गोमंतकातील मराठी शिक्षणाचा इतिहास

0
694

– विष्णू सुर्या वाघ

संतवाङ्‌मयाच्या वाचन-पठणाबरोबरच गोमंतकात कथा-कीर्तने, पुराण-निरुपणे, भजन-प्रवचने मराठीतूनच होत असत. हरिदास, पुराणिक, प्रवचनकार यांची ये-जा चालू असे. संत आणि संतवाङ्‌मय यांच्यामुळे मराठी भाषा गोव्यात रुजली. कोकणी बोली असतानाही आमच्या पूर्वजांनी धर्मभाषा व संस्कृतीभाषा म्हणून मराठीचा स्वीकार केला. तीच गोव्याची ग्रंथभाषा बनली.

गोमन्तकात मराठी भाषा उपरी म्हणून आलेली नाही. महाराष्ट्री प्राकृतातून मराठी भाषेचे आधुनिक रूप जन्माला आले, त्या काळापासूनच मराठीचे अस्तित्व गोमंतभूमीत आहे. हे अस्तित्व सिद्ध करणारे शेकडो पुरावे देऊन झाले. गोव्यातील मराठी साहित्याचा इतिहास नजरेखाली घातला. गोव्याची स्वयंसिद्ध मराठी रंगभूमी कशी विकसित होत गेली तेही आपण पाहिले. पोर्तुगीजकाळातही मराठी वृत्तपत्रे किती होती याचे दाखले देऊन झाले. आता गोमंतकातील मराठी शिक्षणाचा इतिहास व व्याप्ती आपणाला जाणून घ्यायची आहे.

प्राचीन गोमन्तकातील शिक्षणव्यवस्थेचा इतिहास योग्य साधनांअभावी तसा दुर्लक्षितच राहिला आहे. अगदी जुन्या काळात गोव्यातील शिक्षणपद्धती कशी होती याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध झालेली आढळत नाही. पण उर्वरित हिंदुस्थानाप्रमाणेच गोव्यातही शिक्षणदानाची काही व्यवस्था असली पाहिजे, असे अनुमान काढता येते. कोमुनिदादी या गोव्यातील पुरातन काळापासून चालत आलेल्या ग्रामसंस्था. अशा तर्‍हेची ग्रामसंस्था पद्धत भारतात कोठेही आढळून येत नाही. गाव वसवताना गावातल्या जमिनी विविध प्रकारच्या बलुतेदारांना वाटून देण्याची प्रथा होती. मात्र कोमुनिदादींतर्फे शिक्षणासाठी खास काही व्यवस्था केली जात असावी असे काही दिसून येत नाही. यावरून त्याकाळी शिक्षण हा विषय सार्वजनिक न समजला जाता वैयक्तिक समजला जात असावा. त्यातही त्याकाळी गोमंतकातला बहुजनसमाज प्रत्यक्ष शिक्षणाला पारखाच होता. वेदाध्ययन व पूजाअर्चा करणारे पुरोहित आणि व्यापारात गुंतलेले लोक किंवा राजदरबारात नोकरी करणारे यांच्यासाठीच शिक्षणाची सोय उपलब्ध असावी असे मानले जाते. गावचा पुरोहित, ग्रामसंस्थेचा कुलकर्णी किंवा गावची वृद्ध जाणती मंडळी यांच्याकडेच शिक्षणदानाची जबाबदारी असावी.
