गोव्याची बदनामी

0
29

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. खाण व्यवसाय बंद झाल्यापासून तर तो राज्याच्या उत्पन्नाचा एकमेव महत्त्वाचा स्त्रोत राहिला आहे. पर्यटनामुळेच गोव्याची जागतिक पटलावर ओळख आहे. मात्र, या क्षेत्रामध्ये अधूनमधून अशा काही विपरीत घटना घडतात की त्यातून गोव्याची अपरिमित बदनामी आणि त्यापोटी हानी होत असते. चंदगडच्या काही तरुणांना म्हापशात लुटण्यात आल्याची ताजी घटना अशाच प्रकारची व सुसंस्कृत, आतिथ्यशील अशा म्हापसेकरांच्या आणि एकूणच गोव्याच्या प्रतिमेला तडा देणारी व मानहानी करणारी आहे.
गोव्यात फिरायला आलेल्या चंदगडच्या सतरा – अठरा वर्षांच्या मुलांना स्वस्त जेवण देतो असे सांगून नग्न करून लुटल्याबद्दल जे पोलीस तपासात पकडले गेले आहेत, ते तिघेही परप्रांतीय आहेत. दोन हरियाणातील तर एक तामीळनाडूतील आहेत. परंतु या घटनेतून नाव बदनाम झाले आहे ते मात्र गोव्याचे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला कलंक लावणार्‍या अशा प्रकरणांकडे सरकारने अत्यंत गांभीर्याने पाहण्याची म्हणूनच आवश्यकता आहे.
ज्या गुंडांनी चंदगडच्या तरुणांना लुटले, त्यांनी अशाच प्रकारे आणखी किती पर्यटकांना लुटले असेल सांगता येत नाही, कारण लोकलाजेस्तव यातले अनेकजण कदाचित तक्रार करण्यासाठी पुढेही आले नसतील. त्यामुळे सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून त्यांच्या यापूर्वीच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचायला लावला गेला तर अशी इतर प्रकरणे उजेडात येऊ शकतील. गृहखात्याने त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत आणि संबंधित गुन्हेगारांची बँक खाती तपासायला लावावीत.
अनेकदा गोव्यात येणार्‍या पर्यटकांशी दुर्वर्तन केले जाते. क्षुल्लक निमित्त उकरून काढून पर्यटकांशी वाद घालून त्यांना मारबडव करून लुटणार्‍या टोळ्या विशेषतः गोव्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या आहेत. पर्यटक मार्गदर्शक असल्याचे भासवून गोव्यात येणार्‍या पर्यटकांना लुटणे वा त्यांची फसवणूक करणे हे तर नित्याचे झाले आहे. गोव्यात प्रवेश करणार्‍या पर्यटक वाहनांना अडवून ठराविक हॉटेलांत जायला भाग पाडणे किंवा गोवा दर्शनाचे आमीष दाखवून चढ्या दरांनी लुटणे हे प्रकार तर सर्रास चालतात. सरकार एकीकडे राज्याच्या पर्यटनाला नवी दिशा देण्याची बात करते आहे. परंतु पावसाळी पर्यटन, अंतर्भागातील पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन वगैरेंची बात करण्याआधी मुळात राज्यातील पर्यटन व्यवसायाला शिस्त लावणे अधिक जरूरी आहे.
पर्यटकांची लूटमार होऊ नये यासाठी बर्‍याच वर्षांपूर्वी पर्यटक पोलीस दल निर्माण करण्यात आले, परंतु पर्यटकांना त्याचा फायदा होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे गोव्यात कोणाची ओळखपाळख नसलेले पर्यटक स्वतःला पर्यटक मार्गदर्शक म्हणवणार्‍या ठगांच्या तावडीत सापडतात आणि गोव्याचा कटू अनुभव घेऊन परत जातात. सरकार या सार्‍याकडे केवळ बघ्याची भूमिका घेऊन बसणार आहे का? मुळात राज्यात येणार्‍या पर्यटकांचे नियोजन आणि नियमन करणारी यंत्रणाच आपल्याकडे नाही. आपला भर केवळ संख्येवर राहिला आहे, गुणवत्तेवर नाही. पर्यटन खाते आणि पर्यटन विकास महामंडळ गोव्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढवण्यावर भर देत असते. त्यासाठी विदेशात वारेमाप पैसा उधळून रोड शो काय केले जातात, दौरे काय आखले जातात, पण येथील पर्यटनाची गुणवत्ता वाढवायचे काय?
गोवा म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’ हाच संदेश गोवा मुक्तीपासून आजवर जगभरात दिला गेला. आता तर कॅसिनोही आहेत! कॅसिनोंना शिस्त कधी लावणार आहात? गेमिंग कमिशनर सक्रिय कधी करणार आहात? पंतप्रधान मोदी ‘डिजीटल इंडिया’ची बात करीत असताना येथील कॅसिनोंमधील व्यवहार राज्य सरकार कॅशलेस का करू इच्छित नाही? सार्‍या अंदाधुंदीला राजाश्रय असल्यासारखेच चित्र आहे. यामुळेच गोव्याच्या पर्यटनक्षेत्रामध्ये ठग आणि लुटारूंचा सुळसुळाट झाला आहे. टॅक्सी लॉबीपासून टुरिस्ट गाईडपर्यंत ह्या ज्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत, त्यांना हात लावण्याची पोलिसांचीही प्राज्ञा नाही, कारण त्यांच्यावर ठिकठिकाणी राजकीय वरदहस्त आहे. हे चित्र बदलले पाहिजे. गोवा म्हणजे अमली पदार्थांचे केंद्र अशी ओळख निर्माण होते आहे, ती पुसून टाकणारी एक बेधडक राज्यव्यापी कारवाई गरजेची आहे. पर्यटन व्यवसायाचे योग्य नियमन झाले तर या क्षेत्रातील गैरप्रकार थांबतील. केवळ संख्येवर भर देण्यापेक्षा गुणवत्तेवर भर यापुढे दिला जावा. गोव्याच्या पर्यटनाला सुसंस्कृत चेहरा दिला गेला पाहिजे. तरच लोकांना येथे कुटुंबीयांसह यावेसे वाटेल आणि गोवा त्यांना आपलासा वाटेल!