गोव्यातील व्यवसायात परप्रांतीयांची वाढती संख्या चिंताजनक असून, ही परिस्थिती कायम राहिल्यास स्थानिक नागरिकांना व्यवसाय करणे कठीण बनणार आहे, अशी भीती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केली. त्याचबरोबर, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनी स्थानिक नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक व इतरांची उपस्थिती होती.
राज्यातील लोकप्रतिनिधींनी केवळ पायाभूत सुविधांचा विकास करून चालणार नाही, तर मानवी विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात पायाभूत विकास करण्याचे काम राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे, तर लोकप्रतिनिधींनी आपल्या परिसरातील मानवी विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
परप्रांतीय मोठ्या प्रमाणात राज्यातील व्यवसायांमध्ये शिरकाव करत असल्याचे निदर्शनास येत आहे. लोकप्रतिनिधींनी स्थानिक नागरिक आणि महिलांमधील कौशल्य गुण हेरून त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून व्यवसाय करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य केले जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वित्त खात्याला उत्तर गोवा जिल्हा पंचायतीला विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी देण्याचा निर्देश दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.