गुरुकुल व अग्रहार
प्राचीन गोमन्तकावर काही काळ मौर्यांचे आधिपत्य होते. मौर्यकाळात ‘गुरुकुल’ हे शिक्षणाचे केंद्र होते. तक्षशीलेसारखे नगर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात असे. मौर्यांच्या काळात तक्षशीलेतील विद्यापीठ फार प्रसिद्ध होते. जगाच्या विविध भागांतील विद्यार्थी तेथे ज्ञानार्जन करण्यासाठी येत असत. कायदा, वैद्यक, शस्त्रविद्या, अश्‍वविद्या, गजविद्या, धनुर्विद्या, संगीत, नृत्यकला इत्यादी शास्त्रांचे सप्रयोग शिक्षण तक्षशिला विद्यापीठात मिळत असे. या विद्यापीठाची गुरुकुले संपूर्ण भारतात- म्हणजे त्याकाळच्या आर्यावर्तात पसरली होती. सम्राट अशोकाचे साम्राज्य गोव्यापर्यंत पसरलेले होते. बौद्ध साम्राज्याच्या खाणाखुणा इतिहाससंशोधकांना अनेक ठिकाणी सापडल्या. हरवळे येथे ब्राह्मी लिपीतील शिलालेख इतिहाससंशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांना सापडला होता. अशाच प्रकारे ब्राह्मी लिपीतला ताम्रपट शिरोडा-फोंडा येथेही सापडला होता. फादर हेरास या संशोधकाला कोलवाळ येथील उत्खननात पहिल्या किंवा दुसर्‍या शतकातील बुद्धमूर्ती सापडली होती. त्यामुळे मौर्य साम्राज्याचे वैशिष्ट्य असलेली गुरुकुले गोव्यातही अस्तित्वात होती असे अनुमान काढायला वाव आहे.
मौर्यांच्या नंतर भारतात गुप्तांचा काळ आला. गुप्तकाळात गोव्यावर बनवासी कदंबांचे राज्य होते. त्या काळी ‘अग्रहार’ ही शिक्षणाची केंद्रे होती. या काळात वेद, पुराणे, इतिहास, धर्मशास्त्र, व्याकरण, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, ज्योतिष इत्यादी अनेक विषय शिकवले जात. या काळात गोव्यात काही बौद्धविहारही असावेत. अशा विहारांतूनही शिक्षणाचा प्रसार होई. चौथ्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंतचा साधारण एक हजार वर्षांचा जो काळ होता, त्या काळात वेळोवेळी जे काही ताम्रपट सापडले त्यात विद्वान ब्राह्मणांचा उल्लेख आढळतो. त्यावरून वेदविद्याचे शिक्षण देणार्‍या पाठशाला त्याकाळी उघडलेल्या असाव्यात, असे दिसते. माशेल येथे बहुधा अशी पाठशाला असावी. कारण या गावाचे मूळ नाव ‘महाशैल’ होते असे सांगण्यात येते. महाशैल म्हणजे मुख्य पाठशाला जिथे आहे असे ठिकाण. माशेलला जोडूनच ‘कुंभारजुवे’ बेट आहे. त्याचा उच्चार जरी ‘कुंभारजुवे’ (म्हणजे कुंभारांची वस्ती असलेले बेट) असा होत असला तरी ते मूळचे ‘कुमारजुवे’ असावे व ‘कुंभारजुवे’ हा त्याचा अपभ्रंश असावा. कारण कोकणी बोलीत कुंभारालाही ‘कुमार’ असंच म्हणतात. महाशालेत शिकणारे विद्यार्थी (कुमार) त्या बेटावर राहात म्हणून त्याला ‘कुमारजुवे’ म्हणत असावेत असा अंदाज बांधता येतो.
इतिहाससंशोधकांना बाराव्या शतकातील- म्हणजे कदंबकाळातील एक ताम्रपट सापडला होता. त्या ताम्रपटात कदंबराजा त्रिभुवनमल्ल याच्या कारकिर्दीत ‘गोवा शहराजवळ ब्रह्मपुरीची स्थापना करण्यात आली’ अशी माहिती मिळते. त्या काळचे गोवा शहर म्हणजे आजचे ओल्ड गोवा. जुन्या गोव्याला लागूनच एळा येथे ब्रह्मपुरी आहे. आज त्या ब्रह्मपुरीवर गोमंतेश्‍वराचे देवालय असून त्याचा कारभार नाभिक समाजामार्फत चालविण्यात येतो. या ब्रह्मपुरीत ब्राह्मणांची बारा कुटुंबे राहत होती व त्यांच्या घरानजीक एक सरस्वतीचे मंदिर होते अशी माहिती सापडते. सरस्वतीचे म्हणजेच विद्यादेवीचे मंदिर हीच त्याकाळची पाठशाला असू शकते. नंतर चौदाव्या शतकातील (१३९१ साली) ताम्रपटात विजयनगरचा राजा दुसरा हरिहर याचा मंत्री माधव याने जुन्या गोव्यानजीक (म्हणजे आजच्या गोवा वेल्हात) एक ब्रह्मपुरी स्थापन केल्याचा उल्लेख आहे. ही ब्रह्मपुरी बहुधकरून पिलार येथे असावी. कारण हा भाग जिंकून घेतल्यानंतर पोर्तुगिजांनी पिलार येथेच आपली सेमिनरी स्थापन केली. राजा त्रिभुवनमल्लाच्याच काळातील आणखी एक ताम्रपट संशोधकांना सापडला. त्यात कदंब राजाने नागवर्य या ब्राह्मणाला ‘अग्रहार’ स्थापन करण्यासाठी जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे.
