भारतातील मूत्रपिंड व्यापाराचे अर्थशास्त्र

0
150
  • डॉ. रमेश कुमार

मूत्रपिंड रोपणाची वाढती जागतिक मागणी आणि भारतामधील गरीब, अडाणी, गरजूंचे वैद्यकीय अज्ञान यामुळे फसवून आणि पैसे देऊन मूत्रपिंडे काढून घेणार्‍या संघटित टोळ्या फोफावल्या आहेत. असे घोटाळे उजेडात आल्यानंतर सरकारने कायदा केला, परंतु तरीही हे गैरप्रकार थांबलेले नाहीत. ‘सेज’ प्रकाशित ‘किडनी ट्रान्स्प्लांटस् अँड स्कॅम ः इंडियाज् ट्रबलसम लेगसी’ या नव्या पुस्तकातील हे एक महत्त्वपूर्ण प्रकरण –

आजकाल भारतामध्ये मूत्रपिंडांचा व्यापार अतिशय गुंतागुंतीचा, प्रत्येक पातळीवरील फसवणुकीचा आणि कपट कारस्थानाचा बनलेला आहे. तो अब्जावधी डॉलरचा व्यापार आहे आणि या बेकायदेशीर व्यवसायाला तंत्रज्ञानाने मदत केलेली आहे. कायदाही झपाट्याने बदलत चाललेल्या या प्रकारच्या गुन्ह्यांना अटकाव करू शकत नाही.
पैशाचे व्यवहार अतिशय सोपे बनलेले असल्यामुळे ऑनलाइन व्यवहार करता येत असल्यामुळे मूत्रपिंडांचे दलाल स्वतः पडद्यामागे राहून आपला व्यवसाय भरभराटीला आणू शकतात आणि पूर्णपणे पडद्याआड राहतात. पैशांची आदानप्रदान अनेक पातळ्यांवर केली जाते आणि संपूर्ण नियंत्रण ‘बॉस’च्या – दुसर्‍या शब्दांत माफिया बॉसच्या हाती असते – जो नेहमीच अदृश्य असतो.

जागतिक मूत्रपिंड व्यापाराचे स्वरूप वॉशिंग्टन पोस्टमध्ये २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील माहितीतून लक्षात येईल. त्या वर्षाच्या सुरवातीस अमेरिकेतील १००,७९१ रुग्णांना मूत्रपिंड रोपणाची आवश्यकता होती व ते त्याच्या प्रतीक्षेत होते. त्या वर्षी, ४,७६१ लोक रोपणाविना मृत्युमुखी पडले आणि केवळ १७,१०७ लोकांना मूत्रपिंड रोपण करणे शक्य झाले.

जवळजवळ एक लाख अमेरिकी नागरिक मूत्रपिंड रोपणाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत आणि सुमारे बारा लोक रोज मूत्रपिंड विकाराने मृत्युमुखी पडत असतात. दरम्यान, दिवसा सरासरी दहा मूत्रपिंडांची विल्हेवाट लावली जाते असे नॅशनल किडनी फाऊंडेशन, न्यूयॉर्कचे म्हणणे आहे. यातून मूत्रपिंडांना असलेल्या जागतिक मागणीची कल्पना वाचकांना येऊ शकते. मूत्रपिंड खरेदी केली जाऊ शकतात ती भारतात!
मध्यस्थ आणि दलाल वेगवेगळ्या पातळ्यांवर वावरत असतात, पण एकमेकांच्या संपर्कात असतात. ‘बॉस’ ला माहीत असते की प्रत्येक पाऊल कसे टाकायचे. ‘मूत्रपिंड दाना’ चा हा व्यवसाय संघटित गुन्हेगारी सिंडिकेटस्‌नी यथास्थित जाळे विणलेला आहे आणि डॉक्टर हा त्याचा केवळ एक भाग असतो.

प्रसारमाध्यमांतील बातम्या सांगतात की भारतात सुमारे १०० मूत्रपिंड रोपण केंद्रे आहेत, ज्यापैकी ७५ टक्के खासगी क्षेत्रात आहेत. दरवर्षी सुमारे अडीच ते तीन हजार मूत्रपिंड रोपणे भारतात केली जातात. त्यापैकी केवळ १०० मूत्रपिंडे ही मृतदेहांद्वारे मिळवलेली असतात. रोपणासाठी येणारी सुमारे पन्नास ते साठ टक्के मूत्रपिंडे ही आजारी व्यक्तीशी काहीही संबंध नसलेल्या जिवंत ‘दात्यां’कडून आलेली असतात.
एका मूत्रपिंड रोपणासाठी सुमारे पाच ते वीस लाख रुपये लागतात. रुग्णाच्या आरोग्याची स्थिती, त्याची आर्थिक कुवत व गरज यावरून हे मूल्य ठरते. देशाच्या दूरच्या भागातून व शेजारच्या देशांतून येणार्‍या रुग्णांसाठी मूत्रपिंड रोपणाचा खर्च याहून अधिक असतो.

मूत्रपिंडांचा बेकायदेशीर व्यापार हा केवळ मागणी आणि पुरवठा याच्यापुरताच नाही, कारण मागणी ही नेहमीच अधिक असते. या संघटित टोळ्यांच्या लालसेमुळेच गरीब, अडाणी व्यक्तींना फशी पाडायचे आणि हेमोडायलिसिसवर जीवन अवलंबून असलेल्या गरजू रुग्णांना गाठायचे असा प्रकार चालतो. सूत्रधार, मध्यस्थ, दलाल आणि प्रत्यक्षात ‘दाते’ शोधण्यासाठी पैसे घेणार्‍या लोकांपर्यंत एक सुविहित जाळे विणलेले असते व वेगवेगळ्या पातळीवर एकमेकांच्या देखरेखीखाली ते काम करीत असतात. भारतातील ‘गरीब आणि श्रीमंत’ यांच्यातील दरीवर हा सर्व व्यवहार बेतलेला असतो.
मूत्रपिंड रोपणाच्या क्षेत्रातील माझ्या जवळजवळ पन्नास वर्षांच्या अनुभवातून मी सांगू शकतो की अजूनही शिक्षित व आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील लोक त्याच्या वा तिच्या कुटुंबातील एखाद्या गरीब व्यक्तीला मूत्रपिंड दान करण्यासाठी आलेले मी कधीही पाहिलेले नाही. मग संबंध नसलेल्या रुग्णासाठी मूत्रपिंड देणे तर सोडूनच द्या. मृतदेहाचे मूत्रपिंड रोपण करण्यावर देखील कोणताही तपशील उपलब्ध नाही.
१९९४ साली भारताने मानवी अवयव रोपण कायदा केला, ज्यातून खुल्या अनियंत्रित रोपण व्यवहारावर निर्बंध आले. आज असंबंधित जिवंत देणगीदाराची निवड चांगल्या प्रकारे होऊ शकते. शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झालेली आहे, परंतु मूत्रपिंड व्यापारातील गैरप्रकारांचा या देशावरील कलंक मात्र कायम आहे. कायदा असूनही मूत्रपिंड रोपण गैरप्रकार आणि घोटाळे पुन्हा पुन्हा घडताना दिसतात.

सध्याच्या वेगाने बदलत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या काळात या तंत्रज्ञानाचाच गैरवापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. नाव, पत्ता, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि अन्य कोणत्याही कागदपत्रांचा गैरवापर करून गरजू रुग्ण, मूत्रपिंड दाता व इस्पितळ यांच्या गरजांची पूर्तता होऊ शकते. त्यासाठी हवा असतो केवळ एक सॉफ्टवेअर ऑपरेटर.

गरीब मूत्रपिंड दात्याला फसवले जाते आणि ज्याच्यासाठी त्याचे मूत्रपिंड घेतले जाते त्याला किंवा संबंधित इस्पितळाला त्या दात्याची काळजी वाहण्याची इच्छा नसते. अशा प्रकारच्या नियमावलीचा आजही अभाव आहे. रुग्णांच्या नातलगांकडून, डॉक्टरांकडून, इस्पितळांकडून अशा देणगीदारांकडे अमानवीय स्वरूपाचे दुर्लक्ष केले जाते. त्यांची ओळख ठेवण्याची कोणाला गरज वाटत नाही. अपुरे पैसे देणे, आरोग्याची काळजी न वाहणे हे सर्रास चालते. भारतात ‘पैसा लिया’ असे म्हणून त्याची उपेक्षा केली जाते.
चेन्नईत २००२ साली एका संशोधनांतर्गत अशा ३०० मूत्रपिंड दात्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यापैकी ९५ टक्के जणांनी सांगितले की आम्ही पैशांसाठी मूत्रपिंडे विकली आणि जे पैसे मिळाले ते सांगितल्या गेलेल्या रकमेपेक्षाही कमी होते. त्यापैकी ७५ टक्के लोक कर्जबाजारी होते, ९० टक्के आजारी होते आणि ३० टक्के जणांच्या बायकांनाही पतीचे कर्ज फेडण्यासाठी त्यांची मूत्रपिंडे विकावी लागली! हा सर्व व्यवहार मध्यस्थ आणि संघटित सिंडिकेटच्या माध्यमातून केला गेला. यापैकी ८० टक्के मूत्रपिंड दाते अशा प्रकारच्या मूत्रपिंड दानाच्या आज विरोधात आहेत.मूत्रपिंड घोटाळ्यांत देशातील नामांकित व ज्येष्ठ मूत्रपिंड तज्ज्ञांची नावे आलेली असल्याने डॉक्टर आणि शोषित गरीब या दोघांसाठीही अंतिम उपाययोजनेची आज आवश्यकता आहे. जगामध्ये अशा उपचारासाठी पैसे देऊन मूत्रपिंड खरेदी करणे हा उपाय नाही.