिखर धवनचे नाबाद शतक निष्फळ

निकोलस पूरन याच्यासह ख्रिस गेल व ग्लेन मॅक्सवेल यांनी दिलेल्या मौल्यवान योगदानाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने काल मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी व ६ चेंडू राखून पराभव केला. पंजाबच्या विजयामुळे शिखर धवनने ठोकलेले शतक व्यर्थ ठरले. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील या ३८व्या सामन्यात दिल्लीने विजयासाठी ठेवलेले १६५ धावांचे लक्ष्य पंजाबने एक षटक शिल्लक ठेवून गाठले.

धावांचा पाठलाग करताना पंजाबने कर्णधार राहुलला लवकर गमावले. अक्षरला पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याच्या नादात राहुल मिड ऑनवर झेल देत बाद झाला. चौथ्या षटकाअखेर पंजाबचा संघ १ बाद २४ अशा समाधानकारक स्थितीत होता. पाचव्या षटकात गेल तुषार देशपांडेवर तुटून पडला. ३ चौकार व २ षटकारांसह गेलने या षटकात २५ धावा जमवल्या. या झंझावातानंतर अश्‍विनने टाकलेल्या पुढील षटकाच्या दुसर्‍याच चेंडूवर गेल वादळ शमले. अश्‍विनने त्याचा त्रिफळा उडवला. याच षटकात चाचपडणारा मयंक अगरवाल ९ चेंडूंत ५ धावा करून बाद झाल्याने पंजाबचा संघ ३ बाद ५७ असा संकटात सापडला. पूरन व मॅक्सवेल यांनी संघाचा कोसळता डोलारा सावरताना चौथ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी केली. तेराव्या षटकात पूरन व सोळव्यामध्ये मॅक्सवेल बाद झाल्यामुळे पंजाबचा संघ पुन्हा एकदा विजयाच्या दारातून पराजित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, हुडा व नीशम यांनी सावध खेळ करत संघाला विजयी वेस ओलांडून दिली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने २ तर रविचंद्रन अश्‍विन व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला ५ बाद १६४ धावांपर्यंतच पोहोचता आले. शिखर धवन याला दुसर्‍या टोकाने अपेक्षित साथ न लाभल्याने दिल्लीला १८० पार जाता आले नाही. धवनने १२ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०६ धावा केल्या तर फलंदाजीची संधी मिळालेल्या उर्वरित पाच खेळाडूंनी मिळून ५९ चेंडूंचा सामना करत ५४ धावा जमवल्या. पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक २ गडी बाद केले.

धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. मॅक्सवेल गो. नीशम ७, शिखर धवन नाबाद १०६ (६१ चेंडू, २ चौकार, ३ षटकार), श्रेयस अय्यर झे. राहुल गो. अश्‍विन १४, ऋषभ पंत झे. अगरवाल गो. मॅक्सवेल १४, मार्कुस स्टोईनिस झे. अगरवाल गो. शमी ९, शिमरॉन हेटमायर त्रि. गो. शमी १०, अवांतर ४, एकूण २० षटकांत ४ बाद १६४
गोलंदाजी ः ग्लेन मॅक्सवेल ४-०-३१-१, मोहम्मद शमी ४-०-२८-२, अर्शदीप सिंग ३-०-३०-०, जिमी नीशम २-०-१७-१, मुरुगन अश्‍विन ४-०-३३-१, रवी बिश्‍नोई ३-०-२४-०
किंग्ज इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. सॅम्स गो. पटेल १५, मयंक अगरवाल धावबाद ५, ख्रिस गेल त्रि. गो. अश्‍विन २९, निकोलस पूरन झे. पंत गो. रबाडा ५३ (२८ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार), ग्लेन मॅक्सवेल झे. पंत गो. रबाडा ३२, दीपक हुडा नाबाद १५, जिमी नीशम नाबाद १०, अवांतर ८, एकूण १९ षटकांत ५ बाद १६७
गोलंदाजी ः डॅनियल सॅम्स ४-०-३०-०, कगिसो रबाडा ४-०-२७-२, अक्षर पटेल ४-०-२७-१, तुषार देशपांडे २-०-४१-०, रविचंद्रन अश्‍विन ४-०-२७-१, मार्कुस स्टोईनिस १-०-१४-०

आयपीएलमध्ये सलग दोन शतके ठोकणारा धवन पहिला खेळाडू
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग दोन शतके ठोकणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान सलामीवीर शिखर धवन याने काल मंगळवारी मिळविला. किंग्ज पंजाबविरुद्ध धवनने १०६ धावांची नाबाद खेळी केली. तीन दिवसांपूर्वीच धवनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतकी वेस ओलांडत स्पर्धेतील आपल्या पहिल्या शतकाची नोंद केली होती. काल धवनने अर्शदीपने टाकलेल्या डावातील १९व्या षटकात दोन धावा घेत सलग दुसरे शतक साजरे केले. तत्पूर्वी धवनने आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला. यासह त्याने त्याने विराट कोहली (५७५९), सुरेश रैना (५३६८) व रोहित शर्मा (५१५८) यांच्या यादीत स्थान मिळविले.