गोव्यात येणार्‍यांना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करा

0
154

>> उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला कोरोनाबाबत आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला गोव्यात प्रवेश करणार्‍या नागरिक, पर्यटक यांच्यासाठी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र येत्या १० मे २०२१ पासून सक्तीचे करण्याचा निर्देश काल दिला. कोविड रुग्णांवर उपचार करणार्‍या इस्पितळात पोलीस संरक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यात प्रवेशासाठीचे प्रमाणपत्र ७२ तास अगोदर घेतलेले असले पाहिजे.

राज्यातील कोरोना महामारीने परिस्थिती गंभीर बनलेली असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारकडून लॉकडाऊन जाहीर केले जात नाही. केवळ कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दक्षिण गोवा वकील संघटना आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर योग्य कोविड नियोजन करण्याची सूचना राज्य सरकारला देण्याची मागणी याचिकांतून करण्यात आली आहे.

न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीवेळी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्याचा निर्देश दिला आहे. कोविड इस्पितळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात करावेत. इस्पितळाच्या आवारात हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे फलक लावण्याची सूचना केली आहे. स्वॅबच्या चाचण्यांचा अहवाल लवकर जाहीर करा. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची माहिती जाहीर करण्याची सूचना केली आहे.

सरकारने आपल्या अधिकृत वेबसाइटवर सरकारी आणि खासगी इस्पितळांतील कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटा, प्राणवायू सिलिंडर, व्हेन्टिलेटर, आयसीयूबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करावी, असा निर्देश देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने रुग्णांना इस्पितळात दाखल करण्याबाबतचे धोरण सादर करावे, राज्य सरकारने २०० व्हेन्टिलेटरच्या खरेदी व्यवहाराबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. राज्य सरकारने स्वॅब चाचणीची सविस्तर माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे. राज्यात उपलब्ध असलेल्या आवश्यक औषधाबाबत माहिती द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राणवायूच्या उपलब्धतेबाबत माहिती प्रतिज्ञापत्रातून देण्याची सूचना केली आहे.

र्े कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती १० मेपासून
र्े इस्पितळांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
र्े स्वॅब चाचण्यांचा अहवाल लवकर जाहीर करा.
र्े १८-४४ वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाची माहिती जाहीर करा.
र्े कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटा, प्राणवायू सिलिंडर,
व्हेंटिलेटर, आयसीयूबाबत सविस्तर माहिती वेबसाईटवर द्यावी
र्े उपलब्ध असलेल्या आवश्यक औषधांची, प्राणवायूची माहिती द्यावी.