गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

0
222

गोव्याची चित्रपटसृष्टी बर्‍यापैकी नावलौकिक मिळवत असून राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू झाल्यानंतर आता अनेक चित्रपट महोत्सव होत आहेत. याचे श्रेय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जाते. चित्रपट महोत्सवामुळे गोमंतकीय निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांना चित्रपट बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, असे मत वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित ९ व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या उद्घघाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार नरेंद्र सावईकर, ईडीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव दौलत हवालदार, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर, उपाध्यक्ष राजेंद्र तालक व सचिन चाटे उपस्थित होते.

सावईकर म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची चित्रपटांमुळे ओळख वाढत चालली आहे. मुख्य म्हणजे नवीन पिढी या क्षेत्राकडे व्यवसायाच्या दृष्टीने पुढे येत आहे ही चांगली गोष्ट आहे.
कुंकळकर यांनी, गोमंतकीय चित्रपटांमध्ये सध्या वाढ होत असून नवनवीन संकल्पनेचे चित्रपट तयार होत आहेत. संस्थेने अशाच प्रकारे गोमंतकीयांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले.

तालक यांनी, गोमंतकीय चित्रपटांना मदत व्हावी यासाठी संस्था प्रयत्नरत आहे. महोत्सवात एकूण १० फिचर चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून यातील नऊ कोंकणी तर एक मराठी चित्रपट असल्याची माहिती दिली.
उद्घाटनावेळी महोत्सवात प्रदर्शित चित्रपटांच्या निर्मात्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ‘के सेरा सेरा’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली व त्यानंतर ‘मार्टीन्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
महोत्सवात आजचे चित्रपट ः
आज दि. ४ रोजी चार चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. दुपारी १२ वाजता ‘बिग बेन’, त्यानंतर २.३० वाजता ‘कनेक्शन’, संध्या ५.३० वा. ‘महाप्रयाण’ व संध्या. ७.३० वाजता ‘व्हॉर ऑन’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. हे सर्व चित्रपट मॅकनिझ पॅलेस १ मध्ये प्रदर्शित केले जातील.