गोमेकॉसमोरील गाडेधारकांचे ८ दिवसांत पुनर्वसन : मुख्यमंत्री

0
24

गोमेकॉसमोरील ज्या गाडेधारकांचे गाडे हटवण्यात आले होते, त्यांचे येत्या ८ दिवसांच्या आत पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य प्रहरावेळी विधानसभेत सांगितले.
सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी शून्य प्रहरावेळी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना फर्नांडिस यांनी या गाडेधारकांचे सरकारने विनाविलंब पुनर्वसन करावे, अशी मागणी केली.

या गाडेधारकांच्या पुनर्वसनासाठी आपण गेल्या काही माहिन्यांपासून अथकपणे प्रयत्न करीत आहे; पण त्यांच्या पुनर्वसनाची फाईल काही केल्या पुढे सरकत नसल्याचा आरोप फर्नांडिस यांनी केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या गाडेधारकांपैकी काही जण न्यायालयात गेले होते. त्यामुळे समस्या निर्माण झाली; मात्र आता आठवडाभरात त्यांचे पुनर्वसन करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.