दक्षिण गोव्यात आज जो केपे, जांबावली वगैरे गावांचा परिसर आहे त्याला पूर्वी ‘अष्टाग्रहर’ या नावाने ओळखले जात होते. अष्टाग्रहर म्हणजे आठ अग्राहरांचा प्रदेश. याच प्रदेशात असलेल्या रिवण गावाचे जुने नाव ‘ऋषिवन’ असे होते. त्यामुळे विद्यादानाची सोय असलेले आश्रम किंवा ‘अग्रहार’ तिथेही असावेत. काही वर्षे कदंबांची राजधानी असलेल्या ‘चंद्रपूर’नजीक (आजचे चांदोर) जो राशोल गाव आहे तो कदंबकाळात ‘रायशैल’ म्हणून ओळखला जात होता. ‘रायशैल’ म्हणजे राजाची पाठशाला असलेले ठिकाण. ‘ग्रहार’ हे ग्रामीण भागात असत व ‘ब्रह्मपुरी’ या शहराच्या आसपास वसविलेल्या असत एवढाच काय तो फरक.
पोर्तुगिजांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वी म्हणजे १५१० सालापूर्वी गोव्यावर विजापूरच्या आदिलशहाचे राज्य होते. आदिलशहाच्या त्याकाळच्या साम्राज्यात गोव्याप्रमाणेच आजच्या महाराष्ट्राचाही फार मोठा भाग सामावलेला होता. ही गोष्ट शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या सव्वाशे वर्षांपूर्वीची आहे. आदिलशहाच्या पदरी अनेक हिंदू सरदार होते. हिंदूंच्या चालीरीती किंवा वहिवाट अगर देवस्थाने यांत आदिलशहाने फारसा हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे उर्वरित हिंदुस्थानप्रमाणे गोमंतकातही हिंदूंची शैक्षणिक परंपरा फारशी आडकाठी न येता चालू राहिली, असे म्हणता येते. हिंदूंप्रमाणेच मुसलमानांच्याही शिक्षणाची सोय त्यांच्या वहिवाटीप्रमाणे मशिदींतून मौलवींकरवी होत होती. कदंबकाळातही गोव्यात मुसलमानांची वस्ती होती. १०५९ साली कदंब राजा पहिला जयकेशी याने आपल्या ‘च्छडाम’ (सट्टाम) या अरब वंशाच्या मंत्र्याला ‘लघुमोरांबिका’ हे तिसवाडीतील गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. लघुमोरांबिका म्हणजे मोरांबी-ओ-पिकेनो म्हणजेच आजच्या मेरशी ग्रामसंस्थेचा एक भाग. त्याशिवाय जयकेशीने च्छडामला हिंदुस्थानातील वेगवेगळ्या भागांतून गोव्यात येणार्‍या जहाजांवर व लहान-मोठ्या होड्यांवर कर बसविण्याचीही परवानगी दिलेली होती. कराद्वारे मिळणार्‍या उत्पन्नातून जयकेशीचा अरबी मंत्री मोठ्या मशिदींची व त्यातील मदरशांची व्यवस्था पाहत असे.
