ग्रामीण भागात विज्ञान संस्कृती रुजावी

0
140

>> सी. एन. आर. राव : राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या आमसभेत आवाहन

विज्ञानाच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाबरोबरच योग्य नियोजन व नावीन्याचा वापर करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यात विज्ञान संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतरत्न सी. एन. आर. राव यांनी भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या ८५ व्या वार्षिक आमसभेनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना दोनापावल – पणजी येथे काल केले.
आपण विज्ञानाच्या विकासासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहता कामा नये. आपल्या देशातील वैज्ञानिकांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला योग्य पाठबळ देण्याची गरज आहे. विज्ञानाच्या विकासासाठी आवश्यक प्रमाणात निधी उपलब्ध होत नसला तरी हतबल होण्याची गरज नाही. देशातील अनेक शास्त्रज्ञांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाच्या विकासात मोठे योगदान दिलेले आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. कोरिया आणि जपान हे दोन्ही देश तंत्रज्ञानातील संशोधनामध्ये एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. चीन देश सुद्धा विज्ञान – तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आगेकूच करीत आहे. त्यामुळे भारत देशाने सुद्धा विज्ञान क्षेत्राकडे गंभीरपणे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आत्मविश्वास, परिश्रम, जिद्दीतून विविध समस्यांवर मात केली जाऊ शकते, असेही राव यांनी सांगितले.

युवा वर्गात विज्ञान संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विज्ञानाच्या विकासाचा योग्य आराखडा तयार करायला हवा. ग्रामीण भागाबरोबरच विद्यालयातून विज्ञान विषयाबाबत जागृती कार्यक्रमाचे आयोजन करून होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. देशातील युवा पिढीमध्ये गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला योग्य खतपाणी घालून योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. विज्ञान संशोधक, शिक्षकांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे. संशोधकांना आपल्या संशोधनात्मक निबंधाच्या प्रसारासाठी नवीन अंकांच्या प्रकाशनावर विचार करण्याची गरज आहे, असेही राव यांनी सांगितले.

अध्यक्षपदी डॉ. चंद्रमा शहा
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी डॉ. चंद्रमा शहा (नवी दिल्ली) यांची निवड झाली आहे. वर्ष १९३५ मध्ये स्थापन या अकादमीच्या प्रथम महिला अध्यक्ष होण्याचा मान डॉ. चंद्रमा यांना प्राप्त झाला आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष अजय सूद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अकादमीने पंतप्रधानांना वर्ष २०१७ मध्ये एक पत्र पाठवून विज्ञान विकासात येणार्‍या विविध समस्यांची माहिती दिली आहे. देशातील विज्ञान शिक्षणाबाबत अहवाल सादर करून कार्यवाहीची विनंती केली. संस्थेकडून विज्ञान न तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. विज्ञान शिक्षण धोरणाबाबत अहवाल सादर करण्यात आलेला आहे. अकादमीकडून शिक्षक, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विदेशात पंधरा दिवस ते तीन महिन्यांच्या संशोधनासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते, असेही सूद यांनी सांगितले.