घातक एके-२०३ रायफलची भारतात होणार निर्मिती

0
23

>> भारत आणि रशियामध्ये करारावर स्वाक्षर्‍या; एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची क्षमता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौर्‍यादरम्यान काल भारत आणि रशिया या देशांदरम्यान एके-२०३ रायफल निर्मितीबाबत तब्बल ५१०० कोटींच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

जगातील सर्वात घातक आणि यशस्वी ठरलेल्या एके-४७ या रायफलचे आधुनिक संस्करण म्हणजे एके-२०३. या करारांतर्गत भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांसाठी अमेठीच्या कारखान्यात सहा लाख रायफल्स बनवल्या जाणार आहेत. या रायफल्स सैन्याकडील स्वदेशी बनावटीच्या ‘इन्सास रायफल’ची जागा घेतील.

रशियन कंपनीच्या सहकार्याने एके-२०३ रायफल्सची निर्मिती भारतातच अमेठीमध्ये केली जाणार आहे. लष्करात कार्यरत मेजर जनरल या प्रकल्पाचे प्रमुख असतील. काल नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवनात दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये बैठक झाली. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगू यांनी याविषयीच्या ५ हजार १०० कोटींहून अधिक किंमतीच्या करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

डीआरडीओने बनवलेल्या इन्सास रायफल १९९० च्या दशकात लष्करात सामील करण्यात आल्या; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे भारतीय जवान दीर्घकाळापासून इन्सास रायफलच्या वापरात येणार्‍या अडथळ्यांचा सामना करत होते. त्यामुळे इन्सास रायफलला पर्याय शोधणे गरजेचे ठरले होते.

एके-२०३ ही रायफल एके ४७ रायफलची प्रगत आवृत्ती आहे. या रायफलचे जुने नाव एके-१०३ एम असे होते; पण हे नाव बदलून एके-२०३ करण्यात आले आहे. एके-२०३ च्या मॅगझिनमध्ये ३० गोळ्या येतील. ४०० मीटरच्या टप्प्यातील शत्रूला ही रायफल सहजच टीपू शकेल. ही रायफल इन्सास रायफलपेक्षा वजनाने हलकी आणि आकारमानाने लहान आहे. या रायफलचे वजन ४ किलो असेल.

भारतापूर्वी जगातील ३० हून अधिक देशांनी एके-२०३ ही अत्याधुनिक रायफल बनवण्याचा परवाना रशियाकडून घेतला आहे.

एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची क्षमता
एके-२०३ रायफलच्या मदतीने एका मिनिटात ६०० गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. म्हणजे एका सेकंदात दहा गोळ्या झाडल्या जातील. ही रायफल ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने वापरल्या जाऊ शकते. या रायफलची खासियत म्हणजे तीव्र थंडी, उन्हाळा किंवा पाऊस अशा कोणत्याही हवामानात ती गच्च न होता काम करू शकेल.