गोवा माईल्स टॅक्सी सेवेला सरकारचा पूर्ण पाठिंबा ः सोपटे

0
122

राज्य सरकारचा गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेला पूर्ण पाठिंबा आहे. गोवा माईल्स टॅक्सी सेवेत सहभागी होणारे टॅक्सी मालक व चालकांसाठी आर्थिक व इतर साहाय्य योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
ईडीसीकडून टॅक्सी खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच कर्जदाराला अनुदान आणि वाहन विम्यासाठी सवलत उपलब्ध करून दिली जाणार आहे. टॅक्सी मालक व चालकांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे, असेही सोपटे यांनी सांगितले.

राज्यात काही टुरिस्ट टॅक्सी चालकांकडून पर्यटकांची लुबाडणूक केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारीमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे राज्यात पर्यटनासाठी येणार्‍या विदेशी आणि देशी पर्यटकांना पारदर्शक आणि योग्य टॅक्सी सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. या टॅक्सी सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे असे सोपटे म्हणाले.

गोवा माईल्सच्या टॅक्सी मालक व चालकांसाठी कर्ज सुविधा.
मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना
५५ टॅक्सींसह सुरुवातीनंतर १४५० टॅक्सींचा सहभाग
दर महिन्याला शंभर टॅक्सींचा सहभाग
८५% व्यवहार डिजिटल