त्याकाळची शिक्षणपद्धती ही मूलतः धर्माशीच निगडीत होती. शिक्षण म्हणजे धार्मिक शिक्षण असेच त्याकाळातले समीकरण होते. त्यामुळे हिंदू व मुसलमान अशा दोन्ही धर्मांतील लोकांंना अनुक्रमे गुरुकुल किंवा अग्रहार व पाठशाला आणि मदरसा या ठिकाणी आपापले शिक्षण घेता येत असे. पुढे पोर्तुगिजांनी देवळे मोडून इंगर्जी बांधल्या व इंगर्जीना जोडूनच शिक्षण देणार्‍या सेमिनरी उभ्या केल्या. याना पॅरीश किंवा पॅरोकीयल शाळा म्हटले जात असे.
अपारंपरिक शिक्षण
अर्थात साधारण पाचशे-सहाशे वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेतला तर हिंदू समाजात थोडेफार धार्मिक शिक्षण घेण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणवर्गालाच होता. बहुजनांपासून शिक्षण कोसो मैल दूर होते. त्यामुळे ग्रंथपठनाची संधीच बहुजनांना कधी मिळाली नाही. परंतु तेराव्या शतकात भागवत संप्रदायाच्या रूपाने महाराष्ट्रात क्रांती झाली. ज्ञानेश्‍वरांनी पोथीत बंद असलेली भगवद्गीता प्राकृतात म्हणजे मराठीत आणली व वेदांचे भांडार सकल जनांसाठी खुले केले. आपल्या निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या भावंडांसोबत त्यानी संतसाहित्याचा पाया घातला. पुढे ही परंपरा नामदेव, जनाबाई, चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, विसोबा खेचर, नरहरी सोनार, बहिणाबाई, निळोबा, संताजी तेली, रोहिदास, एकनाथ वगैरे संतांनी चालवली. वेदांचे ज्ञान पोथ्या फेकून त्यानी पटांगणात आणले. त्यांच्या लेखणीतून साकार झालेले अभंग जनमानसाच्या ओठांवर खेळू लागले. सर्वसामान्य जनतेचा सांस्कृतिक दर्जा वाढवण्याचे फार मोठे कार्य संत व संतकवींनी केले. या काळात जनतेचे खरे शिक्षक व उपदेशक तेच होते. या काळातील संतांनी अवघा दख्खन प्रदेश (त्यात गोमंतकही आला) हादरवून सोडला. कडीकुलपात बंदिस्त असलेले ज्ञानभांडार मराठीत आणून जनतेला खुले केले. केवळ स्वतःचा उद्धार करून भागणार नाही तर जनसामान्यांचा उद्धार झाला पाहिजे या भावनेने त्यानी अक्षरअभंगांचा प्रसार केला. समानता व सेवाधर्म यांचा प्रचार केला. ज्ञानेश्‍वर-नामदेवांचे कार्य संतश्रेष्ठ तुकोबारायांनी कळसावर नेऊन पोचवले. संतांचे वाङ्‌मय आणि नंतर पंतांनी निर्माण केलेल्या गाथा व पोथ्या याच पारंपरिक लोकशिक्षणाच्या स्रोत बनल्या. संपूर्ण मराठी प्रदेशात ज्ञानेश्‍वरी, तुकारामाची गाथा, दासबोध, एकनाथी भागवत या ग्र्रंथांचे पठण व श्रवण सुरू झाले. रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, भक्तिविजय, संतलीलामृत, मुक्तेश्‍वराचे महाभारत, मोरोपंत, श्रीधरस्वामी, वामनपंडित यांचे ग्रंथ गावोगावी, विशेषतः बहुजनसमाजाकडून वाचले जाऊ लागले. संतसाहित्याची ही नदी महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, ती गोमंतकातही उतरली आणि विशालहृदयी अरबी महासागराने तिला सहजपणे आपल्यात सामावून घेतले.
महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही त्याकाळी वेदांतविषयक लेखन विपुल प्रमाणात होत होते. तुकारामबाबा वर्दे, नायकस्वामी, महेश्‍वरभट्ट सुखटणकर, करंडेशास्त्री, कृष्णंभट्ट बांदकर, सोहिरोबानाथ आंबिये यांचे उल्लेख मागे आलेलेच आहेत. त्यामुळे त्यांची पुनरावृत्ती नको. पण महाराष्ट्राबरोबरच गोमंतकातही मराठी ग्रंथनिर्मिती होत होती हे सत्य इथे अधोरेखित व्हायला हवे. संतवाङ्‌मयाच्या वाचन-पठणाबरोबरच गोमंतकात कथा-कीर्तने, पुराण-निरुपणे, भजन-प्रवचने मराठीतूनच होत असत. हरिदास, पुराणिक, प्रवचनकार यांची ये-जा चालू असे. संत आणि संतवाङ्‌मय यांच्यामुळे मराठी भाषा गोव्यात रुजली. कोकणी बोली असतानाही आमच्या पूर्वजांनी धर्मभाषा व संस्कृतीभाषा म्हणून मराठीचा स्वीकार केला. तीच गोव्याची ग्रंथभाषा बनली.
सुरुवातीची अनेक वर्षे ज्ञानसाधना ही वैयक्तिक पातळीपुरती मर्यादित होती. धूळपाटी, बोरू ही त्यावेळची शैक्षणिक साधने. कालांतराने घरगुती शिक्षणाला शाळांचे स्वरूप प्राप्त झाले. या शाळा बहुतेक देवळात किंवा देवळाच्या अग्रशाळेत अथवा एखाद्या प्रतिष्ठिताच्या घरच्या चौकीवर किंवा ओटीवर चालायच्या. छापील पुस्तके त्या काळात फारशी उपलब्ध नव्हतीच. त्यामुळे मोडी लिपीतील बालबोध लेख हाताने लिहून घेऊन ते विद्यालयांत मुलांकडून वाचून घेतले जात असत.
प्रत्येक घरातून त्यावेळी रात्री भागवत, महाभारत, रामायण वगैरे पोथ्या वाचण्याचा प्रघात होता. हे वाचन जाहीरपणे होत असे. त्यामुळे घरातल्या व परिवारातल्या स्त्रिया तसेच मुली व वृद्ध मंडळींनाही संस्कृतीचे शिक्षण मिळत असे. त्याचप्रमाणे पोथ्यांच्या श्रवणातून उत्तम मराठीचे संस्कारही त्यांच्यावर होत असत. एका परीने हे बहिःशाल शिक्षणच होते. या अनौपचारिक शिक्षणात घरातल्याच नव्हे तर कधीकधी संपूर्ण वाड्यावरच्या किंवा क्वचित गावातल्या मंडळींचाही सहभाग असायचा. माझ्या बालपणी, माझ्या डोंगरी गावात अनेकवेळा अशा प्रकारच्या सांस्कृतिक पाठशाला भरलेल्या मी पाहिल्या आहेत. एखाद्या जाणत्या माणसाने पाटावर बसून भागवत, महाभारत, रामायण, ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा, दासबोध, हरिविजय यांसारख्या ग्रंथांचे वाचन करायचे; त्याने वाचलेल्या ओव्यांचा अर्थ सुलभ मराठीत किंवा कोकणीत दुसर्‍या जाणत्याने विशद करून सांगायचा, मध्येच कुणीतरी शंका काढायची, तिसर्‍यानं तिचे निराकरण करायचे व मग सर्वांनीच त्या चर्चेत सहभागी व्हायचे असा त्यावेळचा रिवाज होता. या सांस्कृतिक पाठशाळेत अशा पद्धतीने अनौपचारिकरीत्या धर्मचर्चा, वेदांतविवेचन, काव्यार्थाचे विवरण होत असे. ज्ञानेश्‍वरीतील गूढ प्रमेये उलगडून दाखवणारे, वामनपंडितांच्या यथार्थदीपिकेचे विवरण करणारे, मोरोपंतांच्या आर्यांचा अर्थ लावणारे पुष्कळ लोक जुन्या पिढीत होते. माझ्या गावातही मी बालपणी असे अनेक निरुपणकार बघितले होते व त्यातले बहुतेकजण बहुजनसमाजातले होते. यांपैकी काही मंडळींचा व्याकरण, काव्य, अलंकार, छंद वगैरेचा बर्‍यापैकी अभ्यास असे. या वर्गातून आपोआप मराठी भाषेचे उत्तम संस्कार शालेय शिक्षण न घेतलेल्यांवरही होत. इतिहासाचेही ज्ञान आपोआप होई. म्हणजे प्रत्यक्ष शाळेत शिकण्याची संधी मिळाली नाही तरी जुन्या पिढीला ओटीवर किंवा चौकीवर भरणार्‍या या सांस्कृतिक पाठशालांत ज्ञान ग्रहण करण्याची चांगली संधी मिळत असे.
