घोटाळेबाजांनीच केले घोटाळ्याचे आरोप

0
115
  • दत्ता भि. नाईक

आतापर्यंत प्रत्येक पैन् पैचा हिशेब ठेवणार्‍या रामभक्तांवर असे आरोप करून या राजकीय नेत्यांनी स्वतःचीच प्रतिमा मलीन करून घेतलेली आहे. आता जनता कसा निर्णय करेल हे पाहायचे आहे. अखेरीस घोटाळेबाजांनीच घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत हेच खरे आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीवर मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे मंदिर व्हावे म्हणून गेली जवळजवळ चारशे नव्वद वर्षे निरनिराळ्या उपलब्ध मार्गांनी केलेल्या प्रयत्नांस अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या निकालामुळे यश आले आणि राममंदिराच्या निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी झालेल्या शिलान्यासानंतर ‘हे मंदिर व्हावे ही श्रींची इच्छा’ अशा भावनेने रामभक्त वावरले. हा प्रकल्प विश्‍व हिंदू परिषदेच्या पुढाकारामुळे उभा राहात असला तरी याचा लाभ कोणत्यातरी राजकीय पक्षाला व्हावा हे अपेक्षित नव्हते. ज्यावेळी शिलान्यास करण्यात आला होता त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते स्व. नारायणदत्त तिवारी व देशाचे पंतप्रधान होते स्व. श्री. राजीव गांधी. म्हणजे दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस पक्षाची सरकारे होती. शिलापूजनासाठी निवडलेली जागा मंदिराच्या तत्कालीन समितीच्या ताब्यात होती. परंतु मंदिराच्या त्यावेळच्या आराखड्यात ताब्यात नसलेल्या जमिनीचा अंतर्भाव होता. तसे पाहता हे कृत्य बेकायदेशीर ठरवता आले असते, परंतु स्व. नारायणदत्त तिवारी यांनी आपण रामविरोधी आहोत असा स्वतःवर शिक्का बसू नये याची काळजी घेतली. याला राजकीय परिपक्वता म्हणतात. आजकाल ही राजकीय परिपक्वता स्वतःला विरोधी पक्ष म्हणवून घेणार्‍यांमध्ये दिसत नाही. म्हणून आम आदमी पक्ष व समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या दिल्लीस्थित पंजीकृत ट्रस्टने अयोध्येतील अतिरिक्त जमीन खरेदीत गैरव्यवहार करून जास्ती पैसे खर्च केल्याचा आरोप केलेला आहे.

स्वा. विवेकानंद शिलास्मारकाचा आदर्श
५ ऑगस्ट २०२० रोजी भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. या वेळेस देशातील तीन हजारपेक्षा अधिक नद्यांचे जल आणण्यात आले. विभिन्न जाती, जनजाती यांची पवित्र जन्मस्थाने व अन्य पवित्र स्थानांवरून तसेच बलिदान दिलेल्या कारसेवकांच्या गावांतूनही या ठिकाणी मृत्तिका आणण्यात आली. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या भावनेचा उच्चांक गाठणारा व सामाजिकदृष्ट्या सर्वांचा सन्मान करणारा असा हा सोहळा होता. जानेवारी १५ ते फेब्रुवारी २७ या कालावधीत देशभर निधीसंकलन करण्यात आले व त्यात कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त कितीही असे निधीसंकलन करण्यात आले. यातही रामभक्तांना भरघोष यश लाभले.
यापूर्वी साठच्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सहकार्यवाह एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारीला श्री शिलेवर स्वामी विवेकानंदांचे मंदिर उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला तेव्हा देशातील धनाढ्य लोक मोठा निधी देण्यास तयार होते. परंतु देशातील सामान्यातील सामान्य माणसाचा हातभार या कार्याला लागला पाहिजे म्हणून त्यांनी पन्नास पैसे व एक रुपयी कुपन्स विक्रीला काढली होती. याचप्रमाणे श्रीराममंदिराच्या बाबतीतही हीच कल्पना राबवल्यामुळे सामान्यातील सामान्य लोकांचा या कार्यामध्ये आर्थिक सहभाग प्राप्त झाला.

पिढी बदलली तरी आरोप तेच
कोणतेही चांगले कार्य सुस्थितीत चालले असता त्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला की लोकांच्या मनात संशय उत्पन्न होतो म्हणून काही राजकीय पक्षांच्या विघ्नसंतोषी कार्यकर्त्यांनी ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला व त्यात आरोप करणारेच अधिक अडकणार असे दिसते.

माणसाला दुसर्‍याच्या चरित्रामध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसते असे म्हणतात. स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे काम सुरू झाले तेव्हा याचा लाभ कॉंग्रेस पक्ष उठवू शकणार नाही हे लक्षात आल्यामुळे मध्य प्रदेशमधील कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन ज्येष्ठ नेते पी. सी. सेठी यांनी स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचा निधी भारतीय जनसंघाने हडप केला असा आरोप केला होता हे वाचकांना स्मरत असेलच.

