– दिलीप बोरकर
‘सुंदर गोवा, स्वच्छ गोवा’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून गोवा प्लास्टिकमुक्त करण्याचे स्वप्न हे प्रत्येक विचारी माणसाचे आहे. म्हणूनच रस्त्याच्या कडेला, वसाहतीच्या प्रत्येक नाक्यांवर प्लास्टीकच्या कचर्याचे ढिगारे पाहिले म्हणजे प्रत्येक सुजाण नागरिकांच्या कपाळावर आठ्या उभारून आलेल्या दिसतात. ज्यांचे मन संवेदनशील आहे आणि प्लास्टीकच्या या राक्षसाचे दुष्परिणाम ज्यांनी जाणलेले आहेत, ते प्लास्टिक कचरा करणार्यांच्या नावे आणि साचलेल्या ढिगार्यांच्या नावेही बोटे मोडत असतात. पण तो प्लास्टीकचा कचरा बंद करावा अथवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मात्र क्वचितच कुणाला तरी वाटते.
‘सुंदर गोवा, स्वच्छ गोवा’ बनवण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांनीही कंबर कसलेली आहे. राज्याला प्लास्टीकमुक्त करण्याचे ध्येय मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात व्यक्त केले होते. सध्या मुख्यमंत्री आपल्या प्रत्येक वक्तव्याला आपण मतदारांना दिलेले वचन मानून ते पूर्ण करण्याच्या कामाला लागलेले आहेत. निदान प्रयत्न तरी करत आहेत, ही खरोखरच स्वागतार्ह बाब आहे. त्यांच्या सदर धोरणाला म्हणा अथवा कृतीला म्हणा, प्रत्येक गोमंतकीयांनी पक्षभेद, व्यक्तीगत हेवेदावे विसरून सक्रिय सहकार्य देणे आवश्यक आहे. कारण ज्या आदर्श गोव्याची स्वप्ने त्यांनी बाळगलेली आहेत ती फक्त त्यांच्या एकट्यासाठीच नाहीत तर ती सर्व आम जनतीय गोमंतकीयांची आहेत. ‘सुंदर गोवा स्वच्छ गोवा’ ही जर त्यांची खरोखरच तळमळ आणि कळकळ असेल तर ती सत्यसृष्टीत उतरविण्यासाठी त्यांना सहकार्य करणे हे प्रत्येक गोमंतकीय नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.
राज्यात प्लास्टीक कचर्याचे भीषण संकट ओढवलेले आहे, याचे भान गोमंतकीयांना तेव्हाच आले, जेव्हा पर्यटनाच्या नावाने गोव्यात येणार्या विदेशी नागरिकांची चार्टर्ड विमाने बंद झाली. गोवा हा कचर्याने बरबटलेला गलिच्छ प्रदेश बनत चाललेला असल्याने या पर्यटनस्थळी जाण्याचा आम्हाला रस नाही असे जेव्हा विदेशी नागरिकांनी स्पष्टपणे हल्लीच स्पष्ट केले तेव्हाच सरकारचे धाबे दणाणले होते, कारण विदेशी पर्यटकांनी जर कचर्याच्या नावाने गलिच्छतेच्या नावाने गोव्याकडे पाठ फिरवली तर गोवा पर्यटनाच्या नावाने गोव्याला लाभणार्या आर्थिक महसुलाला आपण मुकणार आहोत.
आज आम्ही कितीही बढाया मारल्या तरी गोव्याची महत्त्वाची आर्थिक बाजू पर्यटनावर अवलंबून आहे. देशी विदेशी पर्यटकांकडून दरवर्षी मिळणार्या कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नामुळे गोव्याची आर्थिक व्यवस्था बळकट आहे, हे विसरणे शक्य नाही. असे असताना गोव्यातील गलिच्छतेमुळे गोव्यात जाणे आम्ही टाळतो असे विदेशातील एकानेसुद्धा वाच्यता केली तर तो संदेश संपूर्ण जगात पोहोचतो आणि मुंगी अंगावर चढेल या भीतीनेसुद्धा शहारणारे काही विदेशी या वदंतांनीसुद्धा आपले नियोजित पर्यटन टाळतात. तेव्हा विदेशी पर्यटकांना विश्वास देण्यासाठी तरी आता ‘सुंदर गोवा, स्वच्छ गोवा’ याचे नारे लावणे आवश्यक आहे. त्यानिमित्ताने ही प्लास्टिकमुक्त मोहीम नक्कीच फायद्याची ठरेल. गोव्यातील कुठलाच भाग प्लास्टिकच्या कचर्याशिवाय नाही. गोव्यातील समुद्रकिनारे हे प्लास्टिकमुक्त आहेत असे भले मोठे फलक सगळीकडे लागलेले दिसतात. पण एकही महाभाग त्या फलकावरील सूचनांचे पालन करत नाहीत. त्या सूचना आणि त्यावरील शिक्षेची धमकी आपल्यासाठी नाहीच असा प्रत्येकाचा समज असतो. सर्रासपणे हातातल्या बियरच्या आणि पाण्याच्या बाटल्या समुद्रकिनारी भिरकावून देण्याचे उदात्त कार्य पर्यटकच नव्हे तर स्थानिकसुद्धा इमाने – इतबारे पार पाडत असतात.
आता सरकारतर्फे जागतिक पर्यावरण दिनापासून एक अभिनव मोहीम सुरू होणार आहे. ज्यामुळे गोवा राज्य संपूर्ण प्लास्टिकमुक्त होणार आहे. गोवा राज्याला कचरामुक्त करताना सरकारला आणि सरकारी यंत्रणेला शिंका आलेल्या आहेत. अजूनकाही कचरामुक्तीवर तोडगा काढणे कोणालाच शक्य झालेले नाही. कारण कचरा करणारे हे सगळे सुशिक्षित शहरी लोकच असतात आणि त्यांना दुखवून सरकारला चालत नसते. कारण तेच नगरपालिकेला कररूपाने अर्थ पुरवठा करत असतात.
गोव्यात प्लास्टिकचा कचरा का होतो हे जाणून घेण्यासाठी खरे म्हणजे सर्वप्रथम मोहीम राबवायला हवी. आज शहरातील प्रत्येक मार्केटामधील फळ विक्रेत्यांकडे, भाजी विक्रेत्यांकडे जाऊन बघा, दोन फळांसाठीसुद्धा यंत्रवत प्लास्टीकची पिशवी बाहेर येते. एका गाळ्यावर खरेदी करून, त्याच्याकडून एक प्लास्टीकची पिशवी, दुसर्याकडून दुसरी असे करत त्यात आठ नगांची खरेदी करणारे ग्राहक सात-आठ प्लास्टिकच्या पिशव्या घरी घेऊन येतात. या पिशव्या परत वापरणार म्हटले तरी त्यांच्याकडून ती अपेक्षाच नसते. मांसळी, मांस वगैरेच्या गलिच्छ पिशव्या हे सुशिक्षित लोक रस्त्यावर फेकून देत असतात. आपले घर स्वच्छ झाले म्हणजे झाले, परिसराची स्वच्छता ही आपली जबाबदारी नाही अशी धारणा असणार्यांकडूनच हा प्लास्टिक कचरा होत असतो.
सर्वप्रथम फळवाले, भाजीवाले यांच्याकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्या कोणाकडून येतात याची चौकशी सरकारी यंत्रणेने करायला हवी. गोव्यात असल्या पिशव्या कोण पुरवतो, याची चौकशी करणे कठीण नव्हे. आज गोव्यात प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहबांधणी मंडळाच्या वसाहती उभ्या होत आहेत. इथल्या फ्लॅटमध्ये स्थायिक होणारे नवश्रीमंत हे स्वतःला सुधारित नागरिक समजून, सभ्यतेचा आव आणत उच्च दर्जाचे जीवन जगण्याचा देखावा करतात. असल्या वसाहतीच्या प्रत्येक नाक्यावर टाकण्यात येणार्या पिशव्या आणि प्लास्टीक कचरा हा याच लोकांचे कर्म असते. स्वतःला सुधारित मानून सुशिक्षितपणाचा आव आणणार्या या लोकांना प्लास्टिकच्या पिशव्या घरी घेऊन येणे आणि त्या बेवारशी टाकताना जरा सुद्धा शरम वाटत नाही. अशा लोकांना शिस्त लावण्यासाठी सरकारकडे काय उपाय आहे? वसाहतींचा परिसर हा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचर्याचा परिसर असल्याचे चटकन डोळ्यात भरते. यात कमी म्हणून की काय महामार्गाच्या दोनही कडांनी प्लास्टिकच्या कचर्याचा नुसता खच पडलेला दिसून येतो. महामार्ग ही त्या राज्याची संस्कृती असते. तीच संस्कृती जनतेच्या अंगी भिनवण्यासाठी गुरूनाथ केळकरांसारखे साहित्यिक आणि स्वातंत्र्यसैनिक मार्ग नावाची ‘मार्ग’ नावाची चळवळ चालवतात. रस्त्यावरील हा कचर्याचा ढिगारा पाहून त्यांच्या डोळ्यांत नेहमीच अश्रू आणि चिंता दाटलेली असते. पण ही संवेदना तसुभरसुद्धा हा कचरा उत्पन्न करणार्यांच्या डोळ्यांत दिसू नये ही दुर्दैवाची बाब आहे.
प्लास्टिक कचर्याचे दुष्परिणाम आज जगासमोर आहेत. प्लास्टीक कचरा पणजीसारख्या शहरातील सरकारी वसाहतीतील सरकारी कर्मचारी दिवसाढवळ्या जाळत असताना दिसतात. त्यांच्या धुराने शेजार्यांच्याच नव्हे तर आपल्याच मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार हे या लोकांना जाणून घ्यायचे नाही. पाटो भागात गोवा राज्य प्रदूषण मंडळ आहे. तिथल्या कर्मचार्यांना बसल्या ठिकाणाहून पाटो रस्त्यावर केबल जाळून निघणारा धूर दिसत असतो. पण कारवाई करण्याचे त्यांना सुचत नाही. अशी ही अत्यंत घाण, मानसिकता समाजात रुळलेली असताना प्लास्टिकविरोधी मोहिम ही खरोखरच आव्हानात्मक बाब आहे. ही मोहीम राबविण्यापूर्वी आमच्या सुशिक्षित नागरिकांची ही विकृत मानसिकता बदलण्याची मोहीम सर्वप्रथम राबविणे आवश्यक आहे. तेव्हाच ‘सुंदर गोवा, स्वच्छ गोवा’ मोहिमेला यश मिळेल.