गोमंतकीयांनी म्हादईप्रश्नी आता आंदोलन पुकारायलाच हवे : सरदेसाई

0
4

म्हादईप्रश्नी अमित शहा यांनी केलेले वक्तव्य गंभीर स्वरूपाचे आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवण्यास मान्यता दिली असे ते वक्तव्य असून, त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र मौनच बाळगलेले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील नीलेश काब्राल व सुभाष शिरोडकर या दोघा मंत्र्यांनी अमित शहा हे खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आता गोव्यातील जनतेचे आंदोलनाचे रणशिंग फुंकायलाच हवे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

राज्यातील भाजप सरकारने गोमंतकीयांच्या भावनेशी खेळ मांडलेला असून, शहांच्या वक्तव्यानंतर गोमंतकीयांची झोप उडाली आहे; मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शांत झोप घेत आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
सरकारने सभागृह समितीची बैठक लवकर बोलवायला हवी होती; मात्र सरकारने ती बैठक 8 फेब्रुवारीला ठेवली आहे. त्यामुळे गोवा सरकार म्हादईप्रश्नी झोपा काढत आहे, असेही सरदेसाई म्हणाले.

गोव्याला म्हादईप्रश्नी केंद्र सरकार दरबारी आणि न्यायालयात न्याय मिळेल की नाही याबाबत शंकाच असल्याचे सांगून, आता गोमंतकीयांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. गोमंतकीयांनी रस्त्यावर उतरावे, मेणबत्त्या पेटवाव्यात आणि निद्रिस्त मुख्यमंत्र्यांना जागे करण्यासाठी भांडी वाजवावीत, असेही सरदेसाई म्हणाले.