गोव्यासाठी ‘आप’ हाच पर्याय ः सिसोदिया

0
162

>> आम आदमीच्या कार्यकर्त्यांना पणजीत मार्गदर्शन

कधी कॉंग्रेस व कधी भाजपला निवडून आणणारी गोव्यातील जनता आता ह्या दोन्ही पक्षांच्या भ्रष्ट राजकारणाला विटलेली आहे. ती आता पर्याय म्हणून मोठ्या आशेने आम आदमी पक्षाकडे पाहू लागली आहे, असे काल आपचे नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पणजीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांनी आपची विचारधारा व स्वच्छ प्रशासनाचा नारा घेऊन लोकांसमोर जावे, असे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले. पक्षाने अथक प्रयत्न केल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार गोव्यात सत्तेवर येऊ शकते असा आशावादही सिसोदिया यांनी यावेळी व्यक्त केला.

पणजीतील कनव्हेन्शन सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमातून सिसोदिया यांनी पक्षाच्या २४ केंद्रांतील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. प्रत्यक्ष पणजी-मळा येथील कनव्हेंन्शन सेंटरमध्ये पक्षाचे बूथ अध्यक्ष व काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही १५ टक्के एवढी होती असे सांगून ही दिलासादायक घटना असल्याचे सिसोदिया यांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात केलेल्या क्रांतीचा त्यानी यावेळी उल्लेख केला. तसेच लोकांना मोफत वीज पुरवून वीज क्षेत्रातही दिल्ली सरकारने मोठी क्रांती घडवल्याचे ते म्हणाले.

गोव्यात भाऊसाहेब बांदोडकर यानीही शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली होती आणि त्यानंतर मनोहर पर्रीकर यानी गोव्यात विकासाची गंगा आणली होती. मात्र, पर्रीकर यांची जी ध्येय धोरणे होती त्या ध्येय धोरणांना आता भाजप सरकारने मूठमाती देण्याचे काम केले आहे. पर्रीकर यांची विचारधारा पुढे घेऊन जाऊ पाहणार्‍या भाजप नेत्यांचा त्यांच्याच पक्ष नेत्यांकडून अपमान होत असून ह्या नेत्यांनी आपमध्ये सहभागी व्हावे व पर्रीकरांचे अपूर्ण राहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवानही सिसोदिया यांनी यावेळी केली.

ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी आप हा मूल्ये व नीतीनियम यांचे पालन करणारा पक्ष असल्याने आपण या पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. वाल्मिकी नाईक यांनी स्वागत केले. पक्षाचे संयोजक राहूल म्हांबरे व ऍड्. सुरेल तिळवे यांचेही भाषण झाले.