गोव्यातील अनंत चतुर्दशी

0
133

– राजेंद्र पां. केरकर

गोव्यातल्या काही कुटुंबात भाद्रपद महिन्यातील चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशीचा उत्सव साजरा केला जातो. अनंत हे शेषशायी विष्णूचे रूप असून भारतभर त्या रूपाची मनोभावे पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरे आहेत. गोव्यात अंत्रुज महालातल्या कुळागरांनी समृद्ध असलेल्या सावईवेरे येथील अनंत देवस्थानाचा विशेष लौकीक असून, बारामाही पाण्याने भरलेल्या तळ्यातच श्रीअनंताची स्थापना करून, तळ्याला पावित्र्याची किनार येथील भाविकांनी दिली होती.

गोव्यातल्या काही कुटुंबात भाद्रपद महिन्यातील चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशीचा उत्सव साजरा केला जातो. अनंत हे शेषशायी विष्णूचे रूप असून भारतभर त्या रूपाची मनोभावे पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरे आहेत. गोव्यात अंत्रुज महालातल्या कुळागरांनी समृद्ध असलेल्या सावईवेरे येथील अनंत देवस्थानाचा विशेष लौकीक असून, बारामाही पाण्याने भरलेल्या तळ्यातच श्रीअनंताची स्थापना करून, तळ्याला पावित्र्याची किनार येथील भाविकांनी दिली होती. या मंदिराचे गर्भगृह तळ्यात असून, त्याचा आज विस्तार करण्यात आलेला आहे. भाद्रपदातल्या अनंत चतुर्दशीला भाविक या मंदिराला भेट देतात आणि शेषशायी अनंताचे दर्शन घेतात. वर्षातल्या विविध कालखंडात अनंताचे हे मंदिर जत्रा, काला आणि उत्सवांच्या वेळी भाविकांनी गजबजलेले असते.
अनंत चतुर्दशीचे व्रत प्रामुख्याने गतवैभव लाभावे म्हणून करण्याची परंपरा असून, ते कौटुंबिक स्वरूपाचे आहे. एखाद्याने उपदेश केल्यावरती किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत कुटुंबात चालू राहते. स्नान केल्यानंतर सकाळी सुशोभित माटोळीच्या खाली सर्वतोभद्र मंडल काढून त्यावरती तांब्याचे किंवा रूप्याचे पूर्णपात्र ठेवून त्यात अष्टदळ काढतात. त्याच्यावरती सात फणांचा दर्भांकूराचा शेष नाग ठेवून त्याच्यासमोर चौदा गाठीचा रेशमी दोरा ठेवतात. या व्रताचा कालखंड चौदा वर्षे असून त्यानंतर त्याचे विधीनुसार उद्यापन करतात. गोव्यात अनंत चतुर्दशीच्या व्रताची परंपरा ब्राह्मण समाजातल्या काही कुटुंबात आहे आणि केळीच्या गब्यांच्या मखरात सात फण्यांच्या दर्भांकूरांनी तयार केलेल्या नागाची स्थापना करून मोठ्या उत्साहात हे व्रत साजरे करतात.
पणजी येथील म्हामाय कामतीच्या शतकोत्तर इतिहासाची समृद्ध परंपरा लाभलेल्या वाड्यात अनंत चतुर्दशीची कित्येक दशकांची परंपरा आहे. म्हामाय कामतीच्या घरात सोन्या-मोत्यांनी आणि अलंकाराने नटवलेल्या उजव्या मुखाच्या दुर्मीळ शंखाची पूजा केली जाते. सासष्टीतल्या चांदोरातल्या गिरदोळीतल्या या म्हामाय कामतीच्या घराण्याला पणजीत १७५९ सालापासूनचा इतिहास आहे. अनंत चतुर्दशीचे व्रत म्हामाय कामतीच्या घरात कौटुंबिक स्वरूपाचे असले तरी त्यादिवशी त्यांच्या घरातल्या शाकाहारी अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात.
कधीकाळी त्यांच्या घरातल्या नोकराकडून चुकून नागाच्या जोडीचा मृत्यू झाला आणि त्यासाठी अनंत चतुर्दशीला नागपूजनाची परंपरा इथे सुरू झाली. पोर्तुगीज राजवटीत मूर्ती पूजेवरती बंदी असल्याने, एका पेटार्‍यात ठेवलेल्या कागदावरती रेखाटलेल्या गणपतीच्या चित्राचे पूजन गुप्तरीत्या केले जायचे आणि त्यानंतर पूजेसाठी वापरण्यात येणार्‍या पानांफुलांचे विसर्जन विहिरीत केले जायचे आणि गणपतीच्या चित्रावरती केवळ जलसिंचन करून ते ठेवले जायचे. १८०५ पासून धार्मिक स्वातंत्र्याच्या धोरणात पोर्तुगीजांनी बदल केल्यावर अनंत चतुर्दशीचा हा सोहळा रात्रभर साजरा करण्यात आला होता.
दरवर्षी घरातला ज्येष्ठ पुरुष, सकाळी अंघोळ केल्यावर हाताला तांबडा दोरा बांधून देव्हारा सजवण्यास आरंभ करतो. येथील सजावट आणि पूजाविधी आटोपायला संध्याकाळ होते आणि त्यासाठी जेवणाचा कार्यक्रम रात्रीच ठेवला जातो. म्हामाय कामतीच्या घरातला हा अनंत चतुर्दशीचा सोहळा आणि शाकाहारी अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी भाविकांची इथे मोठी गर्दी होते.

