गोव्याला विजयाची संधी

0
97

>> कर्नल सी.के. नायडू क्रिकेट

गोवा व त्रिपुरा यांच्यात सांगे अकादमी मैदानावर सुरू असलेला कर्नल सी.के. नायडू क्रिकेट स्पर्धेतील सामना रोमांचक स्थितीत येऊन पोहोचला आहे. आज सामन्याचा शेवटचा दिवस असून गोव्याला विजयासाठी १५४ तर त्रिपुराला ७ गड्यांची आवश्यकता आहे. तिसर्‍या दिवसअखेर ३ बाद ७८ असा चाचपडत होता. समर दुभाषी २५ व सुयश प्रभुदेसाई २४ धावांवर नाबाद होते. तत्पूर्वी, दुसर्‍या दिवशीच्या १ बाद १९ धावांवरून पुढे खेळताना त्रिपुराने दुसर्‍या डावात २०० धावांपर्यंत मजल मारत आपली एकूण आघाडी २३१ धावांपर्यंत वाढवली. त्रिपुरातर्फे सम्राट सूत्रधर याने ५४ तर श्याम शकिल गन व शुभम घोष यांनी अनुक्रमे ४६ व ३१ धावांचे योगदान दिले. गोव्याकडून अमूल्य पांड्रेकरने ४ व वेदांत नाईकने २ गडी बाद केले. गोव्याने दुसर्‍या डावात रजत शेट, प्रथमेष गावस व स्नेहल कवठणकर यांना लवकर गमावल्याने सामना त्रिपुराच्या बाजूने काही प्रमाणात झुकला आहे.

संक्षिप्त धावफलक
त्रिपुरा पहिला डाव सर्वबाद २४०, गोवा पहिला डाव सर्वबाद २०९, त्रिपुरा दुसरा डाव (१ बाद १९ वरून) ७३.२ षटकांत सर्वबाद २०० (सम्राट सूत्रधर ५४, श्याम शकिल गन ३१, बिक्रम देबनाथ १९, देबप्रसाद सिंघा १०, विकी साहा नाबाद १२, वेदांत नाईक ३८-२, अमूल्य पांड्रेकर ९०-४, लक्षय गर्ग २६-२), गोवा दुसरा डाव ः २४ षटकांत ३ बाद ७८ (प्रथमेष गावस १०, रजत शेट ६, स्नेहल कवठणकर ११, समर दुभाषी नाबाद २५, स्नेहल कवठणकर ११, सूयश प्रभुदेसाई नाबाद २४, वत्स १५-१, साहा ३४-१, मंडल १२-१)