गोवा फॉरवर्डची पुतळ्याची मागणी कायम : ट्रॉजन

0
114

वधानसभा संकुलात यापुढे कुणाचाही पुतळा उभारायचा नाही असा निर्णय भाजपने आपल्या गाभा समितीच्या बैठकीत घेतलेला असला तरी विधानसभा संकुलात जनमत कौलाचे हिरो जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा ही पर्रीकर सरकारातील एक घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाची मागणी कायम आहे. पक्षाने ती सोडून दिली नसल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

जनमत कौलासंबंधी आमच्या तीन मागण्या होत्या. त्यांपैकी जनमन कौल साजरा करणे व जनमत कौलासंबंधीच्या पाठाचा पाठ्यपुस्तकात समावेश करणे ह्या दोन्ही मागण्या सरकारने मान्य करून जनमत कौल सरकारी पातळीवर साजरा केला. तर जनमत कौलासंबंधीच्या पाठाचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याची मागणीही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी मान्य केली आहे. जनमत कौलाचे हिरो जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभा संकुलात उभारणे ही गोवा फॉरवर्डची तिसरी मागणी आहे. ती सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. मात्र, त्यासाठी एकमत व्हावे अशी आमची इच्छा आहे व त्यासाठी पक्षाचे नेते प्रयत्न करणार असून मागणी मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे डिमेलो यांनी यावेळी सांगितले.

रोमची बांधणी एका रात्रीत झाली नव्हती असे सांगून जॅक सिक्वेरा यांचा पुतळाही एका रात्रीत विधानसभा संकुलात उभा राहणार नाही याची आम्हांला जाणीव आहे. मात्र, आजा ना उद्या तो तेथे उभारण्यात यावा यासाठी पक्ष प्रयत्नरत असल्याचे डिमेलो यांनी नमूद केले. सर्वांचा पाठिंबा मिळवून विधानसभा प्रकल्पात सरकारला जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारायला गोवा फॉरवर्ड लावील, असे डिमेलो यांनी शेवटी सांगितले.