गोवा शिवसेना प्रमुखपदी सुदिप ताम्हणकरांची नियुक्ती

0
92

अखिल गोवा बस मालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांची राज्य शिवसेना प्रमुखपदी नियुक्ती केल्याची घोषणा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केली. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यासंबंधिचा आदेश जारी केला आहे.

ताम्हणकर यांनी अनेकजणांविरुध्द माहिती हक्क कायद्याखाली तक्रारी केल्या आहेत. सरकारचे दडपण आल्यास त्या मागे घेणार काय, असा प्रश्‍न ताम्हणकर यांना विचारला असता, राऊत यांनी हस्तक्षेप करीत तो प्रश्‍न येऊ शकत नाही, असे
सांगितले.
सेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलून आपली अध्यक्षपदी निवड केल्याने ज्येष्ठ नेते नाराज होणार नाहीत काय, असा प्रश्‍न ताम्हणकर यांना विचारला असता, सेनेने सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच आपली निवड केली आहे, त्यामुळे हा प्रश्‍न येतोच कुठे, असा प्रती प्रश्‍न ताम्हणकर यांनी केला. आपण पक्ष संघटनेचे काम वाढवणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
विधानसभेच्या २५ जागा लढविणार : राऊत
आगामी २०१७च्या विधानसभा निवडणुकीत २० ते २५ जागा लढविणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप बरोबर युती करणार नाही. मगो पक्षाने प्रस्ताव दिल्यास त्यांच्याबरोबर युती करणार असे राऊत यांनी सांगितले. भाभासुमं व मराठी राजभाषा समिती यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेवर असलेल्या भाजपने हिंदूत्वासाठी काहीही केलेले नाही. हिंदूत्वाची विचारधारा असणे वेगळे व प्रत्यक्ष त्याचे पालन करून कार्य करणे वेगळे याकडे त्यांनी लक्ष वेधले. गोव्यात रशियन-इस्त्रायलींचे राज्य चालते. त्यामुळेच दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्‍न उपस्थित झाला. शिवसेनेचे कार्य गोव्यात बर्‍याच वर्षांपासून सुरू झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत येण्यासाठी आजी-माजी अनेक आमदार संपर्क करून आहेत, असे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. केजरीवाल यांनी दिल्लीत काही काळाच्या आत राज्य स्थापन केले. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला गोव्यात पक्षबांधणी करणे का शक्य होणार नाही, असा सवाल त्यांनी केला.