>> वेर्णा येथे सापडले कमी वजनाचे १५ सिलिंडर; वजन-माप खात्याची धडक कारवाई; वाहनासह सिलिंडर जप्त
गेल्या काही दिवसांपासून वजन-माप खात्याच्या छापासत्रात राज्यात सातत्याने कमी वजनाचे घरगुती गॅस सिलिंडर आढळत आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरून पंचतारांकित हॉटेल्सना विकणारी टोळी राज्यात असल्याचे पुरावे सापडलेले असतानाच काल वेर्णा येथे एका निर्जनस्थळी गॅस सिलिंडर पुरवणारे वाहन आढळून आले. या वाहनाजवळ कमी वजनाचे १५ घरगुती सिलिंडर देखील वजन-माप खात्याच्या अधिकार्यांना सापडले. सदर सिलिंडर जप्त करण्यात आले असून, वजन-माप खात्याने केलेली महिनाभरातील ही तिसरी कारवाई आहे.
वजन-माप खात्याला वेर्णा येथे काल टाकलेल्या छाप्यात १५ कमी वजनाचे गॅस सिलिंडर सापडले. या ठिकाणी फेकून दिलेले काही व्यावसायिक सिलिंडर देखील आढळून आले. जप्त केलेले सिलिंडर हे आगशी येथील कनिष्क या एजन्सीचे असल्याचे सांगण्यात आले. ज्या जागेत हे वाहन सापडले, तिथे जवळच्या झाडाझुडुपांत कित्येक व्यावसायिक सिलिंडर टाकून दिलेले आढळून आले. तसेच तिथे गॅस सिलिंडरना बसविण्यात येणारी कित्येक सिल्स सापडली. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरण्यासाठीच ती तिथे आणली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मागाहून वजन-माप खात्याचे येणारे वाहन पाहून सिलिंडर वाहून नेणार्या वाहनचालकाने जंगलात पळ काढला. या प्रकरणी सदर वाहन जप्त करण्यात आले. वजन-माप खात्याचे निरीक्षक नितीन पुरुशन यांनी ही कारवाई केली.
वजन करूनच सिलिंडर द्या
यापूर्वी पर्वरी आणि बेताळभाटी येथे कमी वजनाचे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता गॅस वितरक कंपन्यांना वजन करून ग्राहकांना घरोघरी गॅस सिलिंडरचे वितरण करण्याची अट वजन-माप खात्याने घालावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. राज्यात विविध ठिकाणी सातत्याने कमी वजनाचे सिलिंडर सापडत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
महिनाभरातील तिसरी कारवाई
वजन-माप खात्याने केलेली ही मागील महिनाभरातील तिसरी कारवाई असून, यापूर्वी पर्वरी येथे घातलेल्या छाप्यात ३३ कमी वजनाचे, तर बेताळभाटी येथे केलेल्या कारवाईत १७ कमी वजनाचे सिलिंडर सापडले होते.