घरगुती विजेच्या मागणीत वाढ : काब्राल

0
107

>> मोले अभयारण्यातील वीजवाहिन्यांचे समर्थन, श्‍वेतपत्रिका जारी

दरवर्षी राज्यात विजेच्या मागणीत ५ टक्क्यांनी वाढ होत असल्याचे सांगून उद्योगांपेक्षा घरगुती विजेसाठीच जास्त मागणी होत असल्याचा खुलासा वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल त्यासंबंधी काढलेल्या श्वेतपत्रिकेतून केला व मोले अभयारण्यातून वीजवाहिन्या ओढण्याच्या सरकारच्या प्रस्तावाचे पत्रकार परिषदेत समर्थन केले. काही मोजक्याच लोकांचा या वीजवाहिन्या ओढण्यास विरोध असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. २०१० ते २०२० या गेल्या १० वर्षांत राज्यात घरगुती विजेसाठीची मागणी दरवर्षी कशी व किती वाढत गेली याची टक्केवारीही काब्राल यांनी यावेळी सादर केली.

२०१०-११ ते २०११-१२ या वर्षी घरगुती (निवासी घरे व कृषी जोडण्या) यासाठीच्या वीज मागण्यांत ५ टक्क्यांनी, १२-१३ या वर्षी ४ टक्क्यांनी, १३-१४ व १४ ते १५ प्रत्येकी ४ टक्क्यांनी, १५ ते १६ या वर्षी ३ टक्क्यांनी, १६ ते १७ – ४ टक्क्यांनी, १७ ते १८ – १८ टक्क्यांनी, १८ ते १९ – ६ टक्क्यांनी, व १९ ते २० – ६ टक्क्यांनी वाढ झाली. तर चालू वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान केवळ १ टक्क्यांनी वाढ झाली. हे अत्यल्प प्रमाण हा कोविडचा परिणाम होता, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक विजेची मागणी १० वर्षांत कशी वाढत गेली त्यासंबंधी बोलताना ११ ते १२, १२ ते १३ व १३ ते १४ या वर्षांत दर वर्षी वीजेची मागणी ५ टक्क्यांनी वाढली. १४ ते १५ या वर्षी ते ३ टक्क्यांनी, १५ ते १६ या वर्षी ४ टक्क्यांनी व १६ ते १७ या दरम्यान ३ टक्क्यांनी, १७ ते १८, १८ ते १९ व १९ ते २० या दरम्यान दरवर्षी ७ टक्क्यांनी तर चालू वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान केवळ एका टक्क्याने वाढल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले.

घरगुती व कृषी वीज जोडण्याविषयी बोलताना काब्राल म्हणाले की २०१०-११ यावर्षी राज्यात ३७१२२८ एवढ्या जोडण्या होत्या. आता म्हणजे २०२० सालात या जोडण्या ५४९३८६ एवढ्या झाल्या आहेत. २०१०-११ साली सर्व प्रकारच्या औद्योगिक जोडण्या या ५५६१ एवढ्या होत्या. आता २०२० साली त्या ६६९१ एवढ्या आहेत. राज्यातील ११ केव्ही फिडर्स, राज्यातील वीज खांब, ट्रान्सफॉमर्स, ३३ केव्ही टॉवर्स, ३३ केव्ही खांब आदींचीही यावेळी काब्राल यांनी माहिती दिली.