Home बातम्या गोमंतकीयांना आज लाभणार गडकिल्ल्यांच्या अभ्यासाची सुवर्णसंधी

गोमंतकीयांना आज लाभणार गडकिल्ल्यांच्या अभ्यासाची सुवर्णसंधी

0

संवर्धन तर्फे दुर्गाभ्यासाबाबत विशेष कार्यशाळा

पुरातत्त्व विषयावर सर्वसाधारणपणे दिसून येणार्‍या अनास्थेच्या पार्श्वभूमीवर गड किल्ल्यांवर व ऐतिहासिक वारशावर प्रेम करणार्‍या काही तरुणांनी आज व उद्या पणजीत ‘दुर्गाभ्यास’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. ‘दुर्ग प्रकार आणि व्याख्या’, ‘सह्याद्री आणि दुर्ग’, ‘कथा दुर्गांच्या’, ‘दुर्ग कसे पाहावेत’, ‘शिवकालीन दुर्ग व्यवस्थापन’, ‘किल्यांवरील उत्खनने आणि पुरातत्त्वीय अवशेष’, ‘गोव्यातील किल्ले’, तसेच ‘जीपीएस, उपग्रह प्रतिमा आणि किल्ले’ अशा वेगळ्या विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने हे या दोन दिवशीय कार्यशाळेचे ठळक वैशिष्ट्य आहे.

या कार्यशाळेसाठी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्यकर्ते महेश तेंडुलकर तसेच पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पदव्युत्तर संशोधन संस्थेचे पुरातत्त्व विभागाचे संशोधन सहाय्यक सचिन जोशी हे गोव्यात आले असून विविध सत्रांमधून ते सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. श्री. तेंडुलकर यांची मध्ययुगीन इतिहास, किल्ले, पर्यटन आदी विषयांवरील पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली असून ‘गोव्यातील पर्यटन’ या त्यांच्या अलीकडच्या पुस्तकातून गोव्यातील पर्यटनस्थळांचे ऐतिहासिक महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे. पोर्तुगीज चर्चमधील घंटांचाही त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. सचिन जोशी यांनी माणिकदुर्ग, कासारदुर्ग आदी अपरिचित किल्ले इतिहासातील वर्णनांच्या आधारे शोधून काढण्याची अनोखी कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्ह्यातील किल्ल्यांवरील एक पुस्तक त्यांनी लिहून पूर्ण केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्लयांवरील पुस्तके येऊ घातली आहेत. श्री. तेंडुलकर व श्री. जोशी यांच्या बरोबरच सचिन मदगे हेही एक व्याख्यान देणार आहेत. गोव्यातील ४५ किल्ल्यांची यादी प्रथमच त्यांनी बनवली असून मराठा – पोर्तुगीज संबंधांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.

वरद सबनीस व सचिन मदगे या पुरातत्त्वप्रेमींच्या ‘संवर्धन’ या आस्थापनातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून अशा प्रकारचा गोव्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, तसेच त्यांच्या रचनेची माहिती देतानाच किल्ले कसे पाहावेत, याचेही मार्गदर्शन या कार्यशाळेतून केले जाणार आहे. संशोधक, गिर्यारोहक, निसर्गप्रेमी व आम नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल असा विश्वास या दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे.