गोव्याचा गौरव

0
66

शांत, संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राष्ट्रपतींकडून झालेली नेमणूक ही संपूणर्र् गोव्याची मान उंचावणारी घटना आहे. गोव्यासारख्या छोट्याशा राज्याला दिला गेलेला हा बहुमानच म्हणावा लागेल. जणू सिंधुसागराचा एक पुत्र हिमालयाच्या भेटीला चालला आहे. अर्थात, राज्यपालपदी नेमणूक झालेले ते काही पहिलेच गोमंतकीय नव्हेत. यापूर्वी सत्तरच्या दशकात अँथनी डायस ह्या तत्कालीन आयसीएस अधिकार्‍याची त्रिपुरा आणि पश्‍चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती आणि पंजाबच्या राज्यपालपदी माजी लष्करी सेनानी जनरल सुनीत रॉड्रिग्स यांना नेमले गेले होते. त्यामुळे आर्लेकर हे तसे पाहता त्या पदावर नियुक्ती होणारे तिसरे गोमंतकीय ठरतात, परंतु त्यांचे दोन्ही पूर्वसुरी हे गोव्याबाहेरील वास्तव्यामुळेच देशाला ज्ञात झालेले होते. मात्र श्री. आर्लेकर यांची संपूर्ण कारकीर्द गोव्यात गेलेली असूनही त्यांची राष्ट्रीय स्तरावरून घेतली गेलेली दखल महत्त्वपूर्ण ठरते.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांच्याकडून पराभूत झाले ते बाबू आजगावकर कोलांटउडी मारून भाजपात आले आणि येत्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघाचे दावेदार बनले आहेत हे दिसत असूनही आणि पक्षामध्ये ज्येष्ठता असूनही बंडाची हाकाटी न पिटता नशिबी आलेला राजकीय विजनवास मुकाटपणे पत्करल्याची त्यांना मिळालेली ही बक्षिसी आहे हेही तितकेच खरे आहे. पक्षाचे दुसरे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उमेदवारीवर अशाच एका कोलांटवीरामुळे सावट आल्याने ते जसे अस्वस्थ बनले आहेत, तशी अस्वस्थता न दाखवण्याचे आणि सर्वशक्तिमान पक्षश्रेष्ठींपुढे मान तुकवण्याचे राजकीय शहाणपण आर्लेकर यांनी दाखविले त्यामुळे त्यांना राज्यपालपदी नियुक्त करून त्यांचा आणि पर्यायाने ‘केडर’ चा मान राखला गेल्याचा संदेश पक्षनेतृत्वाने ह्या नेमणुकीतून दिलेला आहे. आर्लेकर यांनी हा समंजसपणा यापूर्वीही अनेकवेळा दाखवला आहे. मंत्रिपद न देता सभापतिपद दिले गेले तेव्हाही आर्लेकर शांत होते. सभापतिपदावरून मंत्रिपदावर आणले गेले तेव्हा महत्त्वाची खाती न देता वन व पर्यावरण खाते दिले गेले तेव्हाही त्यांनी पक्षाचा निर्णय शांतपणे स्वीकारला होता. मनोहर पर्रीकर दिल्लीत जाण्याचे निश्‍चित झाले तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी आर्लेकरांचे नाव सर्वांत पुढे होते. आपण मुख्यमंत्रिपदासाठी पात्र आहोत असे आपल्याला वाटते असे त्यांनी पक्षनेतृत्वाला जरूर सांगितले होते, परंतु जेव्हा त्यांना डावलून पार्सेकरांना ते पद दिले गेले तेव्हाही आर्लेकर शांतच राहिले. बाबू आजगावकर यांच्या भाजप प्रवेशानंतर जी राजकीय समीकरणे बदलली त्यातून आर्लेकरांना आता राजकीय भवितव्य उरले नसल्याचे स्पष्ट झाले होते. पक्षातील आयारामांनी रक्ताचे पाणी करून राज्यात पक्ष रुजवणार्‍या केडरना बाहेरची वाट दाखवल्याचे विपरीत चित्र निर्माण झाल्याने केडरची काही सोय लावणे पक्षासाठी गरजेचे होते. आर्लेकर यांनी आजवर केलेला त्याग लक्षात घेऊन त्यांना हे मानाचे पद देऊन त्यांच्या पक्षनिष्ठेची कदर केली गेली आहे. देशातील सध्याचे बहुसंख्य राज्यपाल हे इतर मागासवर्गीय, वनवासी वर्गातील आहेत. त्याद्वारे सामाजिक समरसतेचा एक संदेशच पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. आर्लेकर शांत प्रकृतीचे जरूर आहेत, परंतु सभापतिपदी येताच त्यांच्यातील हुकूमशहाही नकळत प्रकटला होता हेही गोमंतकीय विसरलेले नाहीत. त्यामुळे आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीत ते त्या संवैधानिक पदाला पक्षीय पदाचे स्वरूप येऊ न देता त्याचा आब राखतील अशी आशा करूया.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोव्याला शेवटी एकदाचा पूर्णकालीक राज्यपाल लाभला आहे. मिझोरामचे राज्यपाल राहिलेले पी. एस. श्रीधरन पिल्लई आता गोव्याचे नवे राज्यपाल असतील. भगतसिंह कोश्यारी यांच्यापाशी गोव्याचा अतिरिक्त ताबा जरूर होता, परंतु ते गोव्याचे राज्यपाल आहेत असे कधी दिसलेच नाही. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्येच त्यांना अधिक रस होता. त्यांच्या आधी सत्यपाल मलिक यांनी आपल्या अल्प कारकिर्दीमध्ये गोव्यावर आपल्या कार्यक्षमतेची विलक्षण छाप टाकली होती, परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बिनसल्याने वर्षभरातच त्यांना जावे लागले. अर्थातच नवे राज्यपाल सरकारशी जुळवून घेणारे असतील हे स्पष्ट आहे. राज्यपालपद हे शोभेचे पद नसते. त्या पदालाही एक प्रतिष्ठा आहे आणि ती सांभाळायची असते. नवे राज्यपाल हे भान जरूर राखतील अशी अपेक्षा आहे. आर्लेकरांना शुभेच्छा देऊया आणि नव्या राज्यपालांचे स्वागत करूया!