गोव्याची बदनामी

0
104

नुकतेच पर्दाफाश झालेले आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट हे गोव्यात अलीकडे रुजत चाललेल्या उच्छृंखलतेच्या विषवल्लीचे आणखी एक पान आहे. सातत्याने उजेडात येत असलेल्या अशा प्रकरणांतून गोव्याची बदनामी होत असूनही त्याची खंत वा खेद राज्यकर्त्यांना दिसत नाही ही शोकांतिका आहे. एकेकाळी गोव्याच्या गालावर बायणाचा कलंक होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निधडेपणाने ती वस्ती उद्ध्वस्त करून तो कलंक कायमचा पुसून टाकला. पण त्यावरही वरताण करणार्‍या गैरगोष्टी आता उच्चभ्रूंच्या वस्तींत सर्रास सुरू आहेत. पंचतारांकित हॉटेलांतून, हायफाय सदनिकांतून ग्राहकांना मुली पुरविल्या जात आहेत आणि विशेष म्हणजे परप्रांतीय ग्राहक, परप्रांतीय मुली आणि परप्रांतीय दलाल असूनही गोवा हा या अवैध व्यवहारांचा त्यांच्या दृष्टीने सुरक्षित अड्डा बनलेला आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे. हा अशा प्रकारचा व्यवसाय येथे फोफावण्यामागे काही स्थानिक बड्या धेंडांचे साह्य त्यांना नक्कीच असले पाहिजे. अशा गुलहौशी मंडळींची गोव्यातही कमी नाही. गोवा मुक्तीपासून या भूमीची केवळ ‘खा, प्या आणि मजा करा’ ही ओळखच निर्माण केली गेली असल्यामुळे गोव्यात येणार्‍या पर्यटकांचा दृष्टिकोनच मुळी मजा करण्याचा असतो. मग ते अशा मौजमजेसाठीची साधने शोधत असतात. मागणी असते तेथे पुरवठा करणारेही पुढे होणारच. त्यामुळे अशा दलालांचा सध्या गोव्यामध्ये सुळसुळाट झालेला आहे. आजवर जी जी प्रकरणे उघडकीस आली, ती अगदी प्रमुख शहरांच्या आजूबाजूच्या उच्चभ्रू वस्त्यांमधून उघडकीस आली आहेत. यापूर्वी स्पा आणि मसाज पार्लर हे अशा गैरकृत्यांचे अड्डे बनले होते. त्यावर टीकेची झोड उठल्याने कारवाई सुरू झाली आणि एकामागोमाग एक पार्लरमधून अशा गैरप्रकारांचे बिंग फुटू लागल्याने या दलालांनी आता तारांकित हॉटेलांकडे आपला मोर्चा वळवलेला दिसतो. वास्तविक, कोणत्याही हॉटेलमध्ये ग्राहकाला खोली देताना त्याच्या ओळखपत्राचा पुरावा घेणे कायद्याने आवश्यक असताना या दलालांना या खोल्या कोण पुरवीत होते? या बड्या हॉटेलांचे कर्मचारी तर त्यांना सामील नव्हते ना याचाही शोथ पोलिसांना घ्यावा लागेल. ताज्या प्रकरणात पकडल्या गेलेल्या आरोपीपाशी त्याच्या ग्राहकांचे आणि या देहव्यापारात उतरलेल्या मुलींचे संपूर्ण रेकॉर्ड मिळाले आहे. या मुलीही फसवून वगैरे आणलेल्या नाहीत. बॉलिवूडमधील उभरत्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा त्यात समावेश आहे. म्हणजेच ‘इझी मनी’ ची चटक लागलेल्या या ललना राजीखुशीने अशा व्यवहारांतून पैसा कमवत असाव्यात. हे सगळे घृणास्पद आहे. त्यांची गिर्‍हाईकेही बडी असणार हे ओघाने आलेच. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे त्यांचे फावले आहे. एस्कॉर्टस्, मसाज आणि कंपनी देण्याच्या नावाखाली हे धंदे चालवले जात आहेत. अनेक ‘व्हीआयपी’ मंडळी केवळ या मौजमजेसाठी गोव्यात येत होती आणि जिवाचा गोवा करून परत जात होती असे दिसते. पार्टी संस्कृती तर गोव्यात प्रचंड फोफावली आहे. खासगी विमान कंपन्यांनी रात्री उशिरा गोव्याहून मुंबई – दिल्लीकडे परतणार्‍या फ्लाईटस् खास या अशा मंडळींसाठी सुरू केलेल्या आहेत आणि त्या रोज तुडुंब भरून जाताना दिसतात. पर्वरीपासून पणजीपर्यंत एका पाठोपाठ उजेडात येत असलेली हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाची प्रकरणे म्हणजे गोव्याची बेबंद पर्यटनाने कशी अधोगती केलेली आहे याचे ढळढळीत पुरावेच आहेत. एकेकाळी गोव्याच्या रस्तोरस्ती मद्यालयांनी या भूमीची ओळखच बदलून टाकली. आता कॅसिनो आले आहेत. नागरिकांच्या नाकावर टिच्चून मांडवीच्या उरावर तरंगत आहेत. त्याच्या जोडीने मसाज पार्लरांचे पेव फुटले. मध्यंतरी तर डान्स बार आणि प्लेबॉय संस्कृतीलाही दारे खुली करण्याची चाचपणी चालली होती. अशाने पदरी दुसरे काय पडणार? वारंवार उजेडात येणार्‍या अशा प्रकरणांचा निःपात करण्याची वेळ आता आलेली आहे. अशा प्रकरणांत केवळ तोंडदेखली कारवाई न करता अत्यंत कडक कारवाई करण्याची गरज आता भासू लागली आहे. ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत असे गैरप्रकार घडत असतील, तेथील संबंधित अधिकार्‍याला यापुढे अशा गैरप्रकारांस जबाबदार धरावे लागेल. तरच राजरोसपणे चालणार्‍या अशा कृत्यांना अभय देण्यास कोणी धजावणार नाही. कोणीही व्हीआयपी यात गुंतलेला असो; कोणत्याही दबाव दडपणाचा मुलाहिजा न ठेवता सरकारने हे प्रकरण धसास लावावे. गोवा हा उच्छृंखलांचा अड्डा बनवू पाहणार्‍यांना धडा शिकवल्याखेरीज गोव्याची ही बदनामी टळणार नाही.