अखेर क्रीडामंत्री रमेश तवडकरांवर आरोपपत्र

0
87

>>सात वर्षांनंतर काणकोण पोलिसांची कृती

 

काणकोण पोलिसांनी २००९ साली नोंद केलेल्या एका गुन्ह्याच्या प्रकरणी क्रीडामंत्री रमेश तवडकर आणि अन्य ७ व्यक्ती विरुध्द भा. दं. सं.च्या १४३, १४, ७, ४५१, ३५३, २२४, २२५ आणि १४९ कलमांखाली आरोपपत्र काणकोणच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

अभयारण्यात प्रवेश केलेल्या कारवारच्या मनोज पडवळकर आणि गजानन नाईक यांना काणकोणचे तत्कालीन वनाधिकारी परेश परब यांनी अटक केली होती. त्यावेळी दु. ४.३०च्या दरम्यान त्यावेळी आमदार असलेल्या रमेश तवडकर यांनी आपल्या अन्य साथीदारांसह घटनास्थळी येऊन वनअधिकार्‍यांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही व्यक्तींना जबरदस्तीने तेथून नेले होते. मात्र श्री. तवडकर आणि अन्य व्यक्तींविरुध्द वन अधिकार्‍यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करूनही काणकोणचे पोलिस आरोपपत्र दाखल करण्याच्या बाबतीत चालढकल करीत राहिले असा ठपका न्यायालयाने ठेवल्यानंतर अखेर १० जून रोजी काणकोणच्या पोलिसांनी श्री. तवडकर आणि अन्य व्यक्तींविरुध्द आरोपपत्र दाखल केले आहे.
कॉंग्रेस सरकारच्या राजवटीत आपल्याला या प्रकरणी विनाकारण गोवण्यात आलेले असून सत्य काय ते लवकरच उजेडात येईल असे मत श्री. तवडकर यांनी मागच्या आठवड्यात व्यक्त केले होते. केवळ दोन निष्पाप व्यक्तींना सहकार्य करण्याच्या उद्देशाने आपण घटनास्थळी गेलो होतो. त्यात आपला काहीच स्वार्थ नसल्याचे मत श्री. तवडकर यांनी व्यक्त केले.
वन खात्याने श्री. तवडकर यांच्या व्यतिरिक्त मनोज पडवळकर, गजानन नाईक, संतोष नारायण देसाई, राजीव सोनू नाईक, दीपक गावकर, जानू तवडकर आणि दामू नाईक या व्यक्ती विरुध्द आरोपपत्र दाखल केले असून त्यासाठी एकूण १३ व्यक्तींच्या जबान्या घेण्यात आल्या आहेत.