त्या काळातील परिस्थितीचे उत्तम वर्णन दिवंगत नाटककार व संगीततज्ज्ञ गोपाळकृष्ण भोबे यांनी केले आहे. ‘माझा गाव’ या आत्मचरित्रात्मक लेखात ते लिहितात- ‘‘माझ्या वेळी मराठी शाळा काढणे किंवा अशा रीतीने कायद्याबाहेर शिक्षण देणे हा गुन्हा होता. परंतु आम्हाला असे छुपे शिक्षण का देण्यात येत असे हे कोडे मात्र सुटत नव्हते. परंतु संतवाङ्‌मयाचा उद्घोष मात्र घराघरांतून रात्रंदिवस चालू होता. बोलण्या-चालण्यात पंत कवींच्या काव्यातील उपमा-उत्प्रेक्षा होत्या. कथा-कीर्तने सातत्याने रंगत होती. माझ्या गावातील एखादा अशिक्षित माणूसही उपमा देताना अभंगांतून देई. ‘नाही निर्मळ जीवन| काय करील साबण?’, ‘अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ| त्याच्या गळां माळ असो-नसो|’ अशा उपमा शुद्ध उच्चारांत आम्ही त्या लोकांच्या तोंडून ऐकल्या. आमच्या पिढीवर त्या बोलण्याने संस्कार केले.’’
भोबे पुढे लिहितात- ‘‘आर्याभारत या ग्रंथातील शेकडो आर्या कित्येकांना मुखोद्गत होत्या. ‘फारचि बरि निरयगती परवशता शतगुणे कटी जाच’ ही आर्या माझ्या वडिलांच्या ओठांवर नेहमी असे. त्याचा अर्थ मागाहून मला समजला. मोरोपंतांहून वामनपंडित श्रेष्ठ असा वाद आमचे शेजारी कृष्णप्रभू नेहमी घालायचे. मग वादाचा समारोप करताना माझे वडील म्हणायचे- ‘आर्या आर्यांसि रुचे हीच्या ठायीं असे बहु गोडी!’ एखादी कूट आर्या किंवा श्‍लोक सांगून त्याचा अर्थ सोडवल्यास बक्षीस देईन असे सांगून कृष्णप्रभू आम्हां मुलांना दोन-दोन दिवस त्या आर्येचा अर्थ लावीत बसवून ठेवायचे. मग आम्ही ‘हरलो’ म्हटले म्हणजे ते अर्थाचे स्पष्टीकरण करून सांगायचे. शाळेपेक्षा मराठीचे खरे ज्ञान मिळाले ते अशा रीतीने चर्चा करून, विनोद करून. संतवाङ्‌मय ही आमची ज्ञानगंगा होती. मी तरी त्यात यथेच्छ डुंबलो.’’
गोपाळकृष्ण भोबेंना त्यांच्या बालपणी जो अनुभव आला तोच अनुभव त्यांच्या काळातील प्रत्येक हिंदू माणसाला येत होता. संतवाङ्‌मयाच्या ज्ञानगंगेत स्नान करण्याचे भाग्य त्याना मिळाले. पुढे निर्माण झालेल्या शणैं गोंयबाब आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी ज्ञानगंगऐवजी छोटी व उथळ डबकी तयार केली. या डबक्यात आंघोळ करण्याची सक्ती आताच्या पिढीवर केली जात आहे.
गोव्यातील मराठी शिक्षणाची ही पूर्वपीठिका होती. ती विस्ताराने सांगितली कारण शणैंच्या अनुयायांना इतिहासाचे विस्मरण झाले आहे. प्रत्यक्ष मराठी शिक्षणाचा इतिहास पाहू पुढील लेखांकात.
(क्रमशः)