गोवा फॉरवर्ड पक्ष रालोआतून बाहेर

0
149

>> पत्रकार परिषदेत विजय सरदेसाईंची माहिती

मंगळवारी झालेल्या ‘गोवा फॉरवर्ड पक्षा’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाने केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून रितसरपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे काल पक्षाचे प्रमुख व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी सरदेसाई यांनी, खरे म्हणजे आम्ही जुलै २०१९ पासूनच एनडीएबरोबर नव्हतो. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर गोव्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राज्यातील जनतेचा विश्‍वासघातच केला आहे. हे सरकार नवी दिल्लीतील उद्योगपतींच्या तालावर नाचत असून गोवा हे ‘कोळशाचे केंद्र’ बनवू पाहत असल्याचा आरोप केला.

आम्ही रालोआतून कायमचे बाहेर पडलो असल्याचे सांगून त्यांना पुन्हा कधीही पाठिंबा द्यायचा नाही असे आम्ही म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरात गार्‍हाणे घालून स्पष्ट केले असल्याचे सरदेसाई म्हणाले. गोवा फॉरवर्ड पक्षाने पाठिंबा काढल्याचे पत्र आम्ही रालोआचे अध्यक्ष अमित शहा यांना पाठवल्याची माहिती यावेळी सरदेसाई यांनी दिली.

विकासाच्या मुद्द्यावरून
पर्रीकरांना पाठिंबा

२०१२ साली गोवा फॉरवर्डने विकासाच्या मुद्द्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पाठिंबा दिला होता. पर्रीकर यांनी तेव्हा गोव्याच्या विकाससाठी केंद्राकडून १६ हजार कोटी रु. आणले होते. आणि त्याद्वारे राज्यात महामार्ग व मोठमोठ्या पुलांचे काम सुरू झाल्याचे सरदेसाई म्हणाले. त्यावेळी भाजप हा खरोखरच वेगळ्या प्रकारचा पक्ष होता (पार्टी विथ अ डिफरन्स) असे उद्गारही यावेळी सरदेसाई यांनी काढले.

समविचारी पक्षांनी एकत्र यावे
२०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी स’विचारी पक्षांना एकत्र यावे लागेल. ही भाजपविरोधी निवडणूकपूर्व आघाडी करण्यासाठी पुढाकार घेण्यास गोवा फॉरवर्ड पक्ष तयार आहे. त्यासाठी आपण स्वतः कुणाशीही प्रस्ताव घेऊन बोलणी करू असे गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.