पैंगीणमधील पत्री गणपती!

काणकोणची भूमी पश्चिम घाटाच्या पर्वत रांगात जशी वसलेली आहे तसेच इथल्या पश्चिम किनारपट्टीत तिचा प्रांत पसरलेला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाच्या कुशीत बालपणापासून वार्धक्यापर्यंतचा कालखंड इथल्या लोकमानसाने पिढ्यान्‌पिढ्या व्यतीत केल्याने त्यांच्यात आपल्या परिसरातल्या वृक्षवल्लींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झाली असावी. संत तुकाराम महाराजांची ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ ही धारणा त्यांच्यात सनातन काळापासून निर्माण झाली होती आणि त्यामुळे आपल्या परिसरातल्या निसर्गाच्या नानाविध घटकांत त्यांनी देवत्व पाहिले नसते तरच नवल मानावे लागेल. गणपतीपूजनाबाबत गोव्यात विविधांगी परंपरा अनुभवायला मिळतात. त्यातली पैंगीणमधील महालवाड्यावर प्रचलीत असलेली पत्री-गणपतीची परंपरा ही पर्यावरणीय लोकधर्माशी नाते सांगणारी आहे.
पैंगीण गावात परशुरामाची दोन ठिकाणी मंदिरे असून त्यातील एक महालवाड्यावर आहे आणि त्याच्याशी प्रभुगावकर कुटुंबीय निगडित आहेत. आज तेरा कुटुंबियांत प्रभुगावकरांच्या श्रद्धेने आणि आत्मीयतेने जतन करून ठेवलेल्या आगळ्या-वेगळ्या वारशाच्या गणपतीपूजनाचे दर्शन ‘पत्री-गणपती’च्या परंपरेतून घ्यायला मिळते. पत्रीच्या रूपातील गणपती पूजण्याची परंपरा येथील प्रभूगावकरांमध्ये कोणत्या कारणामुळे आणि कधीपासून सुरू झाली हे निश्‍चितपणे सांगणे कठीण असले तरी पूर्वी पत्रीचा गणपती सामूहिकरीत्या पूजला जायचा. हा चवथीचा उत्सव एखाद्या घरात साजरा न करता तो केवळ परशुराम नृसिंहाच्या मंदिरात पूजला जायचा. आणि सर्व प्रभुगावकर कुटुंबीय मंदिरात चतुर्थीनिमित्त्य एकत्र यायचे.
देवाची अनुमती घेऊन सध्या हा उत्सव प्रभुगावकरांच्या तेरा कुटुंबियांत साजरा केला जात आहे. मातीची किंवा धातूची मूर्ती यावेळी पूजनाला न घेता कुटुंबियांतले वयोवृद्ध परिसरातल्या जंगलात किंवा माळरानात जाऊन श्रावण-भाद्रपदातील पावसाच्या सरींमुळे तरारून आलेल्या जंगली फुले-पाने-तृणपाती गोळा करतात. तुळस, चाफा, मोगरा, वड, पिंपळ, केतकी, शमी अशा एकवीस प्रकारच्या वनस्पतींपासून मिळणार्‍या पत्रींना एकत्रित करून अर्जुनवृक्षाच्या पानात दोर्‍याने व्यवस्थितरीत्या बांधतात आणि याच पत्रीची माटोळीने सजवलेल्या चौकात गणपती म्हणून प्रतिष्ठापना करून विधीयुक्त पूजन करतात. गणपतीची जन्मदात्री पार्वती असल्याकारणाने अशी पत्री तिच्यासाठीही गोळा केली जाते. परंतु ही सारी पत्री कासाळ्याच्या माड्येच्या विस्तीर्ण पानातच बांधून पार्वती म्हणून पूजली जाते.