१९८९ मध्ये शिलापूजनाचे कार्यक्रम देशभर गावोगावी होऊ लागले व त्याबरोबर अन्य प्रमाणात निधी संकलनही सुरू झाले. पाठोपाठ श्रीराम पादुकापूजन, श्रीरामज्योती, रामनामाचा जप असे अनेक कार्यक्रम झाले. या काळात दूरदर्शनवर अयोध्येतील एका भटजीची मुलाखत दाखवण्यात आली. ‘इतके सगळे पैसे गोळा केले असे ऐकतो, परंतु माझ्यापर्यंत काहीच पोहोचले नाही’ असे तो मुलाखतीत म्हणत होता. जगातील कोणत्या मंदिराच्या इमारतीच्या उभारणीसाठी गोळा केलेला निधी भटजीच्या हातात सोपवला जातो हे समजण्याची कुवतही दूरदर्शनचे तत्कालीन अधिकारी गमावून बसले होते.

याच काळात श्री. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहारमध्ये समष्टीपूर येथे लालू प्रसाद यांच्या सरकारने अडवल्यामुळे व्ही. पी. सिंह यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय जनता पार्टीने मागे घेतला. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राममंदिराच्या नावाने गोळा केलेला निधी भारतीय जनता पार्टीने खर्च केल्याचे आरोप केले जाऊ लागले. पिढी बदलली तरी आरोप करण्याची परंपरा बदलली नाही.

चंपतराय यांचा खुलासा
या खेपेस आरोप करणारे पक्ष बदलले आहेत. निष्प्रभ होत चाललेला कॉंग्रेस पक्ष आणि पक्षाचे सैरभैर झालेले नेतृत्व आरोप करण्याइतकेही प्रबळ राहिलेले नाही. त्याची जागा आता आम आदमी पार्टी व समाजवादी पक्षाने घेतलेली आहे. तरीही या दोन्ही पक्षांच्या म्हणण्यासमोर मान तुकवण्याचे काम आजचा कॉंग्रेस पक्ष करत आहे. संजय सिंह या महाभागानी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या मंदिर उभारणी करणार्‍या ट्रस्टने जमीन खरेदीत घोटाळा करून अतिरिक्त पैसे खर्च केल्याचा आरोप केला व लागलीच कॉंग्रेस पक्षाने ट्रस्टकडून खुलासा केला जावा अशी मागणी केली.

ट्रस्टला अतिरिक्त भूमीची आवश्यकता होती. मंदिर म्हणजे फक्त पूजास्थान नव्हे तर या ठिकाणी कित्येक प्रकल्प उभे राहणार आहेत. नुसती देवळे बांधून काय करणार? म्हणणार्‍यांना यात उत्तर मिळालेले आहे. आवश्यक असलेली भूमी खरेदी केली गेली व हेच निमित्त करून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला गेला.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सहकार्यवाह श्री. चंपतराय यांनी जमीन खरेदी व्यवहारातील प्रत्येक बाबीचे मुद्देसूद उत्तर दिल्यामुळे आरोप करणारेच तोंडघशी पडले. ही जमीन अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. राममंदिर बनणार हे निश्‍चित झाल्यावर सर्वजणांचे या क्षेत्राकडे लक्ष वेधले गेले आहे व जमिनीचे भाव जबरदस्त भडकले आहेत. अशा स्थितीत ही जमीनखरेदी बाजारभावापेक्षा कमी दराने ट्रस्टला विकली गेलेली आहे हेही सिद्ध झाले आहे.

निवडणुकीचे राजकारण
हा विषय उकरून काढण्याचे एकमेव व महत्त्वाचे कारण म्हणजे २०२४ साली येऊ घातलेली लोकसभेची निवडणूक आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे व मुख्यमंत्र्यांच्या नेतृृत्वाखाली मंदिर उभारणीचे काम चाललेले आहे. भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचे श्रेय भारतीय जनता पार्टीला जाणार आहे याची जाणीव सर्व विरोधी पक्षांना झालेली आहे. व्हॅक्सिनच्या विषयावरही दिशाभूल करण्याचे या मंडळीचे प्रयत्न फसलेले आहेत व म्हणूनच नैराश्येपोटी हे आरोप केले जात आहेत.

उत्तर प्रदेशमधून जास्तीत जास्त खासदार लोकसभेवर निवडून जातात. मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशच्याच जोरावर सत्ता हातात घेतलेली आहे व म्हणूनच उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारविरुद्ध वातावरणनिर्मिती केली की भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार पाडता येईल या आशेवर हे प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत प्रत्येक पैन पैचा हिशेब ठेवणार्‍या रामभक्तांवर असे आरोप करून या राजकीय नेत्यांनी स्वतःचीच प्रतिमा मलीन करून घेतलेली आहे. आता जनता कसा निर्णय करेल हे पाहायचे आहे. अखेरीस घोटाळेबाजांनीच घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत हेच खरे आहे.