गोवा माईल्स – काळ्यापिवळ्या टॅक्सीवाल्यांत भांडण ः ६ अटकेत

0
128

मडगाव येथील कोंकण रेल्वे स्टेशनसमोर काल सकाळी गोवा माईल्स टॅक्सी चाकलाने प्रवाशांना आपल्या टॅक्सीत घेतल्याने स्टेशनवरील काळ्यापिवळ्या टॅक्सी चालकांमध्ये भाड्यावरून भांडण झाले व प्रकरण मारहाणीपर्यंत गेल्याने मडगाव पोलिसांनी सहाजणांना अटक केली.

कलिंदर नाईकवाडा हा गोवा माईल्सचा टॅक्सी चालक मडगाव बाहेरून रेल्वे स्टेशनवर भाडे घेवून आला होता. परत जाताना त्याला रेल्वेचे आलेल्या प्रवाशाचे भाडे मिळाले. त्यावरून रेल्वे स्टेशनवरील काळ्यापिवळ्या टॅक्सी चालक दामोदर नाईक याने विरोध केला. त्यावरून गोवा माईल्स व या टॅक्सीचालकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी गोवा माईल्स टॅक्सीचालक कलिंदर याने रेल्वे स्टेशनजवळ आझाद नगरीतील दोघांना तातडीने बोलावून घेतले. अब्दूल सैयद व आनंद देवर हे या आझाद नगरीतील दोघे आले. त्यानी दामोदर नाईक यांच्याशी हुज्जत घातली व मारहाण केली. त्या घडामोडीत कलिंदर भाडे घेवून परतला. या मारहाणीत दामोदर नाईक जखमी झाला व त्याच्या गाडीचीही मोडतोड झाली. त्याचवेळी आणखी गोवा माईल्स चालक पोहचले व त्यानीही दामोदर याला मारहाण केल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर दोन्ही गटांतील चालक गोळा होताच पोलीस तेथे पोहचले व त्यांना शांत केले. याप्रकरणात कलिंदर नाईकवाडो याने दामोदर नाईक याच्या विरोधात तर दामोदर नाईक याने कलिंदर विरोधात तक्रार नोंदविली. मडगाव पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या व मारहाणीत गुंतलेल्या गोवा माईल्सच्या भानुदास चव्हाण (रावणफोंड), सागर वडियेकर (पेडणे), व्यंकटेश भिसे व अब्दुल सैयद, आनंद देवर या पाच जणांना व काळ्यापिवळ्या टॅक्सी चालक दामोदर नाईक याना अटक केल्याचे पोलीस निरिक्षक तुषार लोटलीकर यानी सांगितले.