गोव्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत युती करावी ः सुदिन

0
160

गोव्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन युती करायला हवी आणि त्या युतीतून राष्ट्रीय पक्षाला बाहेर ठेवायला हवे, असे मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले.

गोव्याचा विनाश करू पाहणार्‍या पक्षाबरोबर जर गोवा फॉरवर्ड पक्षाला युती करायची असेल तर ती त्यांनी अवश्य करावी. पण मगो पक्ष अशा अभद्र आघाडीत कधीही सामिल होणार नाही. गोव्यातील प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांवर विश्‍वास ठेवून त्यांच्याबरोबर युती करणे हे घातक असून गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी त्याबाबत विचार करावा. मात्र मगो पक्ष कुठल्याही परिस्थितीत अशा युतीत अथवा आघाडीत सहभागी होणार नसल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. गोव्याचा विनाश व विक्री करण्याचे कटकारस्थान हे केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असतानाच रचले गेले होते. आज केंद्रातील भाजप सरकार तोच अजेंडा पुढे नेऊ पाहत असल्याचे ढवळीकर म्हणाले.

गोव्यात कोळसा आणणे, कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आदि अनेक प्रकल्प नवी दिल्लीत बसून पूर्वी कॉंग्रेस सरकार गोव्यावर लादत होता. आता तेच दुष्कर्म केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. केंद्रातील भाजप सरकारने तर गोव्याची जीवनदायिनी असलेली म्हादई नदी कर्नाटकच्या घशात घातल्याचे ढवळीकर म्हणाले. अदानीलाही गोव्यात कोळसा आणता यावा यासाठी केंद्रातील मोदी सरकार व प्रमोद सावंत सरकार लाल पायघड्या घालत असल्याचे ढवळीकर म्हणाले.

कॉंग्रेस पक्षातील नेतेच एकमेकांवर कुरघोडी करीत असून अशा पक्षाशी युती करून त्याचा काय फायदा होणार आहे, असा सवालही ढवळीकर यांनी केला.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री मगो पक्षाचे संस्थापक भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यासाठी जे काही केले ते कुणीही करू शकणार नसल्याचे ढवळीकर म्हणाले.