वैद्य-नाईकांची वैशिष्ट्यपूर्ण चवथ!

फोंडा तालुक्यातील शिरोड्याजवळ वाजे आहे. वाजे येथील वैजावाडा हा एकेकाळी वनौषधी आणि अन्य घटकांपासून नानाविध पारंपरिक औषधे निर्माण करून लोकांना बर्‍याच व्याधींपासून मुक्त करणार्‍या वैद्यांचा वाडा. ऍलोपॅथी औषधांच्या वावटळीत वैद्यांकडे येणारी पिढी काळाच्या ओघात लुप्त होत गेली. त्यामुळे वाजेतल्या वैद्यांना पोटापाण्यासाठी गोव्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले. कोणी दूधसागरच्या सोनावळ येथे, कुणी करमणे, कुणी कुंभारजुवे येथे गेले. वर्षभर गोव्याच्या कानाकोपर्‍यात जाऊन राहिलेली वैद्य-नाईकांची कुटुंबे… चवथीची चाहूल लागताच त्यांना शिरोड्यातील वाजे येथे येण्याचे वेध लागतात. जवळ जवळ ३०० वर्षांपासून वैद्य-नाईक कुटुंबीय सामूहिकरीत्या गणेश पूजतात. एकत्रित खाना-जेवणाचा चवथीला आस्वाद घेतात. प्रारंभी चंदनाचा गणपती पूजला जायचा. त्यानंतर बरीच वर्षे लाकडाचा! आता ती मूर्ती जीर्ण झाल्याने त्या जागी कर्नाटकातील कुमठा येथून नवी मूर्ती आणली. चतुर्हस्त असणारी ही देखणी मूर्ती दरवर्षी शिरोडा येथील लाला च्यारी यांचे कुटुंबीय सुरेखरीत्या रंगवतात. प्रतिकात्मक पद्धतीने विसर्जन केल्यावर लाकडी मूर्ती व्यवस्थितपणे ठेवली जाते आणि चतुर्थीपूर्वी साफसफाई रंगकामासाठी लाला च्यारीच्या घरी दिली जाते.
वाजे-तोटे येथील वैद्याभाटात रामपुरुषाचे पूर्वापार स्थळ आहे. तोटेकर, भूताबाय, ब्राह्मण यांच्या सान्निध्यात राहणारा रामपुरुष चवथीला माणसांनी गजबजतो. चवथीपूर्वी रानपुरुषाच्या स्थळाची साफसफाई, रंगरंगोटी केली जाते. सृजनशील होत सजावटीत गुंततात. यावर्षी अक्षय वैद्य, सूरज गोकुळदास वैद्य यांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी लक्ष खिळवून ठेवणारी कागद कामाची कलात्मक रीतीने सजावट केलेली आहे जी चवथीच्या सामर्थ्याची चुणूक अभिव्यक्त करते.
मध्यंतरी वाजे येथेच सदानंद वैद्य यांच्या घरी हा गणपती पूजला जायचा. परंतू आता सगळ्यांना सोयीचा व्हावा म्हणून पुन्हा हा गणपती रामपुरुषाच्या स्थळात पूजला जातो. या सामूहिक पद्धतीने पूजल्या जाणार्‍या गणपतीप्रमाणेच अन्य एकाच वैद्य-नाईकाच्या घरी लाकडाचा गणपती पूजला जातो. असा लाकडाचा गणपती वाजेत दोन ठिकाणी पूजला जात असून ही आगळी-वेगळी परंपरा वैद्य-नाईकांनी जतन करून आपल्या पूर्वजांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाकडाच्या गणपतीचे प्रतिकात्मक पद्धतीने विसर्जन केले जात असल्याने आपण जलप्रदूषणापासून चार हात दूर असल्याबाबत वैद्य-नाईक कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.