गोवाकेंद्रित जाहीरनामा देण्याची फालेरोंची ग्वाही

0
107

गोवाकेंद्रित व गोमंतकीयांसाठीचा, विशेष व खर्‍या अर्थाने वेगळा असा जाहीरनामा यावेळी कॉंग्रेस पक्ष तयार करणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल कॉंग्रेस आमदार दिगंबर कामत व विश्‍वजीत राणे यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. हा जाहीरनामा तयार करण्यापूर्वी विविध घटकांची मतेही विचारात घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्हाला गुजरात किंवा दिल्ली मॉडेल नको आहे आणि म्हणूनच आम्ही गोवाकेंद्रित जाहीरनामा तयार करण्यावर भर दिला आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या जाहीरनामा समितीची पहिली बैठक काल मंगळवार दि. २० रोजी झाली. आमदार कामत व राणे यांच्यासह समितीचे अन्य सदस्य यावेळी हजर होते, अशी माहिती फालेरो यांनी यावेळी दिली. चांगल्या प्रशासनासाठी पोषक ठरू शकेल, असा हा जाहीरनामा असेल, तसेच जाहीरनाम्यातून दिलेली सर्व आश्‍वासने पाळण्यात येतील. आम्ही खोटी आश्‍वासने देणार नाही किंवा ‘यू टर्न’ घेणार नाहीत, असेही फालेरो यांनी यावेळी नमूद केले.
भाजपचा यू टर्न
भाजपने राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी लोकांना कित्येक आश्‍वासने दिली होती. पण जाहीरनाम्यातून दिलेल्या सर्व आश्‍वासनांना भाजप नेत्यांनी हरताळ फासल्याचा आरोप फालेरो यांनी केला. केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेही देशवासीयांना मोठमोठी आश्‍वासने दिली होती. स्वीस बँकेत असलेला २२ लाख कोटी एवढा काळा पैसा देशात आणण्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले होते पण त्यांनी त्याबाबतीत जनतेची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणून जनतेचे हाल केल्याचे फालेरो यांनी सांगितले. सध्या राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून भारतीय रिझर्व्ह बँकेनेही त्याची दखल घेतली असल्याचे फालेरो यांनी स्पष्ट केले.