– विजय प्रभू पार्सेकर-देसाई, पेडणे.
सकाळी-सकाळी ‘नवप्रभा’ उघडताक्षणी त्यात रस्ता अपघाताच्या कमीत कमी दोन तरी बातम्या हमखास आढळतात. बहुतेक अपघात हे दुचाकीचे असतात. भटकी गुरें आणि कुत्री पण अपघात घडवून आणतात. अपघाताच्या वृत्तांतात पोलीस तपास चालू असल्याचा उल्लेख असतोच असतो. मात्र अपघात होऊ नये किंवा त्यांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सरकारने एखाद्या रस्त्याबाबत ठोस उपाययोजना केल्याचे काही वाचनात येत नाही.
अपवाद फक्त सुकेकुळण-धारगळ येथील चढणीचा! इथे रस्त्यात काहीतरी दोष होता. नेहमीच तेथे अपघात होत असत. काहीजण मेले, अनेक जायबंदीही झाले. माझ्यासह अनेकांनी पत्र लिहून सरकारचे या अपघातप्रवण क्षेत्राकडे लक्ष वेधले. पण रामा-शिवा-गोविंदा!
एक दिवस माझ्यासमोरच अपघात घडला. मी, आमदार-मंत्री यांची नावे घेऊन त्यांच्यापैकी एखाद्याला किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला अपघात झाल्याशिवाय हे अपघातप्रवण क्षेत्र सरकार दुरूस्त करणार नाही म्हणून पत्र लिहिले आणि आश्चर्य म्हणजे संबंधित खडबडून जागे झाले. तो रस्ता व्यवस्थित करण्यात आला.
अपघात होण्याची अनेक कारणे आहेत. प्रत्येक वाहन चालकाला दुसर्याच्या पुढे जाण्याची असलेली घाई हेही एक कारण आहे. साहजिकच वेगमर्यादेच्या नियमासह वाहन चालवण्याचे अनेक नियम सर्रासपणे मोडले जातात. त्यामुळेच लहान-मोठे अपघात होतात. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र रस्ते ‘बाबा आदमच्या काळात होते’ तसेच आहेत. सरकारला, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, रस्ते रूंद करण्याची इच्छाशक्तीच नाही. तरूणांना वेगाचे प्रचंड आकर्षण असते. त्यातच हे तरूण आणि तरूणीही नशेच्या आहारी गेले असल्यास ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास’ अशीच स्थिती होते. थोडक्यात वाहनांची वाढती संख्या, अरूंद रस्ते, तारूण्याचा उन्माद, कायदा धाब्यावर बसवण्याची वृत्ती, पोलिसांची अकार्यक्षमता, त्यांनी कार्यक्षमता दाखवल्यास राजकारण्यांचा होणारा हस्तक्षेप आणि बेपर्वा वृत्ती यांचा परिपाक म्हणजेच दररोज सकाळी सकाळी वाचावे लागणारे अपघातांचे वृत्त!
सरकारने पादचारी हा वर्गच ध्यानात घेतलेला नाही. पणजी बसस्थानकाबाहेर पूर्वी एक रस्ता दुभाजक होता. दहा वर्षांपूर्वी तत्कालिन प्रधानमंत्री वाजपेयी यांच्या वाहनांचा ताफा सुखेनैव जावा म्हणून हा दुभाजक काढून टाकला, तो अद्यापही उभारण्यात आलेला नाही. पर्वरीहून पणजी स्थानकावर जाण्यास पादचार्यांना प्रचंड कसरत करावी लागते. इथे रस्ता ओलांडणे जवळजवळ अशक्यच! कुठल्या बाजूने वाहन येईल, याचा अंदाजच येत नाही. साहजिकच पादचार्यांचा प्रचंड गोंधळ होतो. परिणामी अपघातांना आमंत्रण मिळते. अशीच परिस्थिती जुन्या पाटो पुलावरून टपाल कार्यालय रस्तामार्गे जाणार्या पादचार्यांची होते. येथे वाहन पाटो पुलावर जाणार? मळा रस्त्यावर जाणार? की पणजीत वळणार? हेच समजत नाही. येथे कुठलेच नियंत्रण नाही. अशीच परिस्थिती कोर्टाजवळ, जुने सचिवालय, मांडवी हॉटेल आणि बाजार परिसरात आहे. आझाद मैदानाजवळ तर परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.
मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जुने सचिवालय ते हॉटेल रियल हा भाग एकमार्गी केला होता. ती एक चांगली उपलब्धी होती. मात्र, सचिवालय परिसरातील दुकानदारांनी सदर रस्ता वाहतुकीस बंद करून दुसरा रस्ता एकमार्गी केल्यामुळे आक्षेप घेतला. पर्रीकरांनी पूर्ववत् रस्ता चालू करण्याचा आदेशही दिला. इथपर्यंत ठीक होते, ‘एक दुकानदार’ दुसर्या ‘दुकानदाराचे’ हित जपणारच! वास्तविक हा रस्ता एकेरी करणे आवश्यक आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य होते. परंतु पर्रीकर यांच्या आदेशाची संबंधित अधिकार्यांनी योग्यप्रकारे अंमलबजावणी न केल्यामुळे रियल हॉटेलजवळ रस्ता ओलांडणे मुष्कील झाले आहे. तीच परिस्थिती सरकारी छापखान्याकडे आहे.
पणजी शहर हे महापालिका क्षेत्रात मोडते. भारतातील कदाचित हे एकमेव शहर असावे की, जिथे स्वयंचलित वाहतूक यंत्रणा अस्तित्वात नाही. रस्त्यावर ‘झेब्रा क्रॉसिंग’ आणि वेग नियंत्रक नाहीत. परिणामी वाहनचालकांची मनमानी सदैव चालूच असते.
तुम्ही रस्ता ओलांडण्यासाठी चार चाकी वाहनाला जर हात केलात, तर तिसरा किंवा चौथा वाहनचालक तुमच्या विनंतीला मान देऊन वाहन थांबवतो. मात्र, सकाळी उठताक्षणीच संकल्प सोडलेला दुचाकीचालक तुम्ही रस्ता ओलांडताना तुम्हाला धडक देऊन खाली पाडणारच!
गोवा महामार्ग कायदा १९७४ नुसार महामार्गाच्या दुतर्फा दारूची दुकाने घालण्यास बंदी आहे. मात्र, पत्रादेवी ते पोळे चेकनाक्यापर्यंत २४ तास दारू दुकाने खुलेआम चालू असतात. पहाटे गोव्यात येणारे वाहनचालक इथे चूळ भरूनच पुढे निघतात, आणि रात्री गोव्याबाहेर जाणारे वाहनचालकही व्यवस्थित तोंड धुवून नंतरच पुढच्या प्रवासाला निघतात. अपघात होण्याचे हे आणखी एक कारण. पण लक्षात कोण घेतो?