गोवा लोकसेवा आयोगाची २४ व २५ रोजी परीक्षा

0
120

राज्यात कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या १५ जागा रिक्त असून ही पदे भरण्यासाठी २४ व २५ जुलै रोजी गोवा लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार असल्याची माहिती आयोगाचे चेअरमन जुझे मान्युएल नोरोन्हा यांनी दिली. वरील पदांसाठीच्या २९ जागा रिक्त होत्या. त्यासाठी आतापर्यंत तीन वेळा परीक्षा घेण्यात आल्या.

पहिल्यांदा जेव्हा परीक्षा घेण्यात आली तेव्हा केवळ एकच उमेदवार उत्तीर्ण झाल्याने एक जागा भरली. त्यानंतर घेतलेल्या परीक्षेत ७ उमेदवार उत्तीर्ण झाल्याने ७ जागा भरल्या. हल्लीच झालेल्या परीक्षेत १४ उमेदवार उत्तीर्ण झाल्याने आणखी १४ जागा भरण्यात आल्या, आता आणखी १५ जागा भरायच्या असून त्यासाठी २४ व २५ जुलै रोजी परीक्षा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आता शिल्लक असलेल्या १५ जागांसाठी ३ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत.

कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांची २९ पदे भरण्यासाठी गेल्या ४ वर्षांपासून गोवा लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेतल्या जात असल्या तरी फारच कमी उमेदवार या पदांसाठी आवश्यक तेवढे गुण मिळवण्यास यशस्वी होत नसल्याने ही पदे भरण्यात अडचणी येत असल्याचे नोरोन्हा यांनी स्पष्ट केले.