घरी विलगीकरणात राहणार्‍यांना आरोग्य कीट

0
298

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ

स्वत:च्या घरीच विलगीकरणात राहणार्‍या कोविड रुग्णांना उपचारासाठीचे कीट देण्याची सोय सरकारने केली असून काल येथील एका पंचतारांकित हॉटेलात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी कीट्‌स काही आरोग्य केंद्रांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते वितरित करण्यात आली. या कीट वितरण सोहळ्याला आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, आरोग्य सचिव अमित सतीजा, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. जुझे डिसा, गोमेकॉचे डिन शिवानंद बांदेकर, अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालक ज्योती सरदेसाई व अन्य मंडळी उपस्थित होती.
कोरोनाच्या काळात मडगाव येथील कोविड इस्पितळात सुमारे १५० महिलांची यशस्वीपणे प्रस्तुती झाली. त्यापैकी सर्व माता व त्यांची मुले सुरक्षित असून कुणालाही कोविडचा संसर्ग झाला नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

कोविड झाल्याचे समजल्यावर जे रुग्ण आपल्या घरीच विलगीकरणात राहणार आहेत त्यांना आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रातून हे कीट मिळवता येईल. केंद्रातील आरोग्याधिकार्‍यांच्या सूचनेनुसार या कीटमधील औषधांचे सेवन करता येईल. घरीच विलगीकरणात राहणार्‍या रुग्णांचा रोग बळावून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी या कीटची सोय करण्यात आली आहे, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, तत्पूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी तज्ञ समितीच्या बैठकीला हजेरी त्यांच्याशी कोविडप्रश्‍नी सविस्तर चर्चा केली.

मडगाव कोविड इस्पितळात
खाटा वाढवणार : विश्‍वजित
दक्षिण गोवा जिल्हा कोविड इस्पितळात आणखी २०० अतिरिक्त खाटांची लवकरच सोय करण्यात येणार असल्याचे आयोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. सध्या राज्यभरात ३५०० रुग्ण आपल्या घरी विलगीकरणात असून या रुग्णांना तातडीने कीट वितरित करण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रातून त्यांना हे कीट मिळवता येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आरोग्य अधिकारी दूरध्वनीद्वारे या रुग्णांच्या संपर्कात असतील. किटमधील औषधे कधी व कशी घ्यावीत यासंबंधीची सगळी माहिती हे डॉक्टर्स त्यांना देतील, असे राणे यांनी नमूद केले.

या रुग्णांसंबंधीची सगळी माहिती डिजिटली उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’कडे सोपवण्यात आली असल्याची माहितीही राणे यांनी दिली. दरम्यान, सध्या ७५० कोविड रुग्ण हे कोविड इस्पितळात उपचार घेत आहेत. तर अन्य ६०० जण हे विविध कोविड निगा केंद्रात आहेत, असे राणे यांनी नमूद केले.

उशिरा इस्पितळात आणल्याने बहुतांश रुग्णांचे निधन ः मुख्यमंत्री
कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्णांना गंभीर स्वरूपाचे अन्य आजार होते व त्यामुळेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याचे काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. उपचार्‍यादरम्यान निधन झालेले अन्य ५ टक्के रुग्ण हे आजाराने गंभीर रुप धारण केल्यानंतर उशिरा इस्पितळात आलेले रुग्ण होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड रुग्णांची आजारातून बरे होण्याची टक्केवारी ही ८५.९८ एवढी असून ती अन्य राज्यापेक्षा जास्त असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

कीटमधील वस्तू
घरी विलगीकरणात राहणार्‍या रुग्णांना देण्यात येणार्‍या कीटमध्ये प्रतीजैवके (अँटीबायोटिक्स), व्हिटामिन्स गोळ्या, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, ग्लोज, सॅनिटायझर, मास्क यांचा समावेश असेल.