आम आदमी पार्टीतर्फे राज्यातील वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठी येत्या १ डिसेंबरपासून वीज आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आपचे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यभरात वीज आंदोलनाअंतर्गत सुमारे २०० कोपरा बैठका घेण्यात येणार आहेत. तसेच, पार्टीचे कार्यकर्ते घराघरांत जाऊन मोफत विजेबाबत जनजागृती करणार आहेत, असेही म्हांबरे यांनी सांगितले. नवी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारकडून नागरिकांना २०० युनिट विजेचा पुरवठा मोफत केला जात आहे. त्याच धर्तीवर गोवा सरकारने खास योजना तयार करण्याची मागणी करीत सरकारवर दबाव आणण्यासाठी वीज आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही म्हांबरे यांनी सांगितले.