भारतासमोर इंग्लंडचे पुन्हा लोटांगण !

0
143

>> दिवसअखेर टीम इंडिया १ बाद २४

>> अक्षर, अश्‍विनचा प्रभावी मारा

अक्षर पटेल व रविचंद्रन अश्‍विन या भारतीय फिरकी दुकलीसमोर इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात लोटांगण घातले. अतिरिक्त फलंदाजासह उतरूनही इंग्लंडला पहिल्या डावात केवळ २०५ धावा करता आल्या. पहिल्या दिवसअखेर भारताने गिलला गमावून २४ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ अजून १८१ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ९ गडी बाकी आहेत.

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट नाणेफेकीच्या बाबतीत पुन्हा एकदा सुदैवी ठरला. नाणेफेक जिंकून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डॉम सिबली (२) याचा त्रिफळा उडवत अक्षरने भारताला पहिले यश मिळवून दिले. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात ८७ धावा केल्यानंतर त्याचा हरवलेला फॉर्म कायम राहिला. मागील सहा डावात त्याला केवळ ४४ धावा करता आल्या आहेत. दुसरा सलामीवीर क्रॉवली याला अतिसकारात्मकता भोवली. पुढे सरसावून अक्षरची दिशा व टप्पा बिघडवण्याच्या नादात त्याने मिड ऑफवर सोपा झेल देत तंबूची वाट धरली.
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, सिराजच्या इनस्विंगने ‘बॅकफूट’वर यष्ट्यांसमोर गाठल्याने रुटला पायचीत होऊन माघारी परतावे लागले. सिराजने बॅअरस्टोवला पायचीत करत इंग्लंडची ४ बाद ७८ अशी स्थिती केली. स्टोक्सने आपले २४वे कसोटी अर्धशतक झळकावत ५५ धावांची खेळी केली. ओली पोपसह त्याने पाचव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी रचली. सुंदरच्या ‘आर्म बॉल’ने त्याची चिवट झुंज संपवली. १२१ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार व २ षटकारांसह त्याने आपली अर्धशतकी खेळी सजवली. डॅन लॉरेन्स व ओली पोप यांनी सहाव्या विकेटसाठी ४५ धावा जोडत भारताची डोकेदुखी वाढवली. पोपला बाद करत अश्‍विनने ही धोकादायक जोडी फोडली. मोठा फटका खेळून अर्धशतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात लॉरेन्स (४६) यष्टिचीत झाला.
यानंतर इंग्लंडच्या तळातील इतर फलंदाजांनी फारसा प्रतिकार केला नाही.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने शुभमन गिल (०) याला लवकर गमावले.
अँडरसनने आपल्या स्पेलची पाचही षटके निर्धाव टाकताना भारताला हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. दिवसअखेर रोहित ८ व पुजारा १५ धावा करून नाबाद होता.
इंग्लंडने या सामन्यासाठी केवळ तीन स्पेशलिस्ट गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय घेताना डॅन लॉरेन्स व डॉम बेस यांना संधी दिली. जोफ्रा आर्चर व स्टुअर्ट ब्रॉड यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दुसरीकडे भारताने जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला उतरवले.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः झॅक क्रॉवली झे. सिराज गो. पटेल ९, डॉम सिबली त्रि. गो. पटेल २, जॉनी बॅअरस्टोव पायचीत गो. सिराज २८, ज्यो रुट पायचीत गो. सिराज ५, बेन स्टोक्स पायचीत गो. सुंदर ५५, ओली पोप झे. गिल गो. अश्‍विन २९, डॅन लॉरेन्स यष्टिचीत पंत गो. पटेल ४६, बेन फोक्स झे. रहाणे गो. अश्‍विन १, डॉम बेस पायचीत गो. पटेल ३, जॅक लिच पायचीत गो. अश्‍विन ७, जेम्स अँडरसन नाबाद १०, अवांतर १०, एकूण ७५.५ षटकांत सर्वबाद २०५
गोलंदाजी ः इशांत शर्मा ९-२-२३-०, मोहम्मद सिराज १४-२-४५-२, अक्षर पटेल २६-७-६८-४, रविचंद्रन अश्‍विन १९.५-४-४७-३, वॉशिंग्टन सुंदर ७-१-१४-१
भारत पहिला डाव ः शुभमन गिल पायचीत गो. अँडरसन ०, रोहित शर्मा नाबाद ८, चेतेश्‍वर पुजारा नाबाद १५, अवांतर १, एकूण १२ षटकांत १ बाद २४
गोलंदाजी ः जेम्स अँडरसन ५-५-०-१, बेन स्टोक्स २-१-४-०, जॅक लिच ४-०-१६-०, डॉम बेस १-०-४-०