गोव्यासाठी टपाल खात्याचे स्वतंत्र सर्कल हवे ः मुख्यमंत्री

0
130

>> केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार

टपाल खात्याचे गोव्यासाठी स्वतंत्र सर्कल नसल्याने गोमंतकीयांना टपाल खात्यात नोकर्‍या मिळत नाहीत. सध्या राज्यातील टपाल खात्यात फक्त २ टक्के एवढेच गोमंतकीय आहेत व ही परिस्थिती बदलायला हवी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. तसेच टपाल खात्याचे गोव्यासाठी स्वतंत्र सर्कल स्थापन करण्यात यावे यासाठी केंद्र दरबारी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
जागतिक टपाल दिनानिमित्त काल गोवा टपाल खात्याने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. गोवा टपाल खात्याचा महाराष्ट्र सर्कलमध्ये समावेश करण्यात आल्याने गोव्यातील टपाल खात्यातील पदांसाठी गोमंतकीयांबरोबरच महाराष्ट्रीयनही अर्ज करू शकतात आणि पर्यायाने ह्या नोकर्‍या महाराष्ट्रीयनाना मिळतात. सध्या गोव्यातील टपाल खात्यात केवळ २ टक्के गोमंतकीय आहेत. या पार्श्‍वभूमीवर टपाल खात्याने राज्यासाठी स्वतंत्र सर्कल स्थापन करावे, अशी सूचना डॉ. सावंत यांनी यावेळी केली.

गोव्याचा महाराष्ट्र सर्कलमध्ये समावेश करण्यात आलेला असून त्यामुळे मराठी माणूस गोव्यातील टपाल खात्यातील पदांसाठी अर्ज करू शकतो. मात्र, गोव्यासाठी स्वतंत्र सर्कल तयार करण्यात आल्यास ह्या पदांसाठी कोकणीचे ज्ञान आवश्यक ठरणार असल्याने नोकर्‍या केवळ गोमंतकीयांनाच मिळणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय आयुष व संरक्षण मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी टपाल खात्याने देशासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला.

पोस्ट मास्टर जनरल एन. विनोद कुमार व टपाल सुपरिटेंडंट कोरागप्पा यांचीही यावेळी भाषणे झाली. टपाल खात्यातील चांगली सेवा दिलेल्या कर्मचार्‍यांचा यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

पर्रीकरांवर टपाल तिकिट काढण्यासाठी प्रयत्न करणार
मनोहर पर्रीकर यानी संरक्षण मंत्रीपदी असताना केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचे एक टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी आपण केंद्रीय दळणवळण खात्याचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. हे तिकीट ज्या दिवशी काढले जाईल तो दिवस गोमंतकीयांसाठी महत्त्वाचा दिवस